Breaking News

गाना, बजाना, नाचना… पब्लिकची एन्जॉयमेंट

आपण स्वतः घेतलेला अनुभव मनात कायमच घर करून राहतो… मी शालेय वयात दक्षिण मुंबईतील अप्सरा थिएटरमध्ये आमच्या गल्लीतील सवंगड्यांसोबत धर्मा (रिलीज 30 नोव्हेंबर 1973) हा मसालेदार मनोरंजक डाकूपट एन्जॉय करायला गेलो असतानाचा हा भन्नाट अनुभव.
त्या काळात असे ढिश्यॅव दिश्यॅव दे मार मारधाड पिक्चर्स म्हणजे ’तिकिटाचा पैसा वसूल’. अशातच पडद्यावर प्राण आणि बिंदू यांच्यावरची राज की बात कहदू तो जाने महफिल मे फिर क्या हो कव्वाली सुरू होताच हाऊसफुल्ल गर्दीतील पब्लिकने टाळ्यांचा ताल धरला आणि चक्क काहींनी पडद्यावर चिल्लर पैसे उडवायला सुरुवात केली. एकाने पैसे उडवलेले पाहून दुसरा उडवू लागला. एक भारीच एन्जॉयमेंट. फार पूर्वीदेखील असं काही घडायचं आणि सुपर हिट गाण्यावर फिदा होत पडद्यावर पैसे उडवत हे ऐकून होतो, पण आपण स्वतः घेतलेला अनुभव आठवला तरी भारी वाटतं.
’धर्मा’ला पन्नास वर्ष पूर्ण होत असतानाच मला हे पटकन आठवलं. बाकी पिक्चर सूडकथा होती. पटकथेत अनेक वळणे होती. नवीन निश्चल, रेखा (चक्क डबल रोलमध्ये), अजित, रमेश देव इत्यादी अनेक कलाकार यात आहेत. सिल्व्हर ज्युबिली हिट पिक्चर आहे. एका कव्वालीवर पिक्चर हिटची किमया घडली.
गीत, संगीत व नृत्य ही आपल्या देशातील जवळपास सर्वच सणांतील खासियत आणि तीच आपल्या हिंदीसह सर्वच प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची संस्कृती. म्हणूनच तर गाणी आणि पब्लिक रिस्पॉन्स या घट्ट नातेसंबंधाची गोष्ट भारीच आहे.
मला आठवतय, ’आराधना’मधील मेरे सपनों की रानी कब आयेगी तू आणि रूप तेरा मस्ताना ही गाणी त्या काळात रेडिओ विविध भारतीवर जयमाला प्रोग्राम, रेडिओ सिलोनवर बिनाका गीतमालामध्ये, गिरगावातील एखाद्या गल्लीतील कुठच्याश्या कार्यक्रमातील लाऊडस्पीकरवर ऐकायला मिळत. रॉक्सी थिएटरमध्ये दिवसा तीन खेळ अशी रौप्यमहोत्सवी वाटचाल केल्यावर तेथेच काही आठवड्यांनी दिवसा दोन खेळ ’यादगार’ (मनोजकुमार व नूतन) व दिवसा दोन खेळ ’आराधना’ असं केलं. आता थिएटर डेकोरेशन बदलताना काय केले? तर चक्क मेरे सपनो की रानी… गाण्याचा देखावा. त्या गाण्यातील ट्रेनमध्ये पुस्तक वाचत बसलेली शर्मिला टागोर आणि उघड्या जीपमधील राजेश खन्ना (जोडीला सुजीतकुमार) असा फंडा. गंमत म्हणजे थिएटर डेकोरेशनवरील सुपर हिट गाण्याचा असा देखावा पाहण्यातही आनंद मिळे. हिट गाणं असंही आपलं अस्तित्व दाखवे.
पिक्चरमधील गाणी ऐकणे/ पाहणे/ गुणगुणणे यासह मस्त गोष्ट. सत्तरच्या दशकाच्या मध्यास मास्टर भगवानदादा यांचा ’अलबेला’ (1951) रिपीट रनला प्रदर्शित होताना अनेक गोष्टी घडल्या. पोस्टरवर गाण्याचे मुखडे वाचायला मिळाले. भोली सूरत दिल के खोटे, श्याम ढले खिडकी तले तुम शिट्टी बजाना छोड दो, शोला जो भडके दिल मेरा धडके… जुन्या पिढीतील चित्रपट रसिकांना ’अलबेला’ पुन्हा एकदा पहावासा वाटला, तर तेव्हा शालेय वयातील आम्हा चित्रपट रसिकांचेही याच गाण्यांमुळे ’अलबेला’विषयी कुतूहल वाढले. मीडियातील या पिक्चरवरचा फ्लॅशबॅक फारच रंजक. इंपिरियल थिएटरमध्ये फर्स्ट रनला ’अलबेला’ रिलीज झाल्यावर पहिले दोन आठवडे काहीसा थंडा रिस्पॉन्स होता. खुद्द भगवानदादा थिएटरवर जाऊन ’पब्लिक रिस्पॉन्स’चा कानोसा घेत. हळूहळू गाणी अशी काही हिट झाली की गोकुळाष्टमी, गणेशोत्सात कच्ची बाजात हुकमी ठरली. सुपरड्युपर हिट गाणे फक्त पडद्यावरच राहत नाही, ते असं समाजातील विविध स्तरांवर रुजते. गाणी चित्रपटाच्या व्यक्तीमत्वाचा महत्त्वाचा भाग.
देव आनंदच्या अनेक खासियतीमधील एक पटकन डोळ्यांसमोर येणारी गोष्ट, गाण्यात तो कमालीचा एकरूप होई. आणखी एक विशेष त्याचे तेरे घर के सामने, तीन देवियां, गॅम्बलर, प्रेम पुजारी, तेरे मेरे सपने या फिल्म फर्स्ट रनला थिएटरमधून लवकर उतरल्या तरी त्यातील गाणी रेडिओपासून इराणी हॉटेलमधील ज्यूक बॉक्सपर्यंत पुन्हा पुन्हा ऐकली जात होती. ऑर्केस्ट्रात हुकमी होती. फक्त हे पिक्चर्स मॅटीनी शोला येण्याचा बेसब्रीसे इंतजार होता. एकेक करीत तसे आले नि यातील गाण्यांसाठीच ते मॅटीनी शोला हाऊसफुल्ल झाले. लोकप्रिय गाणी कधीच आपली साथ सोडत नाहीत त्याचं हे एक भारी उदाहरण. रेडिओवरील ’भुले बिसरे गीत’ कार्यक्रम अशा जुन्या गाण्यांना जुन्या नवीन पिढीला तीच गाणी ऐकवे.
’जय संतोषी मा’ (मुंबईत रिलीज 30 मे 1975)ने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, माध्यम वातावरण ढवळून काढल्याच्या दिवसांत ग्रामीण भागात ’मै तो आरती उतारू रे’ ही पडद्यावरची आरती सुरू होताच प्रेक्षक चक्क चप्पल काढून उभे राहत असा किस्सा भारीच प्रसिद्ध झाला. या पिक्चरची गाणी समाजाच्या विविध स्तरांवर लोकप्रिय झाली.
सत्तरच्या दशकात थिएटर डेकोरेशनवर एखाद्या गाण्यातील पोझ हे जणू कॉमन होतं. ऑपेरा हाऊस थिएटरवर डेकोरेशनला भारीच स्कोप. ’अमर अकबर अ‍ॅन्थनी’च्या डेकोरेशनवर परदा है परदा, माय नेम इज अ‍ॅन्थनी गोल्सानवीस यांना चांगलेच स्थान दिल्याचे आठवतेय. पिक्चर पाह्यला असेल तर हे डेकोरेशन पाहून पुन्हा पहावासा वाटायला हवाच. चित्रपट कला व माध्यम आणि त्याच वेळेस लोकप्रियता व व्यवसाय यांची एकमेकांत सांगड ही अशीच भारी.
’राम तेरी गंगा मैली’ (मिनर्व्हावर), ’सागर’ (न्यू एक्सलसियरला), तेजाब (ड्रीमलॅन्ड), राम लखन (मेट्रो), ’सौदागर ’ (मेट्रो) अशी सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या दिवसांतील आठवणी सांगाव्यात तेवढ्या थोड्याच. तुमच्याही डोळ्यांसमोर अशी ’पोस्टरवरची आणि थिएटर डेकोरेशनवरची अनेक गाणी’ आली असतील. ते पाहूनच तुम्ही गुणगुणला असाल.
’हम आपके है कौन ’च्या लिबर्टीतील डेकोरेशनवरही दीदी तेरा देवर दीवाना या गाण्यातील बेचकी धरणारा सलमान खान व ओपन बॅक चोलीतील मोहक मादक माधुरी होती. मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना लिबर्टीची फर्स्ट शोची बाल्कनीची तिकीटे दिली होती. दोन मध्यंतर हा अनपेक्षित सुखद धक्काच (आठवडाभरात ते एकच केले.. ती स्टोरी वेगळीच) आणि दिदी तेरा देवर गाण्याला पडद्याभोवती अचानक रोषणाई लागली. लख्ख प्रकाश पडला. हे काही वेगळेच होते. थिएटरमधील वातावरण बदलून गेले. एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. पिक्चर हिटमागचे हे छान फंडे आहेत. ते हवेतच. व्यवसायात कल्पकता हवीच. चित्रपट क्षेत्रात तर नक्कीच!
