मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यात झालेल्या वादळामुळे वीज मंडळाचे सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. 250हुन जास्त विद्युत खांब, तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरसुद्धा निकामी झाले असल्याने वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान 15 दिवसांचा अवधी लागेल, असे मुरूड वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी म्हटले आहे.
वादळ झाल्यापासून मुरूड तालुक्याचा वीजपुरवठा खंडित आहे. कर्मचारी वृंदाची जास्त कुमक मागवून येथील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी मानव अधिकार संघटनेचे उपाध्यक्ष जाहिद फकजी, मुरूड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय करडे, सदस्य गणेश चोडणेकर, नबील उलडे यांच्या शिष्टमंडळाने वीज मंडळाच्या कार्यालयात जाऊन चर्चा केली. त्या वेळी उपकार्यकारी अभियंता येरेकर सद्यस्थिती विषद केली. त्यांनी सांगितले की, भालगाव व काशीद येथील वीज वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मुख्य वाहिनीवरील सुमारे 100पेक्षा अधिक पोल पडले आहेत. पाबरे येथून वीजपुरवठा सुरळीत करीत मुरूड शहरातील दत्त मंदिर परिसराकडे आमचे कर्मचारी आगेकूच करीत असून, लवकरच मुख्य वहिनीचे मजबुतीकरण करीत आहोत. यासाठी स्थानिक ठेकेदार व वीज मंडळाने नियुक्त केलेला ठेकेदार यांची मदत घेण्यात येत आहे.