ममता बॅनर्जी यांनी धडाकेबाज सूचना करणे आणि त्याला ‘इंडिया आघाडी’च्या बाकीच्या काही नेत्यांनी मान डोलावणे ही काही आपोआप घडलेली घटना नव्हे. गांधी परिवाराला पूर्णत: बाहेर ठेवण्याचा बेत या आघाडीत शिजू लागल्याचे हे लक्षण मानायला हवे. म्हणूनच बैठकीतील दोन्ही मागण्यांबाबत स्वत: मल्लिकार्जुन खरगे यांनी सावध भूमिका घेतलेली दिसते.
येत्या वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. राजकीय पक्षांचा तर धीर सुटू लागला आहे. कुठल्याही परिस्थितीत आगामी निवडणुकीमध्ये मोदी सरकारचा पुरता पाडाव केल्याशिवाय राहणार नाही अशा वल्गना करीत विरोधी पक्षांचे एक कडबोळे काही महिन्यांपूर्वीच स्थापन झाले. 28 पक्षांच्या या कडबोळ्याला ‘इंडिया आघाडी’ असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात अहंकार आणि घबराटीमुळे एकत्र आलेले हे सारे अपयशी, असंतुष्ट पक्ष आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या करिश्म्यापुढे यापैकी कोणाचाही निभाव लागणे शक्य नाही हे एव्हाना सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. मोदी यांचा पाडाव एकट्याने नव्हे तर सगळ्यांनी मिळून करता येईल का असा स्वप्नवजा प्रश्न उराशी बाळगून हे पक्ष एकत्र आले आहेत. आजवर त्यांच्या चार बैठका झाल्या. पहिली बैठक पाटणा येथे झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. पाठोपाठ दुसरी बैठक बंगळुरात झाली. तिसरी बैठक मुंबईतील पंचतारांकित हॉटेलामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यजमानपदाखाली पार पडली आणि चौथी बैठक दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये मंगळवारी झाली. या चारपैकी तीन बैठका आलिशान पंचतारांकित हॉटेलांमध्ये पार पडल्या. पाटण्यातील मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बोलावलेली पहिली बैठक तुलनेने साधेपणाने पार पडली. या चारही बैठकींमधले निष्पन्न मात्र शून्य आहे. दिल्लीतील बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या वतीने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव जाहीर करावे असा प्रस्ताव ठेवला. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री व द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी त्यांच्या प्रस्तावाला दुजोरा दिला. याचवेळी, इंडिया आघाडीला कुणीतरी निमंत्रक असावा अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली. खरगे यांचे नाव पुढे करण्यात आल्याने नितीशकुमार आणि लालुप्रसाद यादव हे दोघेही नाराज झाल्याचे कळते. याच बैठकीमध्ये ममता बॅनर्जी यांनी आणखी एक धमाकेदार सूचना केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात चलबिचल झाल्याचे वृत्त काही हिंदी वृत्तवाहिन्यांनी झळकवले. राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियांका गांधी यांनी वाराणसीमधून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवावी अशी सूचना ममता दिदींनी केल्याचे सांगण्यात येते. पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून खरगे यांचे नाव पुढे केले जात असले तरी प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसणार हे वेगळे सांगायला नको. एक तर मोदी यांच्याशी तुल्यबळ असा नेता विरोधकांकडे नाही. विरोधकांकडेच कशाला, संपूर्ण भारतात मोदी यांच्या तोडीचे नेतृत्व सापडणे अशक्य आहे. इंडिया आघाडीचे कडबोळे निवडणुकीपर्यंत एकत्र राहिले काय किंवा फुटले काय, भारतीय जनता पक्षाला त्यामुळे काडीमात्र फरक पडणार नाही हे उघडच दिसते. जनतेच्या मनात घर करून असलेल्या मोदी यांचा पाडाव इंडिया आघाडीला अवघडच नाही तर अशक्य आहे.