Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून निराधार महिला, आदिवासी बांधवांना मदत

कळंबोली : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. हातावर पोट असणार्‍या गरीब, गरजू, निराधार महिला व आदिवासींची उपासमार होत आहे. अशा पडघे, तळोजा औद्योगिक विभागातील 200 महिला व आदिवासींना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप भाजपचे नेते कृष्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांचे निराधार महिला आदिवासी बांधवांनी याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून दररोजच्या वाढत्या बळीची संख्या चिंता वाढविणारी आहे. संसर्गजन्य असलेल्या या कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आले. मात्र प्रत्येकाने शासनाला मदत करताना, आपले संरक्षण करताना व कोरोनावर मात करण्यासाठी घरातच बसणे पसंत केले आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले असल्याने हातावर पोट असणार्‍या गरीब, गरजू, आदिवासी, निराधार, झोपडपट्टीतील नागरिक अडचणीत सापडले आहेत. हातातील पैसा व घरातील अन्नधान्य संपल्याने त्यांना एकवेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

या वेळी या गरीब, निराधारांसाठी आमदार प्रशांत ठाकूर धावून येऊन त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्याकडून पडघे विभाग, तळोजा औद्योगिक विभाग व आदिवासी, निराधार अशा 200 महिलांसाठी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप भाजपचे नेते कृष्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या विभागातील एकही नागरिक उपाशी राहणार नाही याची काळजी आमदार प्रशांत ठाकूर स्वत: घेत आहेत.

लॉकडाऊनमुळे निराधार महिला, आदिवासी बांधवांची उपासमार सुरु आहे. त्यांना मदत म्हणून सात गावांत कम्युनिटी किचन सेंटर सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांचे कौतुक केले जात आहे.

गोवठणे गावातील गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत

उरण : वार्ताहर – उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या उरण तालुका महिला अध्यक्षा राणी सुरज म्हात्रे यांच्या वतीने रविवारी (दि. 26) उरण तालुक्यातील गोवठणे गावातील लोकांना घरगुती जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत देण्यात आली. गोवठणे गावातील 100 घरांना घरगुती जीवनावश्यक सामान वाटप करण्यात आले व गरीब-गरजू 45 महिलांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात आले. या वेळी भाजप तालुका महिला अध्यक्षा राणी म्हात्रे, महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या करिता सर्वत्र लॉकडाऊन जारी केले आहे. गरीब, गरजूंना काम मिळत नाही. त्यांना प्रत्येकाने मदत करण्याची गरज आहे. मदतीचा हात म्हणून त्यांना मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे. सेवाभावी संस्थांनी या कामात पुढे येऊन गरीब व गरजूंना मदत करावी, अशी प्रतिक्रिया भाजप उरण तालुका महिला अध्यक्षा राणी म्हात्रे यांनी व्यक्त केली.

उरण तालुक्यातील नवघर, कुंडेगाव झोपडपट्टीतील नागरिकांना मदतीचा हात

उरण : वार्ताहर – कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, त्यामुळे सर्वत्र 3 मेपर्यंत लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असलेल्या गरीब गरजू लोकांना काम मिळत नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने एपीएम टर्मिनल, मर्क्स सीएफएस व अ‍ॅनेक्स सीएफएस यांच्या वतीने मंगळवारी (दि. 28) नवघर झोपडपट्टी, कुंडेगाव झोपडपट्टीत जीवनावश्यक वस्तू, धान्य , सॅनिटायझर व मास्क आदींचे सुमारे 200 गरीब-गरजू लोकांना वाटप करण्यात आले. त्यात पाच किलो तांदुळ, पाच किलो गहू, दोन लिटर तेल, एक किलो साखर, एक बाटली सॅनिटायझर, एक मास्क आदी वस्तू देण्यात आल्या.

या वेळी सीएफएसचे एचआर मॅनेजर योगेश ठाकूर, कुंडेगाव ग्रामपंचायत सदस्य समाधान भोईर, कुंडेगाव ग्राम सुधारणा मंडळ अध्यक्ष दिनकर पाटील, मर्क्सचे अधिकारी विश्वजीत कदम, नवघर ग्रामपंचायत माजी सरपंच शेखर तांडेल आदी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. अशावेळी हातावर पोट असलेल्यांचे काम बंद झाले आहे. त्यांना मदतीचा हात देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने ही थोडीशी मदत करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया सीएफएसचे एचआर मॅनेजर योगेश ठाकूर यांनी व्यक्त केली.

रिक्षाचालकांना अन्नधान्य वाटप

पनवेल : वार्ताहर – पनवेलमधील श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर सचदेव व पत्रकार यांच्याकडून वंदे मातरम रिक्षा संघटनेच्या रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन ज्याप्रमाणे वाढत चालले आहे तसे रिक्षा चालक देखील आर्थिक विवंचनेत आहे.

पनवेलमधील वंदे मातरम रिक्षा चालक-मालक संघटनांच्या रिक्षा चालकांसाठी पत्रकार व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर सचदेव व पत्रकार मित्र असोसिएशनचे संजय कदम, श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे उपाध्यक्ष उमेश सचदेव, सेक्रेटरी मनोज देढिया, खजिनदार गोपाळ गिडवानी यांनी वंदे मातरम रिक्षा संघटनेच्या 50 सभासदांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून रिक्षा चालकांना आधार दिला. आजपर्यंत विविध विभागामध्ये 300 रिक्षा चालकांना पत्रकार व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टने अन्नधान्यचे वाटप केले आहे.

जागृती फाऊंडेशनकडून वारांगनांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

पनवेल : वार्ताहार – शासनाकडून सर्व कष्टकरी, मजूरवर्गीय जनतेला विविध प्रकारच्या माध्यमातून मदत होत आहे. मात्र वारांगनांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रत्येक तालुक्याला आपल्या भागातील वारांगनांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अजूनही त्यांच्यापर्यंत शासनाची मदत न पोहचल्याचे पाहता जागृती फाऊंडेशनच्या माध्यमातून या वारांगनांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

देहविक्री करुन उदरनिर्वाह करणार्‍या महिलांकडे एरवी समाजाचे लक्ष जात नाही. या व्यवसायाकडे नाईलाजाने आलेल्या महिलांची परिस्थिती या लॉकडाऊनमुळे अतिशय बिकट झाली आहे. आर्थिक उत्पन्न बंद झाल्याने उपासमारीची वेळ या महिलांवर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी मुंबई-पुणे-नाशिक-नागपूर-अहमदनगर या भागात ही संख्या अधिक असल्याने सर्व जिल्हाधिकारी यांना या महिलांकरीता जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पनवेल तहसील कार्यालयाला तशा सूचना व आदेश दिले आहेत. मात्र अजूनही त्यांच्यापर्यंत या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप झाले नसल्याची माहिती जागृती फाऊंडेशनकडून सुमारे तीस ते चाळीस महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. ज्यांच्याकडे रेशनकार्ड, आधारकार्ड आहेत त्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत आहे. परंतु या महिलांकडे या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे त्या शासनाच्या या लाभापासून वंचित आहेत, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. म्हणून पनवेल तालुक्यातील आकुर्ली, आदई, आसूडगाव भागातील या महिलांना जागृती फाऊंडेशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

पनवेलमधील पोलिसांना व्हिटॅमिन सीच्या गोळ्यांचे वाटप

पनवेल : वार्ताहर – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या पावणे दोन महिन्यांपासून पोलीस वर्ग हा रस्त्यावर 24 तास सर्वसमान्य नागरिकांसाठी सतर्क आहे. यात तीन पोलीस कर्मचारी शहिदसुद्धा झाले आहेत. परंतु आपल्या जीवाची किंवा आपल्या कुटूंबियांची काळजी न करता रस्त्यावर सेवा देणार्‍या पोलीस बांधवांसाठी गुरूवारी (दि. 30)भिंगारी येथील डॉ. राजेश गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्‍यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी सी व्हिटॅमिन गोळ्यांचे वाटप केले.

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्याशी चर्चा केल्यावर सातत्याने कर्तव्य बजावित असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज असते. सध्याच्या मे महिन्यांत सी व्हिटॅमिनची शरीराला जास्त गरज असते. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी अंगात प्रतिकार शक्तीसुद्धा महत्त्वाची आहे. त्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्याकडे सी व्हिटॅमिनचे पॅकेट्स विक्रांत पाडळे, अक्षय शेटे, तन्मय शेटे, नितेश चव्हाण, आशिष परदेशी यांनी सुपूर्द केले. त्याचप्रमाणे वाहतूक शाखा व इतर पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनासुद्धा सी

व्हिटॅमिनचे वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply