Breaking News

कचराप्रश्नी मार्ग काढण्यासाठी सरपंच सरसावल्या

ग्रामपंचायतीचा सातारा येथे अभ्यास दौरा

कर्जत ः प्रतिनिधी : नेरळ गावाची दिवसेंदिवस शहरीकरणाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे, मात्र यासोबत नागरी प्रश्नही वाढत आहेत. या नागरी प्रश्नांमध्ये मुख्य प्रश्न आहे तो कचर्‍याचा. हा प्रश्न अनेक वर्षे भिजत घोंगडे म्हणून पडला होता, मात्र नेरळच्या नव्या सरपंच जान्हवी साळुंके यांनी कचर्‍याच्या समस्येला केवळ हातच नाही घातला, तर हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा निश्चयच केला आहे. त्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीच्या वतीने सातारा येथे नुकताच अभ्यास दौरा पार पडला आहे.

रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेले शहर म्हणजे नेरळ. मध्य रेल्वेमुळे मुंबई उपनगराला नेरळ जोडले गेले आहे. मागील काही काळापासून येथे झपाट्याने सुरू असलेला बांधकाम व्यवसायामुळे शहरात अनेक ठिकाणी इमारतींचे जाळे निर्माण झाले. त्याचबरोबर येथील लोकसंख्याही वाढीस लागली. याबरोबर अनेक नागरी समस्या डोके वर काढू लागल्या. सुमारे 18 हजारांच्या वर लोकसंख्या असलेल्या नेरळच्या लोकवस्तीच्या मध्यभागी असलेला कचरा डेपो अनेक वर्षे तसाच सुरू आहे. त्यामुळे येथे राहणार्‍या नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी उद्भवत होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेने या ठिकाणी घनकचरा प्रकल्प करण्याचे ठरविले, मात्र उद्घाटनाचा नारळ फोडून झाल्यावर तो प्रकल्प कागदावरच राहिला, तो आजवर अस्तित्वात आलाच नाही. 

मात्र डिसेंबर 2018मध्ये नेरळच्या नव्या सरपंच म्हणून कारभार हातात घेतलेल्या सरपंच जान्हवी साळुंके यांनी कचर्‍याच्या समस्येवर तोडगा काढण्याची किमया साधली. प्रथम त्यांनी कचरा डेपो नेरळच्या मध्यवर्ती ठिकाणाहून स्थलांतरित केला. ग्रामपंचायतमधील आपल्या सर्व सदस्य सहकार्‍यांशी चर्चा करून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील बनवाडी ग्रामपंचायत येथे अभ्यास दौरा आयोजित केला होता. या ठिकाणी या छोट्या ग्रामपंचायतीने कचर्‍याच्या समस्येवर मात करून गाव स्वच्छ व समृद्ध करून नवा आदर्श निर्माण केला. तेव्हा हा बनवाडी पॅटर्न नेरळमध्ये रुजवण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच जान्हवी साळुंके, उपसरपंच अंकुश शेळके, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गुडडे, सदस्य सदानंद निरगुडा, सुनील पारधी, आरोग्य कर्मचारी, पंचायत समिती कर्जतचे गटविकास अधिकारी बी. जी. पुरी, सहाय्यक गटविकास अधिकारी धनराज राजपूत व त्यांचे सहकारी आदींसह हा दौरा पार पडला.

बनवाडी ग्रामपंचायतीने गावात कचर्‍यापासून राबवलेला गांडूळ खत प्रकल्प, सोलरवर पाणी योजना, संपूर्ण गाव डिजिटल अशा योजना खरंच कौतुकास्पद आहेत. नेरळमधील कचर्‍याच्या समस्येवर बनवाडी पॅटर्न राबविण्याचा आमचा विचार आहे. या अभ्यास दौर्‍यानंतर त्यास पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार चालना देण्याचा आमचा मानस आहे, पण शून्य कचरा संकल्पनेसाठी आम्ही आग्रही आहोत.

-जान्हवी साळुंके,  सरपंच, नेरळ ग्रामपंचायत

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply