पनवेल : रामप्रहर वृत्त
स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील सुरक्षारक्षकांनी आमदार प्रशांत ठाकूर व जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांचे आभार मानले आहेत.
स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कळंबोली येथे रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक गेल्या सात वर्षांपासून कार्यरत आहेत. या आस्थापनेने खासगीकरणाच्या नावाखाली 2 मे 2024 पासून 24 सुरक्षारक्षकांची सेवा खंडित करण्यासाठी सूचना स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाने रायगड सुरक्षारक्षक मंडळाला दिली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सभासदत्त्व स्वीकारले.
तातडीने संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी संबंधित आस्थापनेसोबत पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन या सुरक्षारक्षकांची सेवा खंडित केल्यास सुरक्षारक्षकांच्या तसेच संघटनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत चर्चा केली.
त्यानंतर रायगड सुरक्षारक्षक मंडळ व संघटना यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे या नोटीसीबाबत याचिका दाखल केली. सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे निरीक्षक श्री. पवार तर संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सकारात्मक भूमिका देत सर्व सुरक्षारक्षक हे त्याच आस्थापनेमध्ये कायम काम करतील, असा आदेश दिला. यामुळे सुरक्षारक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत तसेच जनार्दन पाटील यांना प्रत्यक्ष भेटून आभार व्यक्त केले.
Check Also
गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …