Breaking News

एक दिग्दर्शक, एक वर्ष, चार चित्रपट, सर्वच सुपर हिट; मनमोहन देसाईंची कम्माल…

दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या चित्रपटात इतकं आवडण्यासारखे काय असते? माहीत नाही. याचा अर्थ त्याबाबत अज्ञान आहे असे नव्हे. त्याच मनमोहन देसाईच्या चित्रपटात न आवडण्यासारखे काय असते?
काहीच सांगता येत नाही. त्यांचे चित्रपट एक भन्नाट मनोरंजक अनुभव. मला वाटतं, हेच मनमोहन देसाई यांच्या चित्रपट दिग्दर्शनाचे मोठेच यश आहे. जे कशात आहे हे सांगणे अवघड जावे.
काळ पुढे सरकत राहिलाय. एकपडदा अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सचा काळ मागे पडून मल्टीप्लेक्स, ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आला, पडद्यावरून चित्रपट हातातील मोबाईलवर आला तरी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट यशस्वी दहा दिग्दर्शकांत मनमोहन देसाई यांचे नाव घेतले जातेच.
तात्कालिक समिक्षकांना (तेही साठ/सत्तर/ऐंशीच्या दशकातील) मनजींचे चित्रपट आवडत होते का? तर नाही. त्यांच्या जवळपास सर्वच चित्रपटांची सर्वसाधारण स्वरुपातच समिक्षा होई, कारण त्यांच्या चित्रपटात प्रतिकात्मक दृश्य (सिम्बॉलिक टच) नसे, ते त्यांना फारसे गरजेचे वाटत नसे. त्यांच्या चित्रपटातून सामाजिक प्रबोधन असणे शक्यच नव्हते. यासाठी ’अमर अकबर अ‍ॅन्थनी’ हे लहानपणीच हरवलेले तीन भाऊ मोठेपणी तीन खाटांवर पडून एकाच वेळेस आपल्या वृध्द आईला रक्तदान करतात हा एकमेव प्रसंग आठवला तरी चालेल. त्यात खरं तर त्यात आठवण्यासारखे काहीच नाही, पण विसरून जावे असेही काही नाही. मनजींनी मात्र हाच प्रसंग हाऊसफुल्ल गर्दीला पचनी पडेल अशा पद्धतीने पडद्यावर साकारला, रसिकांच्या टाळ्या वसूल केल्या आणि चित्रपटाची श्रेयनामावली सुरू झाली.
अशा मनजींनी 1977 साली एक फिल्मी विक्रम केला. तो कधीच मोडला जाणार नाही. त्या एकाच वर्षी त्यांचे एकूण चार चित्रपट प्रदर्शित तर झालेच, पण ज्युबिली हिटही झाले. ते प्रगती पुस्तक असे आहे, एम.एम. मल्होत्रा व बलदेव पुष्कर्णा निर्मित चाचा भतिजा (या चित्रपटाची पटकथा सलिम जावेद यांची असूनही मनजींनी आपले हुकमी पटकथालेखक प्रयाग राज यांनाही जोडीला ठेवले. या चित्रपटात धर्मेंद्र, हेमा मालिनी, रणधीर कपूर व योगिता बाली यांच्या प्रमुख भूमिका. हा चित्रपट मुंबईत 11 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. मेन थिएटर सेन्ट्रल), सुभाष देसाई निर्मित धरमवीर (या चित्रपटाची पटकथा के.बी. पाठक व प्रयाग राज यांची. चित्रपटात धर्मेंद्र,जितेंद्र, झीनत अमान, नीतू सिंग, इंद्राणी मुखर्जी इतरांच्या प्रमुख भूमिका. मुंबईत रिलीज 1 एप्रिल. मेन थिएटर गंगा), स्वतःच मनमोहन देसाई निर्मित, त्यांच्याच एमकेडी फिल्मचा अमर अकबर अ‍ॅन्थनी (या चित्रपटाची कथा कल्पना जीवनप्रभा देसाई व पुष्पा शर्मा यांची. पटकथालेखन के.के. शुक्ला आणि संवाद कादर खानचे. या मल्टी स्टार कास्ट चित्रपटात विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, ऋषि कपूर, शबाना आझमी, नीतू सिंग, परवीन बाबी, निरुपा रॉय, प्राण, जीवन. मुंबईत रिलीज 27 मे. मेन थिएटर ऑपेरा हाऊस), ए.जी. नडियादवाला निर्मित ’परवरीश’(पटकथालेखन के. के. शुक्ला व प्रयाग राज. संवाद लेखन कादर खान. या चित्रपटात शम्मी कपूर, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, शबाना आझमी, नीतू सिंग. मुंबईत रिलीज 27 ऑक्टोबर दिवाळी. मेन थिएटर सेन्ट्रल. तोपर्यंत त्याच सेन्ट्रल थिएटरमध्ये ’चाचा भतिजा’ने पंचवीस आठवड्यांचा खणखणीत मुक्काम केला होता.)
हे चित्रपट आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मीडियात, मल्टीप्लेक्स, ओटीटीच्या प्रेक्षकांना फारसे आवडतील असे वाटत नाही. काहींना त्यात अतिशोयोक्ती दिसेल. कुठे लहानपणीच हरवलेले भाऊ मोठेपणी सापडणे (लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड फॉर्मुला), कधी मैत्रीची साद वा हाक, कधी दुश्मनी, कधी अगदीच भाबडे प्रसंग, (हास्यास्पद वाटले तरी मनजींचा पिक्चर म्हणूनच एन्जॉय केले जात), हमखास टाळ्या वसूल होतील असे डायलॉग या सगळ्यांची त्यांच्या मसाला मिक्स पिक्चरमध्ये मनसोक्त रेलचेल. सत्तरच्या दशकात मात्र हे मनोरंजनाचा सर्व प्रकारचा मसाला असणारे पिक्चर्स’. त्या काळात पारंपरिक चित्रपटातून अपेक्षा त्या काय असत? एन्टरटेन्मेन्ट एन्टरटेन्मेन्ट एन्टरटेन्मेन्ट. आनंद झाला, पिक्चरला जा, दु:ख झालं पिक्चरला जा. पडद्यावरच्या जगात स्वतःला विसरून जाणे. पडद्यावरील ’नायका’च्या जागी स्वतःला बघ. त्याच्या रूपेरी पराक्रमाशी एकरूप हो. काही फॅन्स तर आवडत्या हिरोसारखं डिट्टो दिसण्याचा/पाहण्याचा/बोलण्याचा/ऐकण्याचा अधिकाधिक प्रयत्न कर. बरं हे एवढ्यावरच थांबत नसे. कट्टा/नाका/गॅलरी/गच्ची/कॉलेज कॅन्टीन, इतकेच नव्हे फिल्मी नियतकालिकातील ’वाचकांच्या पत्रा’मधूनही आपल्याच आवडत्या कलाकाराची बाजू घेऊन बोलायचे, लिहायचे, सांगायचे असाच जणू हट्ट असे आणि गीत संगीत नृत्याची मेजवानी हवीहवीशी. पिक्चर पूर्ण झाला रे झाला त्याच्या गाण्याची ध्वनिमुद्रिका म्युझिक हाऊस अथवा रिदम हाऊसमध्ये विक्रीला आली रे आली की त्याच्या ’कव्हर पेज’पासूनच आकर्षण असे. ही गाणी ध्वनिफीत, रेडिओ विविध भारती, रेडिओ सिलोन, लाऊडस्पीकर, इराणी हॉटेलमधील ज्यूक बॉक्स यातून ही गाणी जनसामान्यांपर्यंत पोहचत आणि पिक्चरची हवा निर्माण होई. मनजींच्या चित्रपटात सर्व प्रकारची गाणी हे हुकमी समीकरण. प्रेमगीत (अनेकदा एकापेक्षा अधिक) मैत्रीगीत, मस्तीगीत, क्लायमॅक्स गीत अशी बहुरंगी गाणी. मनजींच्या 1977च्या चारही चित्रपटांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आणि गाणीही सोप्या शब्दांतील, सोप्या चालीतील, म्हणूनच सहज गुणगुणता येतील अशी. (हे काव्य नव्हे, ही फिल्मी गीते असं टवाळीने म्हटलं तरी मनोरंजक चित्रपटाची ती ओळख आणि गरज असते.) तेरा शीशे का सामान, भूतराजा बाहर आजा (चाचा भतिजा), सात अजुबे इस दुनिया, हम बंजारों की बात मत पुछो जी, बंद हो मुठ्ठी लाख की (धरमवीर), देख के तुमको हम बोला है, माय नेम इज अ‍ॅन्थनी गोल्सालवीस, एक जगह जब जमा हो तीनो (अमर अकबर अ‍ॅन्थनी), हम प्रेमी प्रेम करना जाने, जाने हो जाने जा (परवरीश) ही या चित्रपटातील हिट गाणी.
मी गिरगावातील खोताडीवाडीत लहानाचा मोठा झालो आणि शालेय वयातच समजले की, माझ्या घरापासून अवघ्या पाच सात मिनिटाच्या अंतरावरील खेतवाडीतील प्रताप निवासमध्ये ‘सच्चा झूठा’चे दिग्दर्शक मनमोहन देसाई राहतात. (त्या वयातील आवडतं पिक्चर आणि त्यात राजेश खन्नाचा डबल रोल. एकाच तिकीटात दोन राजेश खन्ना, पिक्चर आवडायला आणखी काय हवे?) मनमोहन देसाई घराबाहेर पडून गाडीत बसण्यापूर्वी युनियन हायस्कूलजवळील देवळाबाहेर उभे राहून बूट वा चप्पल काढून नमस्कार करत. मनमोहन देसाईना मी पहिल्यांदा पाहिले ते हे असे. काही वर्षांतच डॉ. भडकमकर मार्गावरील अप्सरा थिएटरसमोरील गिल्डन मैदानावर टेनिस चेंडूवर मनजींना मी मनसोक्त क्रिकेट खेळताना पाहू लागलो. मनजींच्या याच वागण्यात त्यांचे दिग्दर्शनही यश होते. मी मीडियात आल्यावर मनजींच्या भेटीचे, मुलाखतीचे, त्यांच्या चित्रपटांच्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी जाण्याचे (त्यांनी निर्मिलेल्या आणि केतन देसाई दिग्दर्शित ‘अल्लारखा’च्या चेंबूरच्या आर.के. स्टुडिओत मी पाऊल टाकताच मला दिसले मनजी दूरचित्रवाणीवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना एन्जॉय करीत होते. जनसामान्यांची आवड हीच त्यांची आवड आणि म्हणूनच त्यांनी जनसामान्यांना आपलेसे वाटतील असे चित्रपट त्यांनी घडवले.) त्यांच्या चित्रपटाच्या मुहूर्ताला हजर राहण्याचे योग (नटराज स्टुडिओत ’गंगा जमुना सरस्वती’चा मुहूर्त आठवतोय. अमिताभ व मिथुन चक्रवर्ती यांच्यासह ऋषि कपूरही हजर होता, पण मुहूर्ताचे आमचे कव्हरेज प्रसिद्ध होण्यापूर्वीच ऋषि कपूरने चित्रपट सोडला), मनजींच्या मुलाखतीचा योग म्हणजे दिलखुलास, उत्फूर्त गप्पा. बेधडक उत्तरे. त्यातील अनेक मुद्यांपैकी एक म्हणजे, सिंगल स्क्रीन थिएटर्सला येत असलेल्या पब्लिकला समजेल, आवडेल असाच चित्रपट निर्मिणे महत्वाची. उगाच तांत्रिक करामती, कॅमेर्याचे कौशल्य दाखवण्याची गरज नाही. (पस्तीस वर्षांपूर्वीच्या चित्रपट संस्कृतीनुसार हे त्यांचे बोलणे होते).
मनमोहन देसाई कदाचित दर्जेदार (तो कसा ठरवणार?) दिग्दर्शक म्हणून ओळखला जात नसतील, पण जनसामान्यांचे दिग्दर्शक हे त्याचे वैशिष्ट्य महत्त्वाचे. आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीत प्रेक्षकांची पहिली गरज पैसा वसूल मनोरंजन हवे. मनमोहन देसाई यांनी तेच पेरले म्हणूनच तर 1977 या एकाच वर्षात त्यांच्या चारही चित्रपट हाऊसफुल्ल यशस्वी ठरले. एकाच वर्षात चार चित्रपट म्हणजे, वेळ व शक्ती किती खर्च झाली याची मोजदाद न केलेली बरी. आपल्या कामात पूर्णपणे झोकून दिलेलाच असे यश प्राप्त करू शकतो. मनमोहन देसाई म्हणूनच ग्रेट!

-दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply