Breaking News

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण

समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित दरबार (विक्रम गोखले) यांच्या अतिशय प्रशस्त, देखण्या, शालीन आणि मोठ्या कुटुंब अशा घरात येतो (घर नव्हे खरं तर नक्षीकामाने सजलेला महालच) ते त्यांची पत्नी अमृता (स्मिता जयकर), मुलगी नंदिनी (ऐश्वर्या रॉय) यांच्यासह राहताहेत. गुजरात राजस्थान सीमाभागात हे कुटुंब राहतेय. चालीरिती, परंपरा, सभ्यता, मूल्ये, सण संस्कृती यांची जपणूक ते करताहेत. घरात, कुटुंबात काहीसे मोकळे वातावरण असले तरी कडक शिस्तदेखील आहे. समीर व नंदिनीची ओळख होते. थट्टामस्करीत समीर व नंदिनी आणखी जवळ येतात, प्रेमात पडतात. ते वयच तसे असते… आणि अशातच पंडित दरबार नंदिनीचे लग्न वनराज (अजय देवगन) याच्याशी ठरवतात. समीर व नंदिनी या दोघांनाही हा खूपच मोठा धक्काच असतो. समीर अतिशय दुःखद अंतःकरणाने या कुटुंबातून निघून जातो. तो इटलीला जाऊन आपल्या आईसोबत (हेलन) राहू लागतो.
वनराज व नंदिनी आपला संसार सुरू करतात, पण नंदिनीचे मन त्यात रमत नाही. ती कावरीबावरी असते. तिचं भावविश्व समीरने भरले आहे आणि अशातच एके दिवशी नंदिनी समीरची पत्रे वाचत असतानाच वनराज तिला पाहतो आणि तिचं मन आपल्यात नव्हे तर आपल्या लग्नापूर्वीच्या प्रियकराच्या आठवणीत गुंतलयं हे त्याच्या लक्षात येते आणि तो अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतो, नंदिनीला तिच्या पूर्वायुष्यातील प्रियकराकडे सुपूर्द करायचे. एवढ्यावरच तो थांबत नाही तर समीर इटलीला आहे हे लक्षात आल्यावर नंदिनीला घेऊन इटलीला निघतो. एक वेगळा प्रवास सुरू होतो…
पहिल्याच फ्रेमपासून दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये आपल्या मनाची पकड घेतो. (हा चित्रपट मुंबईत रिलीज 18 जून 1999. पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत. कधी हो सरली इतकी वर्ष? तरीही चित्रपट टवटवीत. हीच दर्जेदार चित्रपटाची खासियत) आजही ’हम दिल दे…’ आठवला की त्याची नाट्यमय गोष्ट (थीम म्हणायला हवे, पण आपल्याकडचा प्रेक्षक चित्रपटाची गोष्ट या दृष्टिकोनातून आजही पाहतो.) आठवते. ऐश्वर्या रॉयला अभिनेत्री म्हणून समिक्षक, चित्रपटसृष्टी व प्रेक्षक यांनी हिच ’नंदीनी’ची भूमिका पाहून मान्यता दिली. अन्यथा ऐश्वर्या रॉय काय, सुश्मिता सेन काय या मॉडेल हो, कचकड्याच्या बाहुल्या, त्यांना छान छान गोड गोड दिसणे एवढेच माहीत, त्यांना अभिनयातील काय येतेय असे हिणवले जाई. तुमचे काम बोलते असं म्हणतात ते उगीच नाही, पण तुमच्यातील गुणवत्ता हेरणारा, बाहेर काढणारा दिग्दर्शक हवा. संजय लीला भन्साली तसाच आहे. तो चित्रपटाचे व्यक्तिमत्व आणि व्यक्तिरेखेशी गरज यानुसार कलाकार निवडतो. वनराजच्या भूमिकेसाठी अजय देवगन हा सुखद धक्काच. तोपर्यंत अजय देवगन ’गुंडा हीरो’ म्हणून ओळखला जाई. (कुकू कोहली दिग्दर्शित ’फूल और कांटे’ची पुण्याई), अजय देवगनही उत्तम अभिनय साकारतो हे या चित्रपटाने अधोरेखित केले ते कायमचे. त्याने जणू कात टाकून नवीन डाव सुरू केला. त्याच्यासाठी हा चित्रपट गेमचेंजर ठरला. सलमान खानने भन्सालीच्या ‘खामोशी द म्युझिकल’ (1994)मध्ये काम केले असल्याने त्याची क्षमता व कार्यशैली माहीत होतीच. विक्रम गोखले, स्मिता जयकर यांच्यासाठी हा चित्रपट अतिशय उत्तम संधी ठरला. चित्रपटात जोहरा सहेगल, हेलन, रेखा राव, विनय पाठक, राजीव वर्मा, घनश्याम नायक, शीबा चढ्ढा इत्यादी अनेकांच्या भूमिका. या चित्रपटात कलाकारांचा लवाजमा भरपूर.
स्मिता जयकर मला मध्यंतरी सांगत होत्या, मॉडेलिंगमुळे जॉन मॅथ्यूज मथान याच्याशी ओळख असल्याने मी ’सरफरोश’मधील आमिर खानच्या आईची भूमिका स्वीकारली. मागोमाग संजय लीला भन्साली दिग्दर्शित ’हम दिल दे चुके सनम’मध्ये ऐश्वर्या रायच्या आईची भूमिका ऑफर झाली. तीदेखील कशी? संजयजींच्या आई त्या वेळी माझी भूमिका असलेली घुटन ही मालिका बघत. त्यांनी संजयजींना सांगितले, ऐश्वर्याच्या आईच्या भूमिकेसाठी या अभिनेत्रीची निवड कर. माझ्यासाठी हा सुखद धक्काच होता आणि मग शूटिंगचा उत्तम अनुभव आला. ही भूमिका थोडीशी निगेटिव्ह आहे. कोणत्याच माणसात सगळेच गुण चांगलेच असतात असे नव्हे. या चित्रपटाने मला राष्ट्रीय झालेच, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली, स्मिता जयकरने मला म्हटलं.
या चित्रपटाचा मोठा सेटअप, दिग्दर्शकाचा सकारात्मक दृष्टिकोन व फोकस, भल्या मोठ्या सेटवरचे सुखद वातावरण, सर्व प्रकारच्या सुविधा या सगळ्याचा एकत्रित सकारात्मक प्रत्यय पडद्यावर आला. चकाचक, भव्य दिमाखदार सेटमध्ये चित्रपट हरवला नाही की मोठ्याच प्रमाणावर असलेल्या गीत संगीत व नृत्यात गोष्ट दबली गेली नाही.
दिग्दर्शकाची शेवटच्या फ्रेमपर्यंत पकड असलेला हा मनोरंजक चित्रपट आहे. प्रत्येक दृश्यासह तो आपल्याला गुंतवून, खिळवून ठेवतो. पूर्वार्धातील उत्कट प्रेमकथा उत्तरार्धात अनेक धक्कादायक वळणे घेत घेत रंगते. चित्रपट असाच असावा. पुढे काय घडेल याची उत्सुकता असावी.
या चित्रपटाचा क्लायमॅक्स आवडणारा जसा मोठाच वर्ग आहे तसेच चित्रपटाच्या शेवटी नंदिनी समीरची होते असा धक्कादायक शेवट असायला हवा होता. त्यामुळेच हिंदी चित्रपटाने पारंपरिक चौकट मोडली असे झाले असते, ते होणे आवश्यक असते असे मानणाराही एक वर्ग आजही आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ती जणू एक ’बंडखोरी’ ठरली असती असे मानले जाते.
चित्रपटाला ’हम दिल दे चुके सनम’ हे नाव अनपेक्षितपणे ठेवले गेले. चित्रपटाची गीते मेहबूब यांची, तर संगीत ईस्माईल दरबार यांचे. संजय लीला भन्सालीने पटकथेतील गाण्याचे महत्त्व जाणून सर्वप्रथम गीत रचना, चाल बांधणी याकडे लक्ष दिले. मेहबूब व इस्माईल दरबार यांचे विशेष म्हणजे हे दोघे खास मित्र आणि आपल्या गाण्यांचा स्टॉक करून ठेवत आणि ती गाणी दिग्दर्शकाला ऐकवत. त्यातील गाणे प्रसंगानुरुप फिट्ट बसल्यास दिग्दर्शक ते घेई अन्यथा नवीन रचना केली जाई.
