Breaking News

भाजप शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी; ‘नैना’संदर्भात 23 डिसेंबरला पनवेलमध्ये सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष हा भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी आहे. त्यांना वार्‍यावर सोडणार नाही. विकासाला विरोध करणार्‍यांनी राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना नैना प्राधिकरणाविरोधात उपोषणे, आंदोलने केली नाहीत. आता मात्र लोकांना भ्रमित करण्याचा त्यांचा उद्योग सुरू आहे. आम्हाला जनतेचा विकास हवा आहे. त्याचवेळी विकास होत असताना येथील लोकांवर अन्याय होऊ न देता त्यांच्या समस्या, अडीअडीचणी दूर करू, असे भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी रविवारी (दि. 10) येथे स्पष्ट केले. या संदर्भात सविस्तर भूमिका मांडण्यासाठी 23 डिसेंबर रोजी पनवेल येथे जाहीर सभा घेण्याची घोषणाही या वेळी त्यांनी केली.
पनवेल तालुक्यातील विमानतळ प्रभाव क्षेत्रात नैना प्राधिकरण लागू झाले आहे. ‘नैना’मुळे स्थानिक भूमिपुत्रांना होणारे फायदे तसेच त्यांच्या असणार्‍या मागण्या, शंका यांचे सरकार व सिडकोबरोबर चर्चा करून समाधान करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.
या बैठकीस भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, नांदगावचे सरपंच मनोहर भोईर, केळवणे जि.प.विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पळस्पे पं.स.विभागीय अध्यक्ष सुनील गवंडी यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, महाविकास आघाडीतील मंडळी भाजपवर आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. त्याचप्रमाणे ते खाऊनपिऊन उपोषण करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बदनाम करीत आहेत. ज्यांच्याकडे ग्रामपंचायत राहिली नाही ते आजही सरपंच म्हणून मिरवित आहेत. नागरिकांचे पैसे खाऊन तुरूंगाची हवा खात असलेल्या विवेक पाटलांचे फोटो स्टेटसला लावून उदो उदो करीत आहेत. कर्नाळा बँक घोटाळ्यात भरडल्या गेलेल्या नागरिकांचे पाच लाख रुपयांच्या आतील पैसे मोदी सरकारने मिळवून दिले आणि हे म्हणतात आमच्यामुळे पैसे मिळाले. तसे असेल तर मग पाच लाख रुपयांच्यावरील पैसेही देऊन टाका. वास्तविक लोकांसमोर तोंड दाखवायला यांना जागा राहिली नाही. त्यामुळे एक एक विषय काढून आंदोलन करीत आहेत. जेव्हा राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा का उपोषण केले नाही. आता मात्र लोकांना भ्रमित करण्याचे यांचे उद्योग सुरू आहेत.
आम्ही शेतकरी, आदिवासींवर अन्याय सहन करणार नाही, परंतु आज फक्त शेतीवर कुणी जगू शकत नाही. म्हणून अनेकांनी बिल्डरला जागा विकल्या. इमारती उभ्या राहत असल्याने रस्ते नाहीत, गाड्या उभ्या करायला जागा नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. या सर्व सुविधा नैना प्राधिकरणाने दिल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. गावठाणाचासुद्धा विकास व्हायला हवा यासाठीदेखील आम्ही आग्रही आहोत, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
शेकापच्या दुटप्पी धोरणाविरोधात टीका करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे अशी आमची भूमिका होती. दुसरीकडे शेकापवाले मात्र विमानतळाच्या एखाद्या टर्मिनलला ‘दिबां’चे नाव द्या, असे म्हणत होते. आम्ही मात्र संपूर्ण विमानतळाला नाव द्यावे यावर अडून बसलो. त्यासाठी केसेसही अंगावर घेतल्या, असे सांगितले.
नैना प्राधिकरणाकडून काही चुका झाल्या असतील तर त्या आपण दुरूस्त करून घेऊ, पण जनतेचे पैसे खाऊन ढेकरा देणारे जर जाब विचारत असतील, तर त्यांना उत्तर देणे योग्य नाही, असे सांगून ‘नैना’संदर्भात व्यापक स्वरूपात भूमिका मांडण्यासाठी 23 डिसेंबर रोजी पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात जाहीर सभा घेऊ, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केले.
या वेळी आमदार महेश बालदी म्हणाले की, होय! आम्हाला विकास हवा आहे. आज सिडकोकडून डेव्हलपमेंट करून घेतल्यामुळे खारघर, उलवे नोडपाठोपाठ आता करंजाडे, द्रोणागिरी नोडमध्ये विविध सोयीसुविधा नागरिकांना मिळत आहेत. नैना क्षेत्रात विकास होत असताना काही शंका असतील तर चर्चेतून मार्ग काढू, पण दुसर्‍या बाजूला काहींना जिल्हा परिषद लढवायचेय, काहींना पक्ष टिकवायचा आहे. त्यांचे नेते 540 कोटींचा घोटाळा करून जेलमध्ये बसल्याने यांना कुणी वाली राहिला नाही. म्हणून आंदोलन, उपोषण करीत आहेत. त्यांना जशास तसे उत्तर देऊ.
महाविकास आघाडीवाले शेतकरी, आदिवासींना भडकवत आहेत. राजकीय स्वार्थासाठी, भाजपला बदनाम करण्यासाठी ही मंडळी खोटे बोलत आहेत, कारण खोटे बोलल्याशिवाय लोक आपल्यासोबत येणार नाहीत हे त्यांना माहितेय, पण काहीही झाले तरी विकास होत असताना शेतकरी, आदिवासींच्या जमीन, घरांचे आम्ही नुकसान होऊ देणार नाही, असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले. डेव्हलपमेंटबाबत सिडकोचा 60-40 असा प्रस्ताव आहेत, पण तुमची, आमची सर्वांची 50-50 अशी मागणी आहे. हे धोरण पिंपरी चिंचवडमध्ये लागू होऊ शकते, मग आपल्याकडे का नाही, असा सवाल करून जनतेसाठी आम्ही सिडकोसोबत चर्चा करू आणि मार्ग काढू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply