अर्जदाराचे वर्तन कुठल्याही तर्हेने संशयास्पद आढळल्यास त्याला व्हिसा नाकारला जाणार आहे. अमेरिकेला तात्पुरती भेट देणारे व पर्यटक यांनाही यातून वगळण्यात आलेले नाही. यावरून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अमेरिकेकडून घेतली जाणारी खबरदारी स्पष्ट होते. या धोरणानुसार प्रत्येक अर्जदाराचा समाजमाध्यमांवरील इतिहास तपासला जाणार आहे.
अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना आता सर्वच परदेशी नागरिकांना आपली समाजमाध्यमांवरील ओळख उघड करावी लागणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने नुकतेच या संदर्भातील आपले नवे धोरण जाहीर केले. अमेरिकेत येणार्या परदेशी नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण खातरजमा करण्याच्या उपाययोजनांचाच हा एक भाग आहे. जगभरात अलीकडच्या काळात घडलेल्या दहशतवादी घटनांमध्ये वरकरणी सर्वसामान्य भासणार्या व्यक्तींचा हात असल्याचे दिसून आल्यानेच हे असे धोरण आखले गेले असावे. कुठल्याही तर्हेच्या समाज विघातक वा दहशतवादी विचारांचे समर्थन करणार्या वा तसे हेतू असणार्या व्यक्तींना अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवण्यापासून रोखणे हाच या मागील विचार आहे. आता धोरण जाहीर झाल्या-झाल्या काही प्रमुख समाजमाध्यमांचीच माहिती व्हिसाच्या अर्जावर नोंदवण्याचे पर्याय उपलब्ध होणार असले तरी लवकरच सर्व उपलब्ध समाजमाध्यमांची माहिती नोंदवण्याचे पर्याय नमूद करण्यात येणार आहेत. यात आपली या समाजमाध्यमांवरील ओळख, ईमेल आयडी, दूरध्वनी क्रमांक आदी तपशील अर्जदाराला उघड करावे लागणार आहेत. या सार्याची सुरक्षेच्या दृष्टीने कसून तपासणी करून नंतरच व्हिसा मंजूर केला जाईल असे संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दहशतवादी संघटनांकडे ओढल्या जाणार्या कित्येकांची सुरूवात ही त्यांच्या समाजमाध्यमांवरील समर्थनातून होत असते असे सर्वसाधारणपणे निदर्शनास आले आहे. अशांना व्हिसा छाननी प्रक्रियेतच अटकाव करून अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवण्यास मज्जाव करणे असा त्यामागचा हेतू आहे. समाज माध्यमांवरील बेबंद वक्तव्ये काही जणांना यामुळे महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक जण समाजमाध्यमांवर छुपी ओळख घेऊन वावरत असतात. ते लक्षात घेऊन खोटी माहिती पुरवणार्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. एका परीने व्यापक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे योग्यच झाले असे म्हणावे लागेल. परंतु कुठल्या भूमिकेला वा वक्तव्यांना आक्षेपार्ह ठरवायचे हे त्या देशाच्या भूमिकेनुसार ठरणार आहे. त्यामुळे अमेरिकेला आक्षेपार्ह वाटणारी वक्तव्ये करणारे अडचणीतही येऊ शकतील. त्यामुळे एकंदरच समाजमाध्यमांवर मते मांडताना सावधपणे व जबाबदारीने वागावे लागणार आहे. निव्वळ अमेरिकेच्या व्हिसासाठीच नव्हे तर अनेक बड्या कंपन्याही नोकरीत घेताना आपल्या संभाव्य कर्मचार्यांचा समाजमाध्यमांवरील वावर तपासून पाहात असतात. आता अमेरिकेच्या या नव्या धोरणामुळे त्यात वाढच होईल. समाजमाध्यमांवर काही प्रमाणात मोकळे रान असल्यासारखे झाले होते. कुणीही उठावे व वाट्टेल त्या भाषेत कुणावरही कुठल्याही तर्हेचा मुलाहिजा न बाळगता अर्वाच्च्य भाषेत टीका करावी असे स्वरुप येत चालले होते. अनेक नामवंतांनाही समाजमाध्यमांवर या अशा तर्हेने बेबंद वागणार्यांचा त्रास सहन करावा लागलेला आहे. समाजमाध्यमांवरील आचरणावर काही तर्हेच्या सभ्यतेच्या मर्यादा येण्याची गरजही आहेच.