Breaking News

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी शुक्रवारी (दि. 7) शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला तसेच या मतदारसंघात आपला विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला.
आमदार निरंजन डावखरे यांनी कोकण भवन येथे सह निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी दिल्याबद्दल आभार मानले तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या मनाने पदवीधर मतदारसंघात पाठिंबा देऊन मनसेचा उमेदवार मागे घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केला. कोकणामध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन महायुतीच्या उमेदवारीबाबत मार्ग निघून महायुतीची एकत्रित ताकद दिसून येईल, असा विश्वासही आमदार डावखरे यांनी व्यक्त केला.
गेल्या 12 वर्षांत कोकणाच्या सर्वतोपरी विकासासाठी कार्य केले असून स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत तसेच शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले.
आमदार डावखरे यांचा अर्ज दाखल करतेवेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, भाजपचे ज्येष्ठ आमदार सर्वश्री गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, संजय केळकर, किसन कथोरे, मंदा म्हात्रे, प्रसाद लाड, कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम, माजी खासदार संजीव नाईक, निलेश राणे, माजी आमदार डॉ. विनय नातू, संदीप नाईक, अनिकेत तटकरे, भाजपचे विभागीय संघटनमंत्री हेमंत म्हात्रे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे माजी सभागृह नेेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, संतोष शेट्टी, नरेश ठाकूर, समीर ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, सुनील गोगटे, महिला मोर्चाच्या शिल्पा म्हात्रे, विद्या तामखेडे, प्रदीप भगत, भीमराव पोवार, ज्योती देशमाने, प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, आमदार डावखरे यांच्या उमेदवारीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला असून मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी माघार घेतली आहे.

Check Also

मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर बसचा भीषण अपघात; पाच प्रवाशी जखमी, दोन गंभीर

खोपोली: प्रतिनिधी पुणे येथून ठाणे कडे एक्सप्रेस वे मार्गाने निघालेल्या एसटी महामंडळाच्या प्रवाशी बसचा खोपोली …

Leave a Reply