Breaking News

उत्तर भारतीय समाजाचे महायुतीला समर्थन

खासदार श्रीरंग बारणे यांना मतांची आघाडी द्या -डॉ. संजय पांडे

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जातपात, धर्म न मानता सर्वधर्मसमभाव जपणारे आणि अंत्योदयाचा विचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणे यांना मतांची आघाडी द्या, असे आवाहन भाजपचे उत्तर भारतीय प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय पांडे यांनी खारघर येथे उत्तर भारतीय समाजाच्या बैठकीत केले. या वेळी जोरदार घोषणा देत उत्तर भारतीय समाजाने समर्थन दिले.
खारघर येथे रविवारी (दि.28) झालेल्या या बैठकीस भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, माजी महापौर कविता चौतमोल, माजी नगरसेवक हरेश केणी, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजेश पटेल, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश ठोंबरे, उत्तर भारतीय समाजाचे प्रदेश सरचिटणीस संतोष गुप्ता, रायगड जिल्हाध्यक्ष संतोषकुमार शर्मा, उत्तर भारतीय समाजाच्या नेत्या संतोषदीदी, संतोष त्रिपाठी, राजेश पांडे, शैलेश सिंग, आर.पी. पांडे, आर.के. त्रिपाठी, अ‍ॅड. इंदू दुबे, दीपक शिंदे, अमर उपाध्याय यांच्यासह उत्तर भारतीय समाजाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बोलताना डॉ. संजय पांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राहुल गांधी अवमान करतात आणि उद्धव ठाकरे स्वागत करतात. यावरून उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व काय आहे ते स्पष्ट होते. बाळासाहेबांचा भाजपला नेहमी पाठिंबा राहिला, मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यालाही तिलांजली दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिकवण कायम आपल्या उराशी ठेवली आणि त्यामुळे श्रीरंग बारणे हे ओरिजिनल शिवसेनचे उमेदवार आहेत.
काँग्रेसने राजकारण करीत भारतातून काश्मिर वेगळे करण्याचा घाट घातला, मात्र पंतप्रधान मोदी सामर्थ्यामुळे काश्मिर भारताचे अविभाज्य घटक बनले आहे. स्वतः राजीव गांधी सांगायचे मी 100 रुपये पाठवले तर लाभार्थीकडे फक्त 15 रुपये पोहचायचे आणि काँग्रेसच्या दलालांकडे 85 रुपये जायचे, मात्र आता मोदीजींच्या दूरदृष्टीमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट 100 टक्के रक्कम पोहचत असून काँग्रेसच्या दलालांची दुकाने बंद झाल्याने केविलवाणी धडपड सुरु आहे. पूर्वीच्या पद्म पुरस्कारांची यादी पहा आणि मोदींच्या काळातील पहा. तळागाळातील काम करणार्‍या लोकांचा बहुमान मोदी सरकारने केला आहे. आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या हा संपूर्ण देशाचा गौरव आहे, मात्र येथेही काँग्रेसने त्यांचा अवमान केला यावरून काँग्रेसची नीती काय आहे हे स्पष्ट झाले. मोदीजींमुळे आपला देश जागतिक अर्थव्यवस्थेत 11व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आला आहे आणि यापुढे जगात तिसर्‍या क्रमांकावर झेप घेणार आहे. त्यासाठी त्यांना आपल्या मतांची ताकद देणे गरजेचे आहे, असे डॉ. पांडे म्हणाले.
500 वर्षांची राम मंदिराची प्रतीक्षा पंतप्रधान मोदींनी संपवली आणि अयोध्येत भव्य दिव्य मंदिर उभारले. वसुधैव कुटुंबकम मानून काम करणारे मोदीजी आहेत. संपूर्ण देश एकसंध आणि सुरक्षित ठेवण्याचे काम ते करीत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान कुणीही बदलू शकत नाही. असे असताना काँग्रेस आणि इतर विरोधक स्वार्थी राजकारणापोटी अपप्रचार करीत आहेत. त्यांच्या भूलथापांना कदापि बळी पडू नका, असे आवाहनही डॉ. पांडे यांनी केले.
या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना या विभागात मेट्रो, विमानतळ, अटल सेतू, रस्ते, वीज, मूलभूत सुविधा देण्यासाठी नेहमी आग्रही राहिलो आहे आणि अशा सर्व कामांची माहिती विकासपर्व या माझ्या पत्रकात मांडली आहे, मात्र ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे त्यांना हा विकास कसा दिसणार? लोकांची जास्तीत जास्त कामे झाली पाहिजेत यासाठी आम्ही आग्रही असतो, परंतु निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना बोलायला मुद्देच नाहीत. म्हणून विरोधकांकडून खोडसाळपणा सुरू असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
अडीच वर्षात ठाकरे सरकार निरुत्साही राहिले. त्यामुळे राज्याचा विकास त्यांच्या काळात खुंटलाम मात्र खासदार श्रीरंग बारणे लोकांची कामे करीतच होते. म्हणूनच त्यांचा सहावेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मान झाला आहे. दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची मोठी प्रगती केली. विकासाचा वेग अधिक करण्यासाठी मोदीजींच्या रूपाने खासदार श्रीरंग बारणे काम करणार आहेत. त्यामुळे धनुष्यबाण निशाणी लक्षात ठेवून प्रचंड मतांनी त्यांना विजयी करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करीत आहेत. त्यांच्यामुळे देश सुरक्षित आहेत. एकीकडे मोदीजी सामर्थ्यवान नेता म्हणून जगात प्रसिद्ध आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध झाले आहेत.
-संतोष गुप्ता, प्रदेश सरचिटणीस, उत्तर भारतीय मोर्चा

जो राम को लाये है उनको आगे लाना है. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच आम्हा सर्व भगिनींना पुढे नेण्याचे काम केले आहे. त्यामुळे आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत.
-संतोषदीदी, उत्तर भारतीय समाजाच्या नेत्या

आता हॅट्ट्रिक सरकार बनणार आहे. 2024चा विजय झाला आहे, 2029ची तयारी सुरू आहे. पनवेलच्या विकासाचा आलेख उंचवण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले असून त्यांच्या नेतृत्वात काम करीत आहोत याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आप्पा बारणे यांना खासदार करायचे आहे.
-संतोषकुमार शर्मा, जिल्हाध्यक्ष, उत्तर भारतीय मोर्चा

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply