Breaking News

धोनीमुळे माझे वर्ल्ड कपमधील शतक हुकले -गौतम गंभीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने एका गोष्टीबाबत आपले मौन सोडले आहे. विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यामुळे माझे शतक हुकले, असे गंभीरने म्हटले आहे.

भारतीय क्रिकेट संघाने 2 एप्रिल 2011 रोजी आयसीसी वन डे वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे रंगलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा तो थरार आजही कोणी विसरू शकले नाही. शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठा वाढवणार्‍या या सामन्याने अनेकांचीच स्वप्नपूर्ती झाली. त्या सामन्यात गौतम गंभीरच्या 97 धावा आणि धोनीच्या नाबाद 91 धावा यांच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला. या सामन्यात गंभीरचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. त्या हुकलेल्या शतकाला माजी कर्णधार धोनी जबाबदार आहे, असे गंभीरने एका मुलाखतीत सांगितले.

‘विश्वचषक स्पर्धेत मी 97 धावांवर बाद झालो. त्याबद्दल मला अनेकदा प्रश्न विचारले जातात, पण मी प्रत्येक वेळी सांगतो की, मी त्यावेळी माझ्या वैयक्तिक धावसंख्येसाठी नव्हे, तर संघाला जिंकवून देण्यासाठी खेळत होतो. मला आजही लक्षात आहे की जेव्हा षटक संपले तेव्हा मी आणि धोनी मैदानावर होतो. मी 97 धावांवर असल्याची आठवण मला धोनीने करून दिली. धोनी म्हणाला, आता केवळ तुला 3 धावा करायच्या आहेत म्हणजे तुझे शतक होईल. त्याच्या या वाक्यामुळे मला माझ्या धावसंख्येबाबत आठवले. तोपर्यंत मी केवळ प्रतिस्पर्धी संघाने दिलेल्या आव्हानाचाच विचार करीत होतो, पण जेव्हा धोनीने मला माझ्या धावसंख्येची आठवण करून दिली, त्या वेळी मी खूपच बचावात्मक खेळू लागलो आणि त्यातच मी बाद झालो. जर मला धोनीने आठवण करून दिली नसती, तर मी कदाचित माझे शतक पूर्ण करू शकलो असतो,’ असे गंभीरने सांगितले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply