Breaking News

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पनवेल विकास विशेष अंकाचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त
हिंदी विवेक मासिकाच्या पनवेल विकास विशेष या अंकाचे प्रकाशन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी येथे करण्यात आले. पनवेल मार्केट यार्ड येधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, उत्तर रायगड भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ‘हिंदी विवेक’चे सीईओ अमोल पेडणेकर, प्रशांत मानकुमरे, ज्येष्ठ साहित्यिक अरविंद शर्मा ’राही’ उपस्थित होते. त्याचप्रमाणे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, चारुशिला घरत, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय जाणिवेसाठी सजग राहण्याचे आवाहन करीत मासिकाच्या योगदानाचे कौतुक केले. राष्ट्र, संस्कृती आणि समाजहिताशी निगडित विषय आणि चर्चा घडवणे ही हिंदी विवेकची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे ते वैचारिक मासिक म्हणून देश-विदेशात लोकप्रिय होत आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात संभ्रम निर्माण करण्याचे काम देशद्रोही आणि समाजकंटक करीत आहेत. त्यांच्या चुकीच्या माहितीच्या युद्धाला तोंड देण्यासाठी आणि त्यांचे कारस्थान समजून घेण्यासाठी प्रत्येक घरात हिंदी विवेक मासिक असणे आवश्यक आहे.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, मोदी सरकार देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी ट्वीन सिटी, स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी, ग्लोबल सिटी या स्वरूपात शहरांचा विकास करण्याचा संकल्प करीत आहे तसेच अशा विकसनशील शहरांची माहिती देणारे पनवेल विकास विशेष हे हिंदी विवेक मासिकाने प्रकाशित केले आहे ते अतिशय कौतुकास्पद आणि मार्गदर्शक आहे. त्यांनी पुढे म्हटले की, मोदी सरकारच्या माध्यमातून देशभरात सुरू असलेल्या विकासकामांची योग्य माहिती मिळवण्यासाठी हिंदी विवेक मासिक वाचले पाहिजे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अमोल पेडणेकर म्हणाले की, जीवनातील सहजतेचे मूल्यमापन करणारे आणि भारतातील प्रमुख शहरांच्या विकासाचे मापदंड मांडणारे विविध मुद्दे आणि विशेष अंक हिंदी विवेकने प्रकाशित केले आहेत. हा या मालिकेतील एक सार्थक प्रयत्न आहे. यासोबतच मासिकाचे उद्दिष्ट सांगताना त्यांनी लोकांना हिंदी विवेकमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. याशिवाय ‘पनवेल विकास स्पेशल’ यशस्वी करण्यात आमदार प्रशांत ठाकूर यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचेही अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ साहित्यिक अरविंद शर्मा ’राही’ यांनी, तर हिंदी विवेक मासिकाचे विपणन प्रमुख प्रशांत मानकुमरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply