कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील माले येथील शेतकरी अरुण वेहेले यांनी आपल्या सात एकर शेतीत अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. यावर्षी त्यांनी चार एकरमध्ये कोळी तर तीन एकरमध्ये डांगराची शेती करून विक्रमी पीक घेतले आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवणार्या शेतकर्यांमध्ये अरुण वेहेले हे नेहमीच आघाडीवर राहिले असून त्यांनी त्यांच्या शेतात कोळी आणि डांगरीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. यातून त्यांना मोठा नफा झाला आहे.
माले गावातील अरुण वेहले हे गेली 20 वर्षांपासून आपल्या शेतात शेती व्यवसाय करत आहेत. त्यांनी बीए, बीएससी डिग्रीप्रर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी आपल्या शेतात अनेक प्रयोग करून यशस्वी शेती केल्याने त्यांना 2013 साली कृषी विभागाकडून कृषिनिष्ठ प्रगत शेतकरी पुरस्कार मिळाला आहे. कृषी विभागातील अनेक योजनांचा ते लाभ घेत आहेत. त्यांनी शेतात बासमती, जिराराईस, जया, कोमल अशी अनेक प्रकारची भात पिके घेतली आहेत. त्यांनी केलेली शेती पाहून परिसरातील अनेक शेतकरी शेतीविषयी माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडे येत असतात. गांडुळ खतही ते तयार करतात. भात शेतीनंतर ते उन्हाळी आपल्या शेतात ठिबक सिंचन पद्धतीने काकडी, दुधी, टोमॅटो, चवली, शिरोली, कारली, भेंडी, गवार अशी अनेक प्रकारची पिके घेत आहेत. यासाठी त्यांना वार्षिक 60 ते 70 हजार रुपये खर्च येत असून त्यापासून त्यांना एक ते दीड लाख रुपये नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या शेतात हापूस आंबा, केसरी, राजापुरी ही आंब्याची पिकेही घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी त्यांनी आपल्या शेतात साळोख धरणाच्या पाण्यावर सात एकरमध्ये कमी खर्च येणारे पीक म्हणजे डांगर आणि कोळीची लागवड केली आहे. यासाठी त्यांना 20 हजार रुपयेचे बियाणे, 20 हजार औषधे, 15 हजार खत, मजूर व इतर खर्च 10 हजार असा सुमारे 60 ते 65 हजार रुपये खर्च आला आहे. पीक तयार झाले असून ते पूर्ण पीक कल्याण येथील बाजारपेठेत नेत असतात. कमी खर्चात जास्त उत्पादन मिळत असल्याचे ते सांगतात. यापासून त्यांना सुमारे डांगर आणि कोळीपासून सुमारे 8 लाखांहून अधिक नफा झाला आहे.