पडद्यावर गाणं येते नि जाते असं नेहमीच घडत नसते. (तो एक वेगळाच विषय) केवळ एका हिट गाण्यावर अनेक पिक्चर्स सुपरड्युपर हिट झालीत. ’हीरो’ (1983)चे पहिले दोन आठवडे थंडच होते. सो सो रिस्पॉन्स होता. तू मेरा जानू है… एव्हाना ऑडिओ कॅसेटने हिट होत होत गेले आणि मग पिक्चर असा काही हिट की आजही त्याची सगळीच गाणी हिट आहेत. हिट गाणी एका पिढीतील चित्रपट पुढील अनेक पिढ्यात नेत असतातच. चित्रपट तारखेने जुना होत असतो, पण त्यातील लोकप्रिय गाण्यांनी तो कायमच आपलं अस्तित्व दाखवत असतो. ही ’चाल’ वेगळीच आणि यशस्वी.
सुपरड्युपर हिट चित्रपटात काही आठवड्यांनी ’आणखी एक गाणे’ हाही एक ट्रेण्ड होता. ’तेजाब’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतानाच दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी अनिल कपूर व माधुरी दीक्षितवर एका गाण्याचे चित्रिकरण करीत ते चित्रपटात समाविष्ट केले. त्या एका गाण्यासाठी अख्खा पिक्चर पाह्यला हवाच. दिग्दर्शक इंद्रकुमारने ’दिल’साठी आमिर खान व माधुरी दीक्षितवर असेच एक गाणे चित्रित करताना आम्हा मीडियाला शूटिंग रिपोर्टींगसाठी सेटवर बोलावले. पिक्चर हिट असताना स्टार अगदी दिलखुलासपणे बोलतो असाच प्रत्यय येतोच. एक गाणे किती तरी गोष्टी घडवत असतो.
’सैराट’चं ’झिंग झिंग झिंगाट’ गाणं सुरू किती होतेय नि आपण पडद्यासमोर जाऊन मन नि शरीर मोकळं सोडून नाचतोय असेच जणू अनेकांना झालं होतं. मुंबई, पुण्यापासून कॅलिफोर्नियापर्यंत हा ’झिंगाट’ फंडा धमाल नाचला. याची सुरुवात नेमकी कशी झाली की त्यात काही मार्केटिंग फंडा होता हे समजायच्या आतच हे फॅड प्रचंड वेगाने सगळीकडे पसरले. चित्रपटाचा आनंद असा घ्यावा याचाच जणू हा प्रत्यय होता. चित्रपट पाहणे हे आपल्याकडे एकादा लहान मोठा जणू सणच. म्हणून तर ’बाईपण भारी देवा’, ’झिम्मा 2’च्या गाण्यावरही मल्टिप्लेक्समध्ये ताल धरला गेला.
फार पूर्वीपारपासून थिएटरमध्ये ’गाण्याला वन्स मोअर ’ मिळत असता तर पब्लिकचा पैसा व्याजासह वसूल झाला असता. ’गल्ली चित्रपटा’त ते शक्य होई. ’अलबेला’मधील भोली सूरत दिल के खोटे पिक्चर संपल्यावर पुन्हा प्रोजेक्शनवर पुन्हा चढवले जाई. ’सोंगाड्या’च्या मळाच्या माळामध्ये कोण गं उभी या गाण्यालाही गल्ली चित्रपटात वन्स मोअर मिळत असे.
आपले अनेक चित्रपट खास गीत, संगीत व नृत्यासाठी पाहिले गेलेत, पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. मग कधी गाण्याला दाद म्हणून पडद्यावर पैसे उडवले गेले, तर कधी अनेक स्टार्सच्या गाण्यातील नृत्याच्या स्टेप्सवर त्याचे फॅन्स गोपालकालापासून वाढदिवसानिमित्तच्या पार्टीत मस्त नाचतात. हिट गाणे फक्त पडद्यावर राहत नाही. ते पब्लिकमध्ये असं मिसळते.
-दिलीप ठाकूर

Check Also

कामोठे कॉलनी फोरमचे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या सर्वांगीण विकासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षात सहभागी होण्याचा ओघ …

Leave a Reply