लोणावळ्यातील नामांकित हॉटेले आणि रिसॉर्टवर छापे टाकून अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी या बड्या नावांकडून ग्राहकांची कशी घोर फसवणूक केली जाते आहे हे उघडकीस आणले आहे. या नामांकित हॉटेलांकडून ग्राहकांना अशा निकृष्ट, प्रसंगी दूषित ठरू शकणार्या अन्नपदार्थांची अपेक्षा निश्चितच नव्हती. अर्थातच बेसुमार नफेखोरीसाठी या हॉटेलांनी हे केले.
पावसाळा सुरू झाला की आपल्यातील काही जण पाणी गाळून, उकळून पिणे, शक्यतो शिजवलेले, गरम अन्न खाणे याबाबत काहिसे काटेकोर होतात. म्हणजे दूषित अन्नपाण्यावाटे होणारे आजार टाळायचे असतील तर किमान पावसाळ्यात उपरोक्त दक्षता घ्यावी असे डॉक्टर मंडळी आवर्जून सांगतात. अगदी शालेय विद्यार्थ्यांना देखील या दक्षतेचे धडे दिले जातात. पण प्रत्यक्षात किती जणांच्या जागरुकतेत त्यामुळे भर पडत असावी हा प्रश्नच आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांत आपण घराबाहेर खाण्याकडे वळतो आहोत की स्वच्छ, सकस आहाराचा विचार खरेच किती जण प्राधान्याने करत असतील हा संशोधनाचाच विषय ठरावा. याबाबतीत आपण प्राधान्य देतो ते निव्वळ चवीला आणि सोयीला. गेल्या काही दिवसांत, महिन्यांत आपल्या अवतीभवती, विशेषत: मुंबई आणि आसपासच्या परिसरात अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत, दूषित पाणी वा अन्नघटकांचा वापर करून पदार्थ बनवले जात असल्याचे किती प्रकार समोर आले आहेत. हे प्रकार समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेताना दिसतात. यास्वरुपाचे ताजे उदाहरण पाहायचे तर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नुकतीच लोणावळ्यातील नामांकित हॉटेले आणि रिसॉर्टवर केलेली कारवाई पहा. व्हॉट्सअॅपवर ही बातमी चांगलीच व्हायरल झाली. हीच काय, अशा स्वरुपाच्या सगळ्याच बातम्या गेल्या काही महिन्यांत व्हॉट्सअॅपवर सातत्याने व्हायरल होत आल्या आहेत. मग ती बातमी लिंबू सरबत बनवण्यासाठी सार्वजनिक मुतारीच्या टाकीतील पाणी वापरणार्या विक्रेत्याची असेल, हॉटेलाच्या पाण्याच्या टाकीवर उभे राहून आंघोळ करणार्या इसमाची असेल वा लोणावळ्यासारख्या पावसाळ्यात देशभरातून गर्दी खेचणार्या पर्यटनस्थळी ग्राहकांना शिळे चिकन, तारखा उलटलेले मसाले, ब्रेड खाऊ घालणार्या हॉटेलांची असेल. अशा बातम्या समाजमाध्यमांवर लक्षवेधी ठरतात. तिथे लोक वेळ काढून त्यांचे तपशील वाचतात, शेअर करतात, त्यावर चर्वितचर्वणही करतात. पण अंतिमत: त्यातून परिस्थितीत काही बदलते का, तर तो प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. रस्त्याकडेचा छोटेखानी खाऊची गाडी चालवणारा विक्रेता तर अशा मार्गानेच कमाई करीत असतो. तुटपुंज्या भांडवलानिशी धंदा करताना हे असले प्रकार केले जातातच. पण त्याचा विचार ग्राहक कुठे करतात. रस्त्याकडेला पाणीपुरी, भेळपुरी, लिंबूसरबत विकणारे पाणी कुठून बरे आणत असतील या गैरसोयीच्या प्रश्नाचा विचार न करता आपण त्याच्या चवीवर लक्ष केंद्रित करतो आणि मिटक्या मारत या चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेऊन मोकळे होतो. बड्या हॉटेलांतून आपल्याला कुणी सडका भाजीपाला, शिळे चिकन खाऊ घालत असेल अशी आपल्याला शंका देखील येत नाही. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईतून वा काही सजग नागरिकांनी समाजमाध्यमांवर टाकलेल्या व्हिडिओंतून हे वास्तव ठळकपणे समोर आले आहे. पण मग आता हे प्रकार रोखणार कसे, यावर गांभीर्याने विचार होण्याची नितांत गरज आहे.