Breaking News

मनमोहन… भूमिका छोट्याच, प्रभाव मोठा!

तुम्हाला शक्ती सामंता निर्मित व दिग्दर्शित आराधना (1969) सुपरहिट गाण्यांसह अनेक गोष्टींसाठी सहज आठवत असेलच, त्यात एका प्रसंगात श्याम (मनमोहन) अतिशय दुष्ट हेतूने, विखारी नजरेने, पापी लालसेने वंदनाच्या (शर्मिला टागोर) घरी येतो आणि जालीमपणे म्हणतो, जो लडकी मुझे थप्पड मारती है, मै उसे बुरा नही मानता, उसका नाम डायरी मे नोट कर देता हू…एक दिन हिसाब किताब पुरा कर देता हू…असं म्हणतच तो वंदनावर जबरदस्ती करू लागतो. यात झटपट वाढते आणि अशातच वंदनाचा मुलगा शाळेतून येतो आणि खिडकी तोडलेल्या काचेने श्यामवर हल्ला करतो. पापी श्याम अतिशय जखमी झाल्याने त्यात त्याचा मृत्यू होतो.
तुम्हाला शक्ती सामंतांच्याच अमर प्रेम (1972)मधील पुष्पा (शर्मिला टागोर) कोठ्यावरची गायिका का बनते हे कथेच्या ओघात समजते. ती आपल्या दारूच्या अतिशय व्यसनी गेलेल्या पतीपासून वेगळी राहत असते. अखेरीला कळते आपला हा दारुच्या आहारी गेलेला नवरा अतिशय आजारी आहे आणि त्यातच त्याचा अंत होतो. पुष्पाच्या या नवर्‍याची म्हणजेच राम रतनची भूमिका साकारलीय मनमोहनने. मनमोहनची ही छोटी भूमिकाही उल्लेखनीय ठरली.
तुम्हाला ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ’नमक हराम’(1973)मधील सोमू अथवा चंदर (राजेश खन्ना) आणि विकीच्या (अमिताभ बच्चन) जिगरी दोस्तीची गोष्ट चांगलीच ज्ञात आहे. त्यात विकीचे उद्योगपती वडील दामोदर महाराज (ओम शिवपुरी) अतिशय चलाखीने विघ्न घालतात. ते चंदर कामात मग्न असतानाच आपला खबरी अथवा चमचा जयसिंग (मनमोहन) याला मुद्दाम पाठवतात आणि जयसिंग इतर कामगारांना ऐकू जाईल, समजेल अशा पध्दतीने चंदरला म्हणतो, साब ने मिलने बुलाया है…एवढ्यावरून चंदरबद्दल गैरसमज निर्माण होतात. त्याला मालिक का चमचा समजतात आणि बेदम मारहाणही करतात. हे सगळे जयसिंगमुळे झाल्याचे विकीला समजल्यावर विकी त्याला बेदम मारहाण करीत वस्तुस्थिती समजून घेतो आणि सत्य माहित पडल्यावर जयसिंगला पैसे देत असतानाच जयसिंग म्हणतो, नही साब नही… जिंदगी मे पहली बार इमानदारी का काम किया है…पैसे नहीं लूंगा.
चित्रपट रसिकांच्या वयाच्या साठीपारच्या एका पिढीच्या डोळ्यासमोर साठ आणि सत्तरच्या दशकात तब्बल शंभरपेक्षा जास्त चित्रपटात छोट्या छोट्या भूमिकेतही चांगलाच लक्षात राहिलेला मनमोहन आठवला असेल. त्या काळातील अनेक चित्रपटांत सत्येन कप्पू, शेट्टी, मनमोहन, मॅकमोहन असे अनेक कलाकार छोट्या छोट्या भूमिकेत दिसत. नव्वदच्या दशकातील चित्रपट रसिकांना बोल राधा बोल, महासंग्राम, शूल, लाडला, लव्ह के लिए कुछ भी करेगा, इना मिना डिका इत्यादी चित्रपटांचा निर्माता नीतिन मनमोहन माहित असेल. मनमोहन त्याचे पिता. खरं तर नीतिन पंचमिया या नाव आडनावाने ’बात बन जाऐ’ या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले तेव्हा त्याला काहींनी सांगितले, या पंचमिया आडनावावरून तुला कोण ओळखणार? त्यापेक्षा तुझ्या नावापुढे तुझ्या वडिलांचे नाव लाव, नीतिन मनमोहन. तुला चित्रपटसृष्टीत आणि चित्रपट रसिकांत ओळख मिळेल.
हा सल्ला उपयुक्त ठरला. मनमोहन या नावाला निश्चितच ओळख व वलय होतेच.
मनमोहनचा जन्म 28 जानेवारी 1933 चा. बिहारमधील जमशेदपूर या छोट्या शहरात एका चांगल्या व्यापारी कुटुंबात झाला. हे चार भाऊ. आई गृहिणी. वडिलांची इच्छा चारही मुलांनी व्यवसायात रस घ्यावा. तसा तो तिघांनी घेतला. मनमोहनला मात्र चित्रपट एन्जॉय करण्याची हौस मौज. त्यालाही वाटे, ’आपणही हीरो बनूयात’. पण कसा मार्ग काढणार? स्वप्न तर होते, पण काय करायचे हा प्रश्न होता. अशातच मारुती, मुकरी आणि टूनटून हे कॉमेडीयन एका शोसाठी जमशेदपूर येथे आल्याची संधी साधून मनमोहनने त्यांची दोन दिवस उत्तम मेहमान नवाझी केल्याचे त्याच्या पथ्यावर पडले. ते मनमोहनला म्हणाले, सिनेमात काम करू इच्छितोय तर मुंबईत यायला हवे. मनमोहन आला तर खरा पण एकेक संधी मिळणे अवघड होते. आर. के. नय्यर यांच्या ’यह रास्ते है प्यार के’ (1963) या चित्रपटात अगदीच छोटीशी भूमिका मिळाली. ’जिंदगी और मौत’ याही चित्रपटात एक प्रसंग साकारला. मनमोहनला हीरो बनायचे वेध आणि वेड होते, पण ते फार अवघड आहे हे त्याच्या लक्षात आले. संधीसाठी फिल्मवाल्यांच्या भेटीगाठी घेत असतानाच त्याच्या काही ओळखी झाल्या आणि तो ’यारों का यार’ अशा दिलखुलास वृत्तीने वावरत असल्याने त्या ओळखी घट्ट होत गेल्या. त्यात एक होते संगीतकार जयकिशन (शंकर यांचे जोडीदार) त्यांनी निर्माते केवल कश्यप यांच्याशी मनमोहन यांची भेट करुन दिली. केवल कश्यप तेव्हा एस. राम शर्मा दिग्दर्शित ’शहीद’ (1965) या देशभक्तीपर चित्रपटाची निर्मिती करीत होते. मनोजकुमार भगतसिंग साकारत होता. प्रेम चोप्रा सुखदेवच्या भूमिकेत होता. त्याचाही तो सुरुवातीचा काळ. मनमोहनने चंद्रशेखर आझाद साकारला. चित्रपट जोशपूर्ण असल्याने सगळ्यानीच अतिशय आत्मियतेने काम केले. चित्रपट लोकप्रिय ठरला. चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. चित्रपटाची संपूर्ण टीम नवी दिल्लीत गेली आणि तत्कालिक पंतप्रधान लालबहादूर शास्री यांच्या हस्ते त्यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. पंतप्रधानांनी मनोजकुमारला सल्ला दिला, आपल्या देशाचे बोधवाक्य ’जय जवान जय किसान’ यावर चित्रपट निर्माण कर. दिल्ली ते मुंबई रेल्वे प्रवासात मनोजकुमारने ’उपकार’ या चित्रपटाची रुपरेषा तयार केली आणि त्यात ’शहीद’मधील आपले सहकारी प्रेम चोप्रा, मनमोहन यांनाही आवर्जून संधी दिली. मनमोहन त्याच्या प्रत्येक चित्रपटात हुकमी ठरला.
मनमोहन आता चित्रपटसृष्टीत अधिकाधिक प्रमाणात माहित होत जाताना त्याला अनेक चित्रपटांत लहान मोठ्या भूमिका मिळू लागल्या. काही वर्षातच त्याच्या लक्षात आले आपल्याला लहान मोठा खलनायक साकारत वाटचाल करावी लागेल. त्याचं व्यक्तिमत्व, त्याची नजर व्हीलनगिरीला सही होती. मनमोहनची कारकीर्द सुरू होत असतानाच प्राण खौपनाक खलनायकीकडून चरित्र भूमिकेकडे वळला होत आणि नेमके तेव्हाच अजित, प्रेमनाथ हे नायकाकडून खलनायक झाले. के. एन. सिंग, जीवन, मदन पुरी, अन्वर हुसैन यांचा जम बसला होता. प्रेम चोप्रा जम बसवत होताच. अशातच रणजीत, डॅनी डेन्झोपा, नरेन्द्रनाथ, रुपेशकुमार, मॅकमोहन, इम्तियाज, भरत कपूर, सुधीर असे आणखीन लहान मोठे व्हीलन आले. रमेश देवही काही हिंदी चित्रपटात व्हीलन साकारत. विनोद खन्ना व शत्रुघ्न सिन्हा यांनीही खलनायक म्हणून करियर सुरू करून मग ते नायक झाले. मनमोहनसमोर चांगलीच स्पर्धा होती. मग गब्बरसिंग अमजद खानही आला. अमरीश पुरीही आला. छोट्या भूमिकेत सुरुवात केलेला मनमोहन या सगळ्या वातावरणात छोट्या भूमिकेतच राहिला. त्यातून सुटका नव्हतीच. एकाद्याची कारकीर्द अशीही घडते.
मनमोहनची चित्रपटांची संख्या वाढत होती आणि त्यात सातत्य होते ही समाधानाची बाब. साठच्या दशकातील जानवर, गुमनाम, मेरा साया, परीवार, नौनिहाल, आराधना, विश्वास, सत्यकाम, प्यार ही प्यार, दो भाई, पूरब और पश्चिम अशा अनेक चित्रपटांतून त्याने सत्तरच्या दशकातही उत्तम सातत्य ठेवले. प्रेम पुजारी, हमजोली, नया जमाना, मेरा गांव मेरा देश, बॉम्बे टू गोवा, ललकार, शोर, राजा रानी, डबल क्रॉस, अनहोनी, जुगनू, शंकरदादा, हीरा पन्ना, अनोखी अदा, गीता मेरा नाम, प्रेम नगर, रोटी कपडा और मकान, हमशकल, आंधी, अमानुष, महाचोर, बारुद, छैला बाबू, चलता पूर्जा, हत्यारा अशा अनेक चित्रपटांत त्याने भूमिका साकारली. त्यात एक चित्रपट होता, मनू नारंग निर्मित व बिमल रावत दिग्दर्शित ’पांच के दुश्मन’ (1973). विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, अजित, प्राण आणि प्रेम चोप्रा हे ते पांच. या चित्रपटात मनमोहनही होता. पिक्चर रिलीज झाला तोच फ्लॉप. तरी विशेष उल्लेखनीय गोष्ट, दहा वर्षांनंतर म्हणजेच 1983 साली हाच चित्रपट तेव्हाच्या नियमानुसार पुन्हा सेन्सॉर संमत करून घेताना त्याचे नाव ’दौलत के दुश्मन’ असे करुन तो चांगल्या पूर्वप्रसिध्दीने पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. अशाही रंजक गोष्टी होत असतात. मनमोहनने
बंगाली, गुजराती, पंजाबी या भाषेतील चित्रपटातही भूमिका साकारत आपला कार्यविस्तार वाढवला. मनोजकुमार, राजेश खन्ना, शक्ती सामंता यांचा तो विशेष आवडता होता.
असे सगळे सुरू असतानाच मनोजकुमारसोबत ’संतोष’ या चित्रपटात मनमोहन भूमिका साकारत होता. महाराष्ट्रातील एका गावात याचे शूटिंग असताना त्या गावात विजेची सोय नव्हती. म्हणून प्रेट्रोमॅक्स लावून युनिट झोपत असे. अशातच एका रात्री पेट्रोमॅक्स फुटला आणि तेथून जवळच झोपलेला असलेला मनमोहन ऐंशी टक्के भाजला. हा अपघात जणू आघात ठरला. बरेच दिवस उपचार सुरु होते. त्यातून सावरतच मनमोहन पुढील उपचारासाठी जमशेटपूरला गेला आणि तेथेच त्याचे 26 ऑगस्ट 1979 रोजी निधन झाले. तेव्हा त्याचे वय फक्त 46 वर्ष इतके होते. हा अचानक झालेला ’द एण्ड’ होता.
मनमोहनच्या आयुष्याचा शेवट फारच धक्कादायक ठरला..पण आराधना, अमर प्रेम, नमक हराम अशा चित्रपटांतील त्याच्या भूमिका लक्षात राहतील. त्याच्या मृत्यूनंतर त्याची भूमिका असलेला मनोजकुमार निर्मित व दिग्दर्शित ’क्रांती’ प्रदर्शित झाला.’जान ए वफा’ (1990) अनेक वर्ष रखडत रखडत एकदाचा पडद्यावर आला तोपर्यंत मनमोहनचा मुलगा नीतिन मनमोहन चित्रपटसृष्टीत कार्यरत झाला होता. (कालांतराने
त्याचेही 29 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले. तेव्हा डोळ्यासमोर मनमोहनही आला.)

 – दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply