Breaking News

चांदेपट्टी गावावर दरड, भूस्खलनाची टांगती तलवार; पेण तहसीलदारांनी केली पाहणी

पेण : प्रतिनिधी

पेण तालुक्यातील चांदेपट्टी गावावर दरड व भूस्खलनाची टांगती तलवार असल्याने गावातील 70 कुटुंबातील सुमारे 400 ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत आहेत. या ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, चांदेपट्टी गावाच्या डोंगरानजीक असलेल्या 10 घरांतील ग्रामस्थांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करणार असल्याची माहिती पेणच्या तहसीलदार डॉ अरुणा जाधव यांनी दिली. पेण तालुक्यातील चांदेपट्टी हे गाव अतिशय दुर्गम भागात आहे. गावातील अनेक कुटुंब कामधंद्यानिमित्त पेण, तसेच मुंबई येथे राहायला आहेत. त्यामुळे गावात प्रामुख्याने वृद्ध पुरुष व महिलाच राहतात. गावाच्या एका बाजूला उंच डोंगर, तर दुसर्‍या बाजूला खोल दरी आहे. अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये गावात भूस्खलन होऊन 84 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडल्याने आता चांदेपट्टी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चांदेपट्टी परिसराचा जिओलॉजिकल सर्व्हे करून ग्रामस्थांचे लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, अशी मागणी चांदेपट्टी ग्रामस्थांनी रायगड जिल्हाधिकारी, पेण प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, पेणच्या तहसीलदार डॉ. अरुणा जाधव यांनी मंडळ अधिकारी एम. आर. पाटील, तलाठी किशोर पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी एन. एम. गडकरी, कृषी अधिकारी ए. आर. रोकडे, वनक्षेत्रपाल कुलदीप पाटकर, वनपाल के. जे. चौधरी, जी. पी. हडकर, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांच्यासह चांदेपट्टी गावाची पाहणी केली. त्या वेळी महेश भिकावले, भरत शिंदे, राजश्री शिंदे, मधुकर भिकावले, पांडुरंग दळवी या ग्रामस्थांनी डोंगरावरून भूस्खलन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. संपूर्ण गावाचे पुनर्वसन व्हावे, यासाठी ग्रामपंचायतीने ठराव पारित केला असल्याची माहिती त्यांना दिली.

डोंगरानजीक असलेल्या चांदेपट्टी गावातील 10 घरांतील ग्रामस्थांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करण्यात येईल, तसेच चांदेपट्टी परिसराचा जिऑलॉजिकल सर्व्हे करून त्याच्या अहवालानंतर योग्य ती उपाययोजना करण्यात येईल.

-डॉ अरुणा जाधव, तहसीलदार, पेण

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply