पाच महिन्यांत 1337 जणांना मदतीचा हात; प्रोत्साहन देण्याची गरज
पुणे ः प्रतिनिधी
रस्त्यात आढळलेल्या 70 वर्षांच्या जखमी अवस्थेतील मनोरुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे, रिक्षात हरविलेली बॅग दागिन्यांसह महिलेच्या स्वाधीन करणे, मनाविरुद्ध लग्न ठरविल्याने घर सोडून गेलेल्या तरुणीला शोधून पालकांच्या ताब्यात देणे, आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला जीवदान अशा एक ना अनेक गोष्टी शहर पोलीस करीत आहेत़. नागरिक कधीही अडचणीत सापडले की त्यांना सर्वप्रथम आठवतात ते पोलीस व 100 क्रमांक, पण तेथून मदत मिळेलच याची यापूर्वी खात्री नव्हती, मात्र आता पुणेकरांना पोलीस मदतीला धावून येतील याची खात्री वाटू लागली आहे़. गेल्या पाच महिन्यांत शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचार्यांनी अशा अडचणीत आलेल्या तब्बल एक हजार 337 जणांना मदतीचा हात दिला आहे़.
पोलीस गुन्हेगारांना शोधण्याबरोबर अनेक छोटीमोठी कामे करीत असतात़, पण त्याची कोणी दखलही घेत नाही. शहर पोलीस इतकी सर्व कामे करत असतात याची कोणाला माहितीही नसते. तसेच हे काम आपले आहे, आपल्याकडे मदतीला आलेल्या नागरिकांना आपण सहाय्य करू शकतो, त्यांची समस्या ही किरकोळ असली तरी त्यांच्या दृष्टीने सध्या ती सर्वात मोठी आहे, हेही यापूर्वी पोलिसांच्या गावी नव्हते़. त्यांना त्यासाठी कोणी आजवर प्रोत्साहितही केले नव्हते़. त्यामुळे अशा किरकोळ गोष्टींकडे पोलीस चौकी पातळीवर, पोलीस ठाण्याच्या पातळीवर ते गांभीर्याने घेतले जात होतेच असे नाही़.
पोलीस आयुक्त म्हणून डॉ. के. व्यंकटेशम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वसामान्य पोलीस कर्मचार्यांना कामासाठी प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतला़. शहरात चोर्या, खून, जबरी चोरी असे गुन्हे होत राहणार, पण त्याचबरोबर पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेतली पाहिजे. त्यांनी नागरिकांना मदत करावी, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांना प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले व अशी चांगली कामगिरी करणार्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचे कौतुक करण्यास सुरुवात केली़. पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामाची माहिती प्रसारमाध्यमांकडे पाठविण्यास सुरुवात केली़. वृत्तपत्र, टीव्ही चॅनेल हे दखल घेतील अथवा नाही, पण आपण आपले काम करीत राहायचे, असे त्यांनी सांगितले़. त्यानुसार आठवड्याला ते प्रत्येक पोलीस ठाण्याचा आढावा घेऊ लागले़. पोलीसही आपल्याकडे आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात रुची दाखवू लागले.
एरवी मोबाइल फोन चोरीला गेला तर अगदी थंड चेहर्याने पोलीस चौकीतील कर्मचारी वेबसाइटवर लॉस्ट अँड फाऊंडला तक्रार द्या, असे सांगत असत़. आता त्यात बदल झाला आहे. हरविलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात येऊ लागले़.
वृत्तपत्रांनीही पोलिसांच्या चांगल्या कामाची दखल घेण्यास सुरुवात केली़. परिणामी पोलीस मदतीला धावून येतील, ही भावना नागरिकांच्या मनात वाढीस लागली. त्याचबरोबर आपण एखादे चांगले काम केले, तर त्याचे कौतुक होते, ही भावना पोलिसांच्या मनात निर्माण करण्यात पोलीस आयुक्त यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे़.
RamPrahar – The Panvel Daily Paper