धो-धो पाऊस पडूनही दरवर्षी पाणीटंचाईशी सामना करणार्या कर्जतवासीयांच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही योजनाच पाण्यात गेली असून जागोजागी मारलेल्या बोअरवेलमुळे भूजलाचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत भूजल पातळी चांगलीच घटली आहे. परिणामी जानेवारीतच विहिरींनी तळ गाठला असून नद्याही कोरड्या पडल्या आहेत. शेकडो बोअरवेल कोरड्याठाक पडल्या आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी भूजल संपत्तीची होणारी वारेमाप लूट कर्जतवासीयांचा हंडा भविष्यात रिकामा ठेवणार असल्याची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे कर्जतकरांनी भविष्यात होणार्या त्रासातून सुटका मिळविण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी येणार्या पावसाळ्यात प्रत्येकाने पावसाचे पाणी साठविले पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे.
प्रत्येक गावात पाणी साठवून ठेवण्यासाठी जलशिवार उभारले पाहिजे. जंगल परिसरात वनखात्याच्या मदतीने प्राण्यांसाठी हौद बांधले पाहिजेत. सोसायटीमध्ये प्रत्येकाने टेरेसवर किंवा जमिनीमध्ये एखादी पाण्याची टाकी बांधावी. त्यात पावसाचे पाणी साठवून ठेवले पाहिजे. बोरवेल आणि विहिरींचे झरे आटत असून पाण्याचे मार्गदेखील बदलत आहेत. पाण्याचे विदारक चित्र उभे राहिले आहे. 150 ते 200 इंच पाऊस पडूनही पाणी दुर्भिक्ष दिसते. त्यामुळे पाणी अडवा, पाणी मुरवा योजना हाती घेणे गरजेचे आहे. सरकारी कार्यालये, ग्रामपंचायत, ग्रामविकास मंडळे, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, रेल्वे, एसटी यांसह डोंगर टेकड्या यांसारख्या ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या त्या ठिकाणी पाच फूट लांब, दोन फूट रुंद व दोन फूट खोल मापाचे खड्डे, चर खणून त्यात पाणी अडवून ते पाणी जमिनीत जिरविणे हाच एकमेव मार्ग आहे. Fizzslots Casino. नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी ही मोहीम राबविली पाहिजे.
दरवर्षी सरासरी तीन हजार मिलिमीटर एवढा प्रचंड पाऊस पडतो, मात्र जलयुक्त शिवार योजना, पाणी अडवा पाणी जिरवा यांसारख्या योजना राबवूनही जलसाठ्यात भर पडली नसल्याचे सरकारी अहवालावरून उघड झाले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत गेल्या पाच वर्षांत 0.49 मीटर घट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. माथेरानमधील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत 0.12 मीटरने घट झाली आहे. सिमेंट काँक्रीटचे जंगल, जंगलाची होत असलेली जंगलतोड तसेच भूगर्भातील होणारा बेसुमार पाण्याचा उपसा यामुळे कर्जत तालुक्यात भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात कमालीची घट होत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे, मात्र लोकप्रतिनिधी पाण्याचा प्रश्न सोडविण्यात फारसा रस घेत नसल्याचे दिसून येत आहे. अन्य नेतेही प्रयत्नशील नसल्याचे समजते. फक्त निवडणूक काळातच जनतेचे कैवारी बनतात.
पाणी अडवा, पाणी जिरवा या कार्यक्रमास पुनर्वसन किंवा खर्च नाही. उलट हे फुकटचे धरण बनेल. त्यासाठी शासनाच्या खासगी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक व महाविद्यालय, सामाजिक, खाजगी आणि सार्वजनिक संस्था, प्रत्येक गावाचे सरपंच, ग्रामस्थ आणि शासकीय कार्यालयाचा सहभाग आवश्यक आहे. प्रत्येक गावात प्रत्येकाने पाच फूट लांब, तीन फूट रुंद व दोन फूट खोल खड्ड्यात 30 घनफूट, तर पाच फूट लांब, दोन फूट रुंद व दोन फूट खोल खड्डा खणला तर प्रत्येक खड्ड्यात 20 घनफूट पाणी साठेल. याप्रमाणे पावसाळ्यात जून ते सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात किमान 20 वेळा एक खड्डा पाण्याने पूर्ण भरून ते पाणी जमिनीत मुरविल्यास सुमारे 400 ते 600 घनफूट पाणी एका खड्ड़्यातून जमिनीत मुरविले जाईल.
-विजय मांडे
RamPrahar – The Panvel Daily Paper