Breaking News

सरफरोश @ २५; मैं अपने मुल्क को अपना घर समजता हू.. 

नव्वदीच्या दशकात शेजारी राष्ट्रांतून काही गझल गायक भारतात आपल्या गझल गायकीच्या कार्यक्रमासाठी / मैफिलीसाठी येत आणि मुंबई, दिल्ली, जयपूर, हैदराबाद इत्यादी अनेक शहरांत त्यांचे कार्यक्रम होत. नवश्रीमंत व उच्चभ्रू वर्ग त्यांचा मोठाच श्रोता. त्यांच्या गझल गायकीने अनेक संगीत शौकीन मंत्रमुग्ध होत. गुलफाम हसन (नसिरुद्दीन शहा) देखील असाच गझल गायक पाकिस्तानातून भारतात येऊन लोकप्रिय झालेला, पण त्याचा तो ‘मुखवटा’ असतो. त्याचा खरा चेहरा वेगळाच असतो. त्याने येथे राजस्थानच्या सीमाभागातून पाकिस्तानच्या शस्त्रास्त्रांना भारतात आणण्याचा डाव सुरू ठेवलेला असतो. त्यात उंटाचा अतिशय चलाखीने वापर करण्यात येत असतो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयसिंग राठोड (आमिर खान) हे सगळे हुशारीने विणलेले जाळे, चलाख गुन्हेगारी कशा पध्दतीने उध्वस्त करतो याची उत्तरोत्तर रंगत जाणारी क्लासिक कलाकृती म्हणजे, जॉन मॅथ्यूज मथान दिग्दर्शित सरफरोश. (मुंबईत रिलीज ३० एप्रिल १९९९) च्या प्रदर्शनास खणखणीत पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत. देशभक्तीवरील एक वेगळा चित्रपट म्हणूनही हा चित्रपट ओळखला जातो. आजही हा चित्रपट तेवढाच प्रभावी वाटतो. आपल्याला गुंतवून ठेवतो. कितीही वेळा हा चित्रपट पाहिला तरी तोच प्रभाव. याचे कारण, त्याची वेगळी थीम आणि सतत टर्न आणि द्विस्ट असलेली पटकथा व त्याची मांडणी. चित्रपटाची सुरुवात अजय आणि सीमा (सोनाली बेन्द्रे) यांच्या नवी दिल्लीतील कॉलेजमधील प्रेमाच्या गोड गोड गोष्टीने होते. त्यात प्रेमगीतांचा गोडवा, शिडकावा मिळतो. आणि एकदा अचानक अजय हा पोलीस असल्याचे समजताच सीमाला पडद्यावर आणि आपल्याला बसल्या जागी धक्का बसतो. चित्रपट येथून जे वळण घेतो ते अनेक गोष्टींसह रोमांचकता, उत्सुकता वाढत वाढत नेतो…

दिग्दर्शक जॉन मॅथ्यूज मथानचा हा पहिलाच चित्रपट आणि त्याने प्रस्थापितांना चांगलाच धक्का दिला. त्याची गरज असतेच. अशा कसदार कलाकृतीमागे अतिशय छोट्या छोट्या गोष्टींसह बरीच मेहनत असते. जॉन मॅथ्यूज मथानचे प्रगती पुस्तक कौतुकास्पद आहे. रिचर्ड टनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ (१९८३) च्या वेळेस जॉन सेकंड युनिट सहाय्यक दिग्दर्शक होता. मग आक्रोशच्या वेळेस दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचा सहाय्यक दिग्दर्शक होता. त्यानंतर त्याने जाहिरातपटांवर लक्ष केंद्रित केले. अवघ्या काही सेकंदात एकाद्या उत्पादनाची अतिशय प्रभावी जाहिरात करणे यात बरीच कल्पकता, कसब व कौशल्य असते. अशातच १९९२-९३ साली मुंबईत जातीय दंगल आणि मग बॉम्बस्फोट झाले. सर्वांसाठीच हा चिंतेचा विषय होता. त्याच सुमारास जॉन मॅथ्यूज जाहिरातपटाच्या कामानिमित्त दिल्लीत गेला असता संध्याकाळी खूपच लवकर होत असलेल्या शांततेने, त्यातील अनामिक तणावाने तो अंतर्मुख झाला. या सगळ्यातून त्याला कथाआशय सुचत गेला. तो डेव्हलप करायला वेळ गेला. त्या काळात जॉन मॅथ्यूज गाडीने रस्ता मार्गाने उत्तर भारतात भरपूर फिरला. त्यातून अनेक संदर्भ सापडत गेले. जॉन वास्तववादी चित्रपटाचा विलक्षण चाहता. मनोरंजनाची चौकट सांभाळून आपणही वास्तवाच्या जवळ जाणारा चित्रपट निर्माण करावा हे त्याने पक्के ठरवले होते. १९९५ साली त्याने आमिर खान बराच बिझी असताना त्याची अर्ध्या तासाची भेट मागितली. आमिरची त्या काळात रोमॅन्टीक हीरो अशी इमेज होती. त्याला ‘सरफरोश’ एक नवीन रुपाची संधी होती. गोष्ट ऐकताना आमिरने जॉन मॅथ्यूजला तीन तास दिले. सोनाली बेन्द्रेने जॉन मॅथ्यूजच्या अनेक जाहिरातीसाठी मॉडेलिंग केले असल्याने तिची निवड पक्की होती. जॉन मॅथ्यूजनेच तिचं प्रवीण निश्चलला ‘इंग्लिश बाबू देशी मेम साठी नाव सुचवले आणि ती मॉडेलिंगकडून चित्रपटात आली. शाहरुख खान त्यात तिचा नायक  होता. तो चित्रपट सेटवर जाईपर्यंत सोनालीने भरत रंगाचारी दिग्दर्शित ‘टक्कर’ (सुनील शेट्टी व नसिरुद्दीन शहासोबत) आणि के. रवि शंकर दिग्दर्शित ‘आग’ (गोविंदासोबत) साईन केले. चित्रपट निर्मितीत ‘पडद्यामागे’ अशा अनेक गोष्टी घडत बिघडत असतात. त्या खूप रंजक असतात. प्रश्न होता, आमिरपेक्षा सोनाली उंच तर ठरणार नाही? ते तर उघडपणे दिसतेय. पडद्यावरही तसेच दिसून कसे  चालेल? पब्लिकचे फार लक्ष असते. ‘सरफरोश’ रिलीज झाल्यावर सोनालीच्या मुलाखतीचा मला योग आला असता तिने सांगितलं, ते सर्वांच्याच लक्षात आले. म्हणून एकदा जॉनच्या घरच्या पार्टीत  आम्हा दोघांना जवळ उभे करून कसे दिसतेय, उंचीत फरक आहे का  हे अजमावून पाहिले असता, तसा काही विशेष फरक जाणवत नव्हता आणि मग चित्रपट पाहतानाही तसा उंचीतील फरक वगैरे दिसत नाही.जॉन मॅथ्यूजने व्यक्तीरेखेनुसार एकेक कलाकार निवडायला सुरुवात केली. नसिरुद्दीन शहाला पोलीस इन्स्पेक्टर सलीमच्या भूमिकेसाठी विचारले असता त्याने म्हटले, नको. कारण आपण अशी भूमिका साकारलीय. काही वेगळे असेल तर सांग. गुलफाम हसनची भूमिका मग त्याला मिळाली. ती त्याने उत्तम वठवलीय. बराच काळ त्याचा संशय येत नाही हेच तर विशेष. इन्स्पेक्टर सलीमसाठी आमिरनेच मुकेश ऋषिचे नाव सुचवले. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित बाझी मध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते. वल्लभ व्यास (मेजर अस्लम बेग), अखिलेन्द्र मिश्रा (मिर्ची सेठ), मकरंद देशपांडे (शिवा), मनोज जोशी (एस. पी. बैजू), प्रदीप रावत (सुल्तान), राजेश जोशी (बाला ठाकूर), स्मिता जयकर (अजयची आई), आकाश खुराना (अजयचे वडील) तसेच नवाऊद्दीन सिद्दीकी (तोपर्यंत त्याला ओळख मिळाली नव्हती), सुरेखा सिकरी, सुकन्या मोने, जयवंत वाडकर, अशोक लोखंडे, सुनील शेंडे, हिमायत अली, डिंपल इनामदार इत्यादींच्या भूमिका आहेत. गोविंद नामदेव यांनी साकारलेली वीरन ही व्यक्तीरेखा वीरप्पनची आठवण करून देणारी होती.

चित्रपटाने निर्मितीवस्थेत बराच काळ घेतला पण कलाकृती अतिशय स्फोटक आणि प्रभावी अशी पडद्यावर आली. तेच तर महत्वाचे असते. चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीवरून त्यात काय आहे अथवा असावे याचे आकलन होत नव्हते. तोपर्यंत आगामी चित्रपटाबाबत अवाजवी मिडिया हाईप दिला जात नसे. चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण होईल असे वातावरण तयार होई आणि त्यात लोकप्रिय गीत संगीताची साथ मिळत असे. (त्या काळात रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सत्या’, शेखर कपूर दिग्दर्शित ‘बॅण्डिक्ट क्वीन’ या चित्रपटांबाबत अगदी असेच घडले. चित्रपट जास्त सांगेल वा बोलेल यावर भिस्त होती. आता नवीन चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याबद्दल इतकं नि असे सांगितले जाते की त्या चित्रपटाचे तिकीट काढून थिएटरमध्ये जाण्याची गरजच राहत नाही.) सेन्सॉरने चित्रपटातील पाकिस्तान, आयएसआय या उल्लेखांना हरकत घेतली होती, पण ते कापले तर चित्रपटाचा मूळ हेतू बोथट होईल असे जॉन मॅथ्यूजने पटवून दिले. येथे दिग्दर्शक दिसतो.
चित्रपट प्रदर्शनास सज्ज होत असतानाच त्याच्या गाण्याची ध्वनिफीत रसिकांसमोर आली तीच गाणी लोकप्रिय झाली. विशेषतः होशवालो को क्या खबर ही नीदा फाजलीची जगजितसिंग यांनी गायलेली गझल अप्रतिम. संगीत जतिन ललितचे. या चित्रपटातील इस दीवाने लडके को (पार्श्वगायक अमितकुमार व अलका याज्ञिक), जो हाल दिलका (कुमार शानू व अलका याज्ञिक), ये जवानी हद कर दे कविता कृष्णमूर्ती) ही गाणी समीरने लिहिली होती. जिंदगी मौत ना बन जाऐ हे इसरार अंसानी लिखित गाणे सोनू निगम व रुपकुमार राठोड यांनी गायले. या गाण्याने चित्रपटाचा देशभक्तीचा परिणाम आणखीन गडद होतो. प्रभावी व बोलके संवाद हेदेखील या चित्रपटाचे वैशिष्ट्य. मैं अपने मुल्क को अपना घर समजता हू, क्या ठाकूर तेरे को कितनी बार बुलाया तू आता नही इत्यादी, पण सर्वाधिक महत्वाचा ठरला इन्स्पेक्टर सलीमचा संवाद, फिर कभी किसी सलीम को मत कहना… यह मुल्क उसका नहीं… मुकेश ऋषि या एका संवादाने जास्त फोकसमध्ये आला (प्रियदर्शन दिग्दर्शित ‘गर्दीश’, आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘बाझी’ आणि हा ‘सरफरोश’ हे त्याला चित्रपटसृष्टीत स्थिरावण्यातील महत्वाचे टप्पे) खरं तर या भूमिकेसाठी अमरीश पुरी अथवा नाना पाटेकर यांची निवड होऊ शकली असती असे त्याला वाटले, पण आपली झाली म्हणजेच ही भूमिका अधिकच वेधक करण्यातील आपली जबाबदारी वाढली. या भूमिकेचा अनुभव त्याला बरेच काही देणारा ठरला. सिनेमा हिट झाल्यावर हिंदीत बऱ्याच ऑफर येतील असे अजिबात झाले नाही. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांच्या मात्र ऑफर आल्या.
चित्रपट असा व इतका हिट होईल याची जॉन मॅथ्यूज मथानला खात्री नव्हतीच. चित्रपटाचे कौतुक होईल, बर्यापैकी यश प्राप्त होईल असे वाटले होते. पब्लिकचा रिस्पॉन्स पाहण्यास तो दक्षिण मध्य मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात गेला असता तो विलक्षण सुखावला. हाऊसफुल्ल गर्दी चित्रपटात गुंतली होती. टाळ्या आणि शिट्यांनी प्रतिसाद देत होती. आणि अशातच कारगिल युद्धाने वातावरण बदलून गेले. ‘सरफरोश’मधील अनेक गोष्टी त्याच युद्धात जाणीव करुन देत होत्या.
हे युद्ध आपण जिंकले, तसेच हा चित्रपटही रसिकांनी आपलासा केला. देशभक्तीवरील चित्रपटात पूर्वीचा मसालेदार मनोरंजनाचा फंडा यात नव्हता. एव्हाना दिग्दर्शक व रसिकांचीही नवीन पिढी आली होती. ती अधिक चौकस होती. त्यांना असेच काही वेगळे हवे होते. ‘सरफरोश’ म्हणूनच ग्रेट कलाकृती ठरली. याच चित्रपटापासून आमिर खानने चित्रपट निवडीत चोखंदळपणा आणि संख्येत नेमकेपणा आणला. सोनाली बेन्द्रेसाठी हे यश महत्वाचे ठरले. तिने ग्लॅमरस भूमिकाच साकारलीय पण चित्रपट वेगळा होता हे जास्त महत्वाचे.
‘सरफरोश’ची प्रसार माध्यमातून आणि चित्रपट रसिकांत भरपूर चर्चा झाली ते यश वेगळेच. या चित्रपटाची एक वेगळीच आठवण. मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांसाठी महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओतील मिनी थिएटरमधील शोच्या वेळेस तासाभरातच अचानक वेगळ्याच घटना दिसू लागल्या… थोड्याच वेळात लक्षात आले की, मध्यंतरनंतरचे रिळमध्येच लागलयं… चूक दुरुस्त करून मग सिनेमा पुढे गेला. एक आठवण अशीही.

– दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

 

 

 

 

 

 

 

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply