Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची मान जगात उंचावली -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल ः प्रतिनिधी

देश कोणाच्या हातात द्यायचा, कोणाच्या हातात सुरक्षित राहील आणि देशाचा कारभार कोण चांगल्या पद्धतीने चालवेल यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. ते पाहता गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची मान जगात उंचवण्याचे व देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे या देशात पंतप्रधान मोदींशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. ते शनिवारी (दि. 27) करंजाडे येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. या अंतर्गत शनिवारी उरण भेट दौरा आणि बाईक रॅलीचे आयोजन उरण मतदारसंघात करण्यात आले होते. याची सांगता रात्री करंजाडे येथे सभेने झाली. या सभेस भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि.बा.पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, नाथाभाई भरवाड, बळीराम म्हात्रे, प्रवीण खंडागळे, मंगेश वाकडीकर, सुनील माळी, सुषमा मयेकर, राणी म्हात्रे, शिल्पा म्हात्रे, सिद्धेश पावले यांच्यासह राष्ट्रवादी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी, रासप, मनसे मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे आपल्या भाषणात म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवून जम्मू काश्मीरचा प्रश्न निकाली काढला. या आधीचे सरकार तेथील तरुणांना काम देण्याऐवजी 500 रुपये देऊन हातात दगड देत दंगे घडवित होते. आज दगड घेणार्‍या तरुणांच्या हाताला मोदी सरकारने काम दिले, त्यांना विश्वास दिला, रोजगार उपलब्ध करून दिला, तेथे स्मार्ट सिटी वसवण्याचे काम सुरू केले. विरोधी पक्षांचे नेते एका व्यासपीठावर येतात, पण त्यांचे विचार जुळत नाहीत. तरीही सातत्याने खोटे बोलून ते समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करतात. ब्रिटीशांनी केलेले कायदे बदलून न्याय देण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींनी केला, मात्र विरोधक संविधान बदलण्याबाबत भाषा करतात. संविधान कोणीही बदलू शकणार नाही हे माहीत असताना दिशाभूल करतात. ज्यांच्याकडे दाखवण्यासारखे काही नसते, स्वत:ची कामे नसतात ते टीका करतात. खासदार बारणे यांनी पुढे बोलताना या परिसरातील समस्या आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी शंभर टक्के सोडवतील. लोकसभेचा या भागाचा प्रतिनिधी म्हणून जिथे जिथे माझी गरज लागेल तेथे तुम्हाला मदत करीन, अशी ग्वाही दिली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले की, 4 जूनला आपण सर्व जण मिळून अब की बार चारसो पार हा नारा खरा करून दाखवणार आहोत. त्यासाठी सज्ज झाल्याबद्दल सर्वांचे आभार. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत जे काम केले आहे ते यापूर्वी झाले नाही. 2014मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधानपदासाठी उभे राहिले तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. जी व्यक्ती गुजरातचे भले करू शकते ती आपलेसुद्धा भले करू शकते हा विश्वास लोकांच्या मनात होता. त्यामुळे उम्मिद से विश्वास तक हा पहिला टप्पा होता. आज विश्वास से गॅरेंटी तक हा टप्पा आहे. पंतप्रधान मोदींचा शब्द म्हणजे गॅरेंटी ही खात्री झाली असून हीच गॅरेंटी लोकांपर्यंत पोचवायला आपण सिद्ध झालो आहोत.
पंतप्रधान मोदींबद्दलचा विश्वास आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, तोच विश्वास राज्यात महायुतीबाबत निर्माण झाला आहे. मोदीजी शब्द देऊन थांबत नाहीत, तर दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात, घाम गाळतात, रक्त आटवतात, पण दिलेला शब्द खरा करतात. म्हणून गावागावात गॅस कनेक्शन, शौचालय, पक्की घरे देण्यास सुरवात झाली. शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा होत आहे.
करंजाडेमध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत एमजेपीची पाण्याची योजना कार्यान्वित होऊन ही समस्या सुटेल. नवी मुंबई विमानतळ होण्यासाठी सर्व परवानग्या केंद्र सरकारकडून आणायला पाहिजेत व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आदर्श पद्धतीने झाले पाहिजे ही जिद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरली. म्हणून 10 गावांचे व वाड्यांचे पुनर्वसन होत आहे. हा प्रश्न आमदार महेश बालदी व खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नाने पूर्ण होत आला आहे. विमानतळामुळे एक टक्का जीडीपी वाढणार आहे तसेच उद्योग व उपलब्ध होणार्‍या नोकर्‍या येथील तरुणांना मिळणार आहेत. त्यासाठी देशाचे योग्य नेतृत्व हवे असेल, तर महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांना विजयी करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले
आमदार महेश बालदी यांनी करंजाडेतील पाणी, रस्ते, गटारे, उद्यान समस्या तुमची नसून आमची असून ती सोडवण्याची ग्वाही दिली. नागरीकरण वाढते तेव्हा समस्याही वाढतात. आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष झाले तेव्हा येथे जनता दरबार घेऊन सेक्टर 6चा पाण्याचा प्रश्न सोडवला. 28 कोटी रुपयांचे रस्ते झाले तसाच लवकरच येथील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, कारण आमच्या पक्षाचे सरपंच मंगेश शेलार यांना येथील प्रश्नांची जाण आहे. केंद्रात, राज्यात आमचे सरकार असल्याने हे प्रश्न सोडवणे ही आमची जबाबदारी आहे व ती आम्ही कधीही टाळणार नाही असे सांगून त्यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार आहेत. त्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून द्या, असे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशासाठी जे चांगले निर्णय घेतले त्याला खासदार श्रीरंग बारणे यांनी वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. यापुढेही देशाच्या विकासासाठी, देशाला जागतिक पातळीवर पुढे नेण्यासाठी मोदी सरकार या देशात आले पाहिजे याकरिता आपले मत खासदार बारणे यांना देऊन त्यांना विजयी करूया, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले.
प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावे यासाठी आपण नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणे गरजेचे आहे. याकरिता सर्वांनी महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांना विजयी करावे, असे आवाहन ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील यांनी केले.
या सभेला मुस्लिम महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. मूळचे कोलकाता येथील व सध्या करंजाडेत राहत असलेले परेश चक्रवर्ती खास वेशभूषा करून सभेला आले होते. ते म्हणाले, हमे मोदीजी अच्छे लगते है. एकदम स्ट्राँग प्रधानमंत्री है. इस बार चारसो पार जरूर होंगे तो हमारी छाती 64 इंच होगी. अपने देश को सब जगह सफलता मिलेगी.
सभेस उपस्थित गौतमी चौधरी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मोदी सरकारमुळे देशात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, जो पूर्वी नव्हता. अनेक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. ते आणखी चांगले करतील याची खात्री वाटते. करंजाडेमध्ये आताच्या सरकारमुळे रस्ते झाले. पाण्याचा प्रश्न सोडवला जात आहे. इतर सुविधाही देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम्हाला मोदीजी पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे वाटते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply