Breaking News

निवडणुकीची हवा वाढतेय

राजकीय ’पिक्चर’ पाहूद्या की…

प्रत्येक दिवसासोबत लोकसभा निवडणूक अधिकाधिक जवळ येत चाललीय, नवा रंग, रूप घेऊ लागलीय आणि एकूणच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, माध्यम क्षेत्रातील माहौल अर्थात वातावरण बदलत चाललंय हे तुम्हीही अनुभवत आहात.
हाच मूड आहे अनेक प्रकारचे जुने व नवीन राजकीय चित्रपट पाहण्याचा, अनुभवण्याचा आणि शक्य तितके राजकारण समजून घेण्याचा. जुने अनेक राजकीयपट पुन्हा पुन्हा पहावेत असेही आहेत. यातील अनेक चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये ’राजकीय चित्रपटांचा महोत्सव’ म्हणून प्रदर्शित करता येतील. त्यानिमित्त या चित्रपटांचे दिग्दर्शक व अनेक कलाकारांना आमंत्रित करता येईल. काही चित्रपट मनोरंजक उपग्रह वाहिनीवर प्रक्षेपित करता येतील. त्या चित्रपटांची काही वैशिष्ट्य यानिमित्ताने रसिकांसमोर आणता येतील. ओटीटीवर काही राजकीयपटांना नक्कीच स्थान आणि मग चांगल्या प्रमाणावर प्रेक्षक मिळू शकतात. डिजिटल मीडियात राजकारण व राजकीय चित्रपट यावर मुलाखतीही घेता येतील. असे चित्रपट पाहण्यासाठीचे वातावरण सध्या वाढतेय. चित्रपट पाहण्याचा एक मूड असतो. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित सामना आणि सिंहासन हे मराठीतील उत्तमोत्तम कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी हे चित्रपट कधीच कालबाह्य होणारे नाहीत. सत्तरच्या दशकातील हे कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट स्वरूपातील चित्रपट असून त्यांचा ’गुणवत्तेचा रंग’ काही वेगळाच. तो कधीच बोथट न होणारा. असाच एक राजकीय पार्श्वभूमीवरील क्लासिक चित्रपट जे. ओम. प्रकाश निर्मित व गुलजार दिग्दर्शित ’आंधी’ (मुंबईत रिलीज 14 फेब्रुवारी 1975). ही खरंतर राजकीय नेता आरतीदेवी (सुचित्रा सेन) आणि त्यांचा पती (संजीवकुमार) यांच्या प्रेमाची गोष्ट. राजकारणात मुरलेल्या एका विवाहितेचे पतीशी असलेले नाते आणि राजकारणामुळे त्यांना एकमेकांचा सहवास कसा मिळवावा लागतो याची हळूवार गुलजार टच प्रेमकथा म्हणजे हा चित्रपट. हा चित्रपट समिक्षक, विश्लेषक, सिनेरसिकांची उत्तम दाद मिळवत असतानाच 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू झाली आणि याच्या प्रदर्शनावर बंदी आली. यातील सुचित्रा सेनने साकारलेली व्यक्तिरेखा तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर बेतली आहे हा यावरचा मोठाच आक्षेप होता. या चित्रपटातील गीत-संगीत (गुलजार आणि राहुल देव बर्मन) आजही लोकप्रिय आहे. इस मोड पे जाते है…, तुम आ गये हो…, तेरे बिना जिंदगी से कोई… एव्हरग्रीन गाणी. आजही ही गाणी ऐकली तरी मन प्रसन्न होते. आणीबाणीत सामना चित्रपटाचेही प्रदर्शन स्थगित करण्यात आले. पुणे शहरात हा चित्रपट 10 जानेवारी रोजी प्रभात चित्रपटगृहात दाखल झाला, पण आणीबाणीत विघ्न आले. 1977च्या सुरुवातीला म्हणजेच एकोणीस महिन्यांनंतर आणीबाणी उठल्यावर हे चित्रपट पुन्हा सेन्सॉरने पाहिल्यावर काही कटस सुचवले आणि मग ते पुन्हा प्रदर्शित झाले. आजही म्हणजेच चित्रपट रसिकांच्या तीन पिढ्या ओलांडूनही या चित्रपटांचा दबदबा कायम आहे. आणीबाणीतच रामराज नहाटा निर्मित किस्सा कुर्सी का या चित्रपटावर सेन्सॉरने बरेच कटस सुचवल्याची भरपूर चर्चा रंगली. ’सामना’ त्या काळातील ग्रामीण महाराष्ट्रातील वास्तवाचे दर्शन होते. विशेषतः सहकारी साखर कारखानदार सधन शेतकरी घेऊ लागले होते. हेच साखर कारखानदार साखरसम्राट बनू लागले होते. विजय तेंडुलकर यांच्या कथा-पटकथेवर निर्माते रामदास फुटाणे व दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी ’सामना’ची निर्मिती केली. गावातील सहकारसम्राट धोंडे पाटील (निळू फुले) व गांधीवादी मास्तर (डॉ. श्रीराम लागू) यांच्यातील मैत्री व वैराची ही कथा त्या काळात विलक्षण वादळी ठरली. ’सिंहासन’देखील त्या काळातील महाराष्ट्रातील राजकारणाचा पट आपल्यासमोर मांडतो. या चित्रपटाची घोषणेपासूनच बरीच उलटसुलट चर्चा रंगू लागली. हा चित्रपट अरुण साधू यांच्या ’मुंबई दिनांक’ आणि ’सिंहासन’ या दोन कादंबर्‍यावर आधारित हे विशेष. यावर विजय तेंडुलकर यांची पटकथा आणि प्रभावी संवाद. मंत्रिमंडळातील सत्तासंघर्ष व स्पर्धा. मुंबईतील अनभिषिक्त संपसम्राट कामगार संघटनेचा नेता डिकॉस्टा आणि मुख्यमंत्री यांच्यातील सामना राजकीय पत्रकार दीगू टिपणीस हे सगळे डावपेच, कुरघोड्या पाहून अचंबित होतो. अखेरीस तो हतबल होतो. त्यानंतर प्रत्यक्षातील काही राजकीय घटनांच्या वेळेस सोशल मीडियावर ’सिंहासन’मधील अनेक बोलकी दृश्य व्हायरल झाली. हा या चित्रपटाचा प्रभाव म्हणता येईल. अशा काही कलाकृती पडद्यावरून उतरल्या तरी अनेक संदर्भात त्यांचे अस्तित्व कायम असते. हीच या माध्यमाची ताकद आहे. अरुण सरनाईक यांनी साकारलेला मुत्सद्दी मुख्यमंत्री आणि निळू फुले यांनी साकारलेला चिकित्सक राजकीय पत्रकार यांची कायमच चर्चा होत असते.
नेक प्रकारचे राजकीयपट प्रत्येक काळात पडद्यावर आले. काही चांगले होते. काही वरवरचे होते. जे प्रभावी होते त्यांची कायमच दखल. 1984 साली कमालच झाली. दासरी नारायण राव दिग्दर्शित आज का एमएलए रामअवतार (या चित्रपटात राजेश खन्नाने साकारलेली मुख्यमंत्र्यांची भूमिका त्याच्या सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक…), टी. रामाराव दिग्दर्शित इन्कलाब (चित्रपटाच्या क्लायमॅक्सला अमिताभ बच्चन अतिशय संतापून मशिनगनने अख्खं मंत्रिमंडळ उडवतो याची बरीच उलटसुलट चर्चा रंगली), टी. रामाराव दिग्दर्शित यह देश (यातील कमल हसनची अदाकारी छान होती. ती कधी नसते?) हे चित्रपट त्या वर्षी अंतरा अंतराने प्रदर्शित झाले. तीनही चित्रपट दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचे रिमेक, पण हिंदी चित्रपटाच्या रसिकांना रूचले नाहीत. त्यामुळेच तिनही पिक्चर फ्लॉप. हे चित्रपट गल्ला पेटीवर यशस्वी ठरले असते, तर हिंदीत केव्हाच राजकीयपट रूजला असता. अनेक हिंदी चित्रपटात विविध प्रकारचे राजकीय नेते, मात्र एक व्यक्तीरेखा म्हणून कायमच दिसत आले. मग तो महेश भट्ट दिग्दर्शित ’सारांश’ असो असो अथवा राहुल रवैल दिग्दर्शित ’अर्जुन’ असो. हिंदीत अधूनमधून राजकीयपट अथवा राजकारणाची पार्श्वभूमी असलेले चित्रपट पडद्यावर येत असतातच. टीनू आनंद दिग्दर्शित ’मै आझाद हू’पासून रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ’सरकार’पर्यंत आणि एन. चंद्रा दिग्दर्शित ’नरसिंह’पासून ते रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ’सरकारराज’पर्यंत बरीच नावे सांगता येतील. यात आपण ’नेहरू’, ’ठाकरे’, ’मै अटल हू’ अशा चरित्रपटांचा समावेश करणे योग्य नाही. मराठीतही अनंत माने दिग्दर्शित ’गल्ली ते दिल्ली’पासून ते समीर विध्वंस दिग्दर्शित ’धुरळा’पर्यंत आणि संजय सूरकर दिग्दर्शित ’घराबाहेर’पासून गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ’शासन’पर्यंत आणि उज्ज्वल ठेंगडी दिग्दर्शित ’वजीर’ श्रावणी देवधर दिग्दर्शित ’सरकारनामा’पासून जयप्रद देसाई दिग्दर्शित ’नागरिक’पर्यंत अनेक चित्रपट पडद्यावर आले. काहींना उत्तम व्यावसायिक यशही प्राप्त झाले. काहींची फक्त चर्चाच होत राहिली. सध्याच्या आजूबाजूच्या राजकीय गरमागरमीत हे राजकीयपट पाहणे म्हणजेच वेगळी मेजवानीच. चित्रपट शौकीन व राजकारणात रस घेणारा वर्ग अशा दोघांनाही हे चित्रपट पुन्हा पहायची उत्तम संधी. या राजकीयपटातील काही गोष्टी सध्याच्या वातावरणात वेगळ्या वाटतील. काही गोष्टीचे संदर्भ लक्षात येतील. शहरी भागातील राजकारण आणि ग्रामीण भागातील राजकारण यातील फरक लक्षात येईल. पूर्वीचे तत्वधिष्ठित राजकारण आणि आजचे आयाराम गयारामचे राजकारण समजून येईल. जे जे राजकारणात आहे, त्याचे बरे वाईट प्रतिबिंब चित्रपटातून पडत असतेच. त्यात बरेचसे तथ्य असतेच. महाराष्ट्रातील राजकारण वेगळे आणि उत्तर प्रदेश, बिहारमधील वेगळे. दक्षिणेकडील तर भव्य कटआऊटसचे त्याहीपेक्षा वेगळे. हे सगळेच आपल्याला वेगवेगळ्या चित्रपटांतून दिसत आले आहे. सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवरील हे बरेचसे चित्रपट पुन्हा एकदा पाहण्याची मेजवानी कोणाला नको हो? हवीच आहे.

दिलीप ठाकूर- चित्रपट समीक्षक

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply