भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचा अहवाल
महाड : प्रतिनिधी
पावसाळा सुरू झाला की रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त व दरडग्रस्त गावांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुढे येतो. जिल्ह्यात अशी 105 धोकादायक गावे असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या सर्व गावांतील ग्रामस्थांना आपत्तीची कारणे व आपत्ती निवारणाबाबत प्रशिक्षण देऊन ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली आहे. या प्रशिक्षणामुळे ग्रामस्थ सतर्क झाले आहेत.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार रायगड जिल्ह्यातील 105 गावे दरडग्रस्त व धोकादायक म्हणून जाहीर झाली आहेत. यामध्ये कमी, मध्यम व अतिधोकादायक अशी वर्गवारी करण्यात आलेली आहे. नैसर्गिक आपत्तीचा इतिहास असलेल्या या जिल्ह्यात 2005 मध्ये सर्वात मोठी हानी झाली होती.
दरड कोसळणे, जमिनीला भेगा पडणे, अशा घटना येथे घडल्या आहेत. त्यामुळे अतिवृष्टी होऊ लागली की येथील नागरिक भयभीत होतात. दरडग्रस्त व पुराचा धोका संभवणारी अनेक गावे असल्याने या गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होत असतो. महाड तालुक्यात 2005 मध्ये 194 जणांचा दरडीखाली गाडले गेल्याने मृत्यू झाला होता. यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी वाढली. आपत्ती व मदतकार्य याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ असल्याचे दिसून आले त्यामुळे आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने कंबर कसली आहे.
दरड कोसळण्याची कारणे, दरड कोसळण्यापूर्वीचे संकेत, ग्रामस्थांची जबाबदारी, पावसाळ्यात घ्यावयाची खबरदारी, आपत्ती आल्यास करण्याच्या उपाययोजना याचे सविस्तर प्रशिक्षण या 105 गावातील ग्रामस्थांना देण्यात आले. यासाठी तीन मास्टर ट्रेनर्स नेमण्यात आले होते. त्यांनी आपत्ती व उपाययोजनांची प्रात्यक्षिके दाखवली.
प्रत्येक मंडळ कार्यालय क्षेत्रात पर्जन्यमापके बसवलेली आहेत. 500 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला असेल, माती मिश्रित पाणी डोंगरातून येत असेल, झाडे वाकडी होत असल्यास ग्रामस्थांनी धोका समजून स्थलांतरित व्हावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक गावात सूचना फलकही लावण्यात आलेले आहेत. यामुळे ग्रामस्थ आता आपत्ती निवारणासाठी सज्ज झाले आहेत.