पनवेल : रामप्रहर वृत्त

रविवारची (दि. 3) संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक संघात रंगलेल्या गजल मैफिलीने पनवेलसाठी खास ठरली. निमित्त होते पुस्तक प्रकाशन सोहळा आणि ‘अक्षयाची पालखी’ या गजल मैफिलीचे. शहादा नंदुरबार येथून आलेल्या प्रा. डॉ. सतीश भांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी संगीतबद्ध केलेल्या ए. के. शेख यांच्या गजलांनी कार्यक्रमात बहार आणली. नसीमा फाऊंडेशन व पार्वती साहित्य कला निकेतन यांनी आयोजित केलेल्या आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ए. के. शेख यांचे ‘छंदाक्षरी’, रोहिदास पोटे यांचे ‘यशाची शिखरे’, तसेच पनवेलमधील निवडक 15 गजलकारांचा प्रातिनिधिक संग्रह ‘गजलवेल’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रसिद्ध उद्योजक जे. एम. म्हात्रे उपस्थित होते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, गजलनवाज भीमराव पांचाळे उपस्थित होते. या वेळी प्रकाशित पुस्तकांवर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. इक्बाल शेख, प्रा. डॉ. अक्रम पठाण, प्रा. डॉ. मनीषा बनसोडे, प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी सुंदर आणि नेमके भाष्य केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘गजलवेल’मधील 15 गजलकारांचा मुशायरा रंगला. या वेळी ए. के. शेख, रोहिदास पोटे, दिवाकर वैशंपायन, सुनीती साठे, सदानंद रामधरणे, आबीद मुन्शी, डॉ. अविनाश पाटील, मीनल वसमतकर, संदीप बोडके, रंजना करकरे, पूजा नाखरे, प्रभाकर गोगटे, गणेश म्हात्रे, सतीश अहिरे यांनी आपल्या गजल सादर केल्या. यानंतर सतीश भांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी सादर केलेल्या गजल मैफिलीला ‘सदाचार संकल्प संकल्पना दे’ या गजलने सुरुवात झाली. ‘डाव मित्राचेच होते नेमके’, ‘तू मला भेटू नको नाराज असल्यासारखी’, ‘अमृताची अक्षराची अक्षयाची पालखी’, ‘दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे’, ‘वळते बघते नुसते हसते आश्चर्यच ना’ आशा एकापेक्षा एक सदाबहार गजल सादर केल्यानंतर ‘पोचव मजला पैलतीरावर या अल्लाह’ या गजलने मैफिलीची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजलकार समीर शेख यांनी केले.