Breaking News

पनवेल महानगरपालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पनवेल ः प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक काळात महानगरपालिका कर्मचारी वृंद निवडणूक कामासाठी व्यस्त असल्याने काही लोकांनी याचा गैरफायदा घेऊन अनधिकृत चाळी बांधण्याचा सपाटा लावला होता. आता पावसाळा तोंडावर आला असताना प्रशासन कारवाई करणार नाही अशा समजुतीत चाळमाफिया असताना पालिकेने अशा बांधकामांवर हातोडा मारला आहे. पनवेल रेल्वे स्टेशन व बसस्थानक परिसरातील अनधिकृत व्यवसाय करणार्‍या झोपडपट्टीतील दुकानांवर कारवाई केल्यानंतर आयुक्त गणेश देशमुख यांनी ग्रामीण भागात सरकारी जागेवर चाळी उभी करणार्‍यांकडे आपला मोर्चा वळविला आहे.

आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांचे मार्गदर्शनाखाली पुन्हा अनधिकृत बांधकाम निष्कासन मोहीम सुरू करण्यात आली.

पावसाळ्यात व सुट्टीच्या दिवशी घाईत चाळी बांधून त्यातील खोल्या परप्रांतीय लोकांना तीन चार लाखात विकण्याचा मानस काही स्थानिक लोकांचा होता. स्थानिक लोकांच्या पाठिंब्याशिवाय अशा चाळी होणे शक्य नाही. या परिसरात कामासाठी अनेक परप्रांतीय येऊन राहत आहेत. एका बाजुला स्थानिकांना रोजगार नाही म्हणायचे परंतु परप्रांतीय लोकांना अवैधपणे संरक्षण देऊन आपल्याच लोकांचा रोजगार हिरावून घ्यायची वृत्ती वाढली आहे. यातूनच अनधिकृत बांधकामे करुन सरकारी जागा हडप करण्यात येत आहेत. म्हणूनच पनवेल महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलीस बंदोबस्तात आज शनिवारी सुट्टी दिवशी देखील कारवाई करून चाळमाफिया व त्यांच्यावर वरदहस्त असणार्‍यांना सूचक इशारा देऊन त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. 

ठाणे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पनवेल महानगरपालिका हद्दीत गायरान जमिनींवर आडिवली येथे डोंगराच्या पायथ्यालगत शेकडो चाळी आणि त्यातल्या सुमारे दोनशे खोल्या आज  शनिवारी भुईसपाट केल्या.

प्रभाग अधिकारी भगवान पाटील, प्रकाश गायकवाड, सुरेश गांगरे, श्रीराम हजारे, अधिक्षक हरिश्चंद्र कडू, अभियंते राजेश कर्डिले, अनिल कोकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तळोजा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. लांडगे यांनी चोख बंदोबस्त पुरविला.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply