Breaking News

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो साऊंड सिस्टीमपासून सुपर साऊंड सिस्टीमपर्यंत, चित्रपटाच्या रिळापासून डिजिटलपर्यंत… असा भरपूर नि भारी प्रवास करताना त्यात एक गोष्ट कायम राहिली, ती म्हणजे प्रेम.
त्याला तुम्ही प्रेम म्हणा, प्यार म्हणा, मोहब्बत म्हणा, इश्क म्हणा, लव्ह म्हणा काहीही म्हणा. चित्रपटाचे नाव, संवाद, गाणी, प्रतिकात्मक दृश्य, पोस्टर यातून अखंडपणे/प्रचंडपणे वाहणारी गोष्ट म्हणजे, प्रेम, प्रेम, प्रेम. प्रेमाचा रसगुल्ला, प्रेमाचा रस, प्रेमाच्या आणाभाका, प्रेमाचा मुरंबा असे झालेच, पण कधी आंतरजातीय, आंतरराष्ट्रीय, आंतरधर्मीय असेही प्रेम रुपेरी पडद्यावर आले. कधी प्रेमपटात गरीब व श्रीमंत दरी, कधी चित्रपटाच्या शेवटी ’प्रेम विवाह’ अर्थात ’लव्ह मॅरेज’ (चित्रपटाचा शेवट गोड तर सगळेच गोड), तर कधी प्रेम त्रिकोणाची थीम (अंदाज, संगम, सागर, साजन वगैरे), कधी क्लायमॅक्सला शोकांतिका. (उदाहरणार्थ ’एक दुजे के लिए’) अशा प्रेमाच्या नाना तर्‍हा हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर येतच राहिल्या. काही धो धो चालल्या, तर काही पडदाही विसरला.
असाच एक ग्लॅमरस प्रेमपट सुरेश प्रॉडक्सन्सचा (चैन्नई. तेव्हाचे मद्रास) डी. रामा नायडू निर्मित व के. एस. प्रकाशराव दिग्दर्शित ‘प्रेम नगर’ याच प्रेमरंग/प्रेमरस परंपरेतील चित्रपट. मुंबईत रिलीज 24 मे 1974. म्हणजेच 50 वर्षे पूर्ण झालीदेखील. काळ किती वेगाने पुढे सरकला बघा.
प्रेमाची ही गोष्ट अतिशय आकर्षक, देखण्या थाटामाटातील राजमहालातील. अतिशय भपकेबाज. तात्कालिक चित्रपट समिक्षकांनी त्याचीच एक प्रकारे खिल्ली उडवली. ’दिसायला देखणा पण शोभेचा चित्रपट’ असे त्या काळातील चित्रपट समिक्षकांचे मत होते. त्या काळात चित्रपट समिक्षकेला खूपच मोठ्या प्रमाणावर वाचक आणि विश्वासार्हता होती. त्यांनी आनंद बक्षी यांची गीते व सचिन देव बर्मन यांच्या संगीताची केलेली तारीफ रसिकांना चित्रपट पाहण्यास उपयुक्त ठरली. पिक्चर हिट व्हायला तेवढेही पुरायचे. राजेश खन्ना व हेमा मालिनी ही देखणी रोमॅन्टिक जोडीही छान जमली/शोभली होती. राजेश खन्नाच्या ’आराधना’, ’दो रास्ते’, इत्तेफाक, ’सच्चा झूठा’, कटी पतंग’, ’हाथी मेरे साथी’, अपना देश, सफर, आनंद, अमर प्रेम इत्यादी ओळीने ज्युबिली हिट झंझावाताला मेहबूब की मेहंदी, दिल दौलत और दुनिया, जोरु का गुलाम, शहजादा, हमशक्ल, मेरे जीवन साथी, शहजादा, मलिक, छोटी बहू वगैरे फ्लॉपने राजेश खन्नाची लय बिघडली. काय घडतंय तेच समजत नव्हते. ती पडझड सावरली 1973च्या यश चोप्रा दिग्दर्शित ’दाग’, 1974मधील जे. ओम प्रकाश दिग्दर्शित ’आप की कसम’, शक्ती सामंता दिग्दर्शित ’अजनबी’, के. एस. प्रकाशराव दिग्दर्शित ’प्रेम नगर’ आणि मनमोहन देसाई दिग्दर्शित ’रोटी’ या चित्रपटांच्या यशाने. तरी 1975 साली राज खोसला दिग्दर्शित ’प्रेम कहानी’ला अपेक्षित यश न मिळाल्याने राजेश खन्नाचा ’पडता काळ’ असा काही सुरू झाला की, हाच तो राजेश खन्ना, ज्याचा चित्रपट प्रदर्शित होतो तो ज्युबली हिट होण्यासाठीच असा प्रश्न निर्माण झाला. आजही त्याच्या यशाच्या झंझावाताला अपयशाने झाकून टाकल्याची चर्चा रंगते.
दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटाच्या हिंदीतील रिमेक परंपरेतील हा एक. 1969च्या ’विचित्र कुटुंबम्’ या तमिळ भाषेतील चित्रपटाचा हा रिमेक. प्रशस्त श्रीमंत महालातील बडे कुंवर समशेर सिंग (प्रेम चोप्रा) आणि छोटे कुंवर करणसिंह (राजेश खन्ना) हे दोन भिन्न प्रवृत्तीचे सख्खे भाऊ. समशेर सिंग व त्याच्या महत्त्वाकांक्षी पत्नीचा (बिंदू) या विशाल रंगमहालाच्या संपत्तीवर डोळा, तर करणसिंह गुलछबू. दारुचा प्रचंड व्यसनी. अगदी विमान प्रवासातही आपली हौस मौज एन्जॉय करणारा. एकदा तो लताला (हेमा मालिनी) तिच्यावर जबरदस्ती करू पाहणार्‍यापासून वाचवतो. तिला आपल्याच महालात आश्रय देतो. ती आता या महालात रितीरिवाजांना खूप महत्त्व देते. तिचे वागणे रानी मॉला (कामिनी कौशल)ना प्रभावित करते. त्यातून करणसिंह व लताची जवळीक वाढते. एकमेकांचे स्वभाव आवडतात, सहवास हवाहवासा वाटतो. ते एकमेकांवर प्रेम करू लागतात. करणसिंह आपल्या प्रेमाचे प्रतिक म्हणून एक भव्य शीशमहल उभे करतो. प्रेम नगर है यह अपना. लता अतिशय प्रेमाने करणसिंहचे दारुचे व्यसन सोडवते. यह लाल रंग कब मुझे छोडेगा यातून तो बाहेर पडतो आणि आता हे दोघे मिळून शमशेरसिंग व त्याच्या पत्नीचा कुटील डाव हाणून पाडतात. चित्रपटात अशोककुमार, तसेच सुलोचनादीदी, नासिर हुसेन (हे दोघे लताचे आई वडील), रमेश देव (लताच्या भावाच्या भूमिकेत), मनमोहन, असरानी, अरुणा इराणी, नाना पळशीकर, डेव्हिड इत्यादींच्या प्रमुख भूमिका.. छायाचित्रणकार ए. विसेंट यांनी अतिशय देखणेपणाने हा चित्रपट दाखवला.
त्या काळात चित्रपट पूर्ण होता होताच त्याची तबकडी म्युझिक मार्केटमध्ये येत आणि ती श्रवणीय असतील तर अशी काही सुपरहिट होत की, कधी एकदा हा चित्रपट प्रदर्शित होतोय नि ही सुपरहिट गाणी पाहतोय असे होऊन जाई. बाय बाय मे गुड नाईट फिर कब मिलोगे (पार्श्वगायक किशोरकुमार), ये थंडी हवाये मे (आशा भोसले व किशोरकुमार), यह कैसा सूरमंदिर है (लता मंगेशकर), जा.. जा…जा मुझे ना अब याद आ (किशोरकुमार), यह लाल रंग कब मुझे छोडेगा (किशोरकुमार), प्रेम नगर है यह अपना (लता मंगेशकर व किशोरकुमार) अशी सगळीच गाणी लोकप्रिय म्हटल्यावर पिक्चरला फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच हाऊसफुल्ल गर्दी व्हायलाच हवी.
मुंबईत मेन थिएटर ड्रीमलॅन्डला पिक्चरने खणखणीत 25 आठवडेबाजार मुक्काम केला.
सुरेश प्रॉडक्सन्सचे निर्माते डी. रामानायडू यांनी चित्रपट निर्मितीचे केवढे तरी सातत्य ठेवले.. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट निर्मात्यांच्या अनेक खासियतीमधील ते एक. त्यांनी तमिळ, कन्नड, मल्याळम, तेलगू भाषेतील चित्रपटांबरोबरच मराठी, हिंदी, बंगाली, उडिया, गुजराती, भोजपुरी, असामी, पंजाबी या भाषेतील चित्रपटांचे सातत्याने निर्मिती केली. चित्रपट निर्मितीत स्वत:ला वाहून घेणे म्हणजे काय हेच यातून दिसतेय. करिश्मा कपूरला प्रेम कैदी (दिग्दर्शक मुरली मोहन राव) मधून पहिला ब्रेक त्यांनीच तर दिला. हरिश तिचा नायक होता. बंदीश, हम आपके दिल मे रहते है, आगाज असे अनेक चित्रपट त्यांनी निर्माण केले. अनिल कपूर व काजोल जोडीच्या ’हम आपके दिल मे रहते है’च्या हैदराबाद येथील त्यांच्या रामा नायडू स्टुडिओत शूटिंग रिपोर्टिंगसाठी जायचा योग आला असता त्या भव्य दिमाखदार स्टुडिओत पाऊल टाकताच कमालीचा प्रभावित झालो. यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधता आला. चित्रपट निर्मिती व स्टुडिओचे वैभव वा साम्राज्य उभारुनही डी. रामा नायडू अतिशय नम्र आणि सहकारी वृत्तीचे वाटले.
दक्षिणेकडून आलेल्या हिंदी चित्रपटांची आपली एक परंपरा आहेच आहे. साठच्या दशकात ती सुरू झाली आणि त्यात ’प्रेम नगर’ एक महत्त्वाचा चित्रपट. उत्तम निर्मिती मुल्यात एक गोड गोष्ट आणि त्यात गीत संगीत व नृत्याची बहार असे छानसे पॅकेज. राजेश खन्ना व हेमा मालिनीला नटण्या-सजण्याची मनसोक्त हौस मौज करता आली, तो त्यांचा आनंद पडद्यावरही दिसतो.
प्यार का मौसम ते प्रेम प्रतिज्ञा आणि जवां मोहब्बतपासून इश्क इश्क इश्क असे प्रेमात अखंड विहार करणारे अनेक चित्रपट आले, त्यात ’प्रेम नगर’ देखणा नक्कीच. 24 मे रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाली देखील हो.

  • दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (दि. …

Leave a Reply