’हम दिल दे चुके सनम’ हे गाणे त्यांच्याकडे तयारच होते आणि संजय लीला भन्सालीने त्या गाण्याला मान्यता देतानाच चित्रपटासाठी त्याला तेच नाव योग्य वाटले आणि त्या नावाने या चित्रपटाचे व्यक्तिमत्व स्पष्ट झाले आणि चित्रपटाला कायमची ओळख मिळाली. तडप तडप के इस दिल ने हे गाणे त्यांनी मुकुल आनंद दिग्दर्शित ’दस’ या चित्रपटांसाठी रेकॉर्ड केले होते. विशेष उल्लेखनीय गोष्ट हे गाणे पडद्यावर दिलीपकुमार साकारणार होता. जुहूच्या समुद्र किनार्‍यावर ’दस’चा भव्य दिव्य मुहूर्तही झाला, पण चित्रपट बंद पडला. ते गाणे ‘हम दिल दे… ’मध्ये आले. काही गाण्यांमागच्या गोष्टी अतिशय रंजक असतात. चित्रपटातील सगळीच गाणी लोकप्रिय. इतर गाण्यात चांद छुपा बादल मे (पार्श्वगायक उदित नारायण व अलका याज्ञिक), निम्बोडा निम्बोडा (कविता कृष्णमूर्ती), आँखो की गुस्ताकिया (कुमार शानू व कविता कृष्णमूर्ती), मन मोहिनी (शंकर महादेवन), थोली तारो ढोल बाजे (कविता कृष्णमूर्ती व विनोद राठोड), हम दिल दे चुके सनम (कविता कृष्णमूर्ती), काय पो छे (के. के., शंकर महादेवन, देवयानी बर्मन), झोका हवा का (हरिहरन व कविता कृष्णमूर्ती), अलबेला साजन (शंकर महादेवन व कविता कृष्णमूर्ती), तडप तडप इस दिल ने (के. के. आणि डोमॅनिक सेरेजो) अशी गीत संगीत व नृत्याची मस्त बहार. चित्रपट आणखी रंगीत ठरला.
या चित्रपटाची गोष्ट राष्ट्र शायर झवेरचंद यांच्या शीतल ने कठे या साहित्यावर आधारित आहे. त्यावरून प्रताप करवर यांनी कथा लिहिली, तर कानन मणि, केनेथ फिलिप्स व संजय लीला भन्सालीची पटकथा आहे. छायाचित्रण अनिल मेहता यांचे असून त्यांचा ’कॅमेरा’ या चित्रपटातील गोष्ट व भव्यता आपल्याला दाखवतो आणि बेला सैगलने आपल्या कसदार संकलनाने चित्रपटाची गती उत्तम ठेवलीय. या चित्रपटाचे अंजन बिश्वास यांचे पार्श्वसंगीत एक प्रकारची व्यक्तिरेखाच! या चित्रपटासाठी गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत भला मोठा सेट लागला. आऊटडोअर्स शूटिंग गुजरात, राजस्थान, बुडापेस्ट, हंगेरी येथे झाले. (चित्रपटात मात्र इटलीचा संदर्भ दिलाय, पण चित्रपट हिट झाल्यावर बुडापेस्ट, हंगेरीचे पर्यटन वाढले. सुपरहिट चित्रपट बरेच काही देत असतो. यशाची गोष्टच वेगळी).
चित्रपटाचे मुंबईतील मेन थिएटर लिबर्टी. आणि आम्हा समिक्षकांना दोन दिवस अगोदर चित्रनगरीतील मिनी थिएटरमध्ये चित्रपट दाखवला. मला चित्रपट आवडला. अनेकांचे रिव्ह्यूही चांगले आले. पण रसिकांकडून सुरुवातीस विशेष प्रतिसाद नव्हता. कदाचित, या चित्रपटात मोठे देखणे सेटस असतील, गोष्ट खास नसावी असा समज झाला असावा. हळुहळू चित्रपटाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या. गाण्यांच्या ध्वनिफीतींची विक्री वाढू लागली. मनोरंजन उपग्रह वाहिनीवरील ’टॉप टेन’ गाण्यात ’निम्बोडा’ आले. चित्रपट आता हमखास हाऊसफुल्ल गर्दीत चालू लागला. सुपरहिट झाला. अजय देवगनने कात टाकली, ऐश्वर्य रॉयला अभिनेत्री म्हणून मान्यता मिळाली. सगळ्यात महत्त्वाचं सलमान खान व ऐश्वर्य रॉय यांचं प्रेम प्रकरण रूजत गेले, फुलत गेले.
या चित्रपटाची गोष्ट, बोनी कपूर निर्मित व बापू दिग्दर्शित वो सात दिन (1983) या चित्रपटाची आठवण देणारी. या चित्रपटाचे संकलन एन.चंद्रा यांचे. आणि तेही आवर्जून दखल घ्यावी असे. लग्नानंतर पती (नसिरुद्दीन शहा) आपल्या पत्नीला (पद्मिनी कोल्हापूरे) तिच्या पूर्वायुष्यातील प्रियकराकडे (अनिल कपूर) न्यायचे ठरवतो… एका दक्षिण भारतातील प्रादेशिक भाषेतील चित्रपटाची ही रिमेक. एका भाषेतील चित्रपट हे असे अन्य भाषेतील प्रेक्षकांपर्यंत पोहचतात आणि तो प्रवास कथाआशयचा धागा कायम ठेवून भव्य दिमाखदार स्वरूपात ’हम दिल दे चुके सनम’ या नावाने येतो…

-दिलीप ठाकूर

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply