Breaking News

सहज सेवा

॥ मनी नाय भाव, अन् देवा मला पाव। देव अशाने पावायचा नाय रे, देव बाजारचा भाजीपाला नाय रे। हा समाजसेवेचा संदेश देणार्‍या गाडगेबाबांनी देव अजून पावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. सगळं काही तोच देतो, तोच पुरवितो सगळ्यांची हौस. शेतकरी बघतो आभाळाकडं, मग गेला कुठं पाऊस ॥ खूप केलं हरी हरी, तरी मुखात कधी मावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत देव घावला नाही…।

कधी स्वतः राहून उपाशी, भूक त्याची भागवली, हा म्हणे नैवद्यावर थोडी साखर का नाही मागवली, आहार त्याचा वाढत गेला, कधी एक बकर्‍यावर भागला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक, अजूनपर्यंत घावला नाही। आंघोळ करतो दुधाने, जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या, तोच घागरी भरतो म्हणे पुण्य आणि पापाच्या, पाप आणि पुण्याचा हिशेब कधी मला त्यानं दावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत मला घावला नाही॥ असा संदेश देत सेवाभाव हाच देव असून भुकेल्याला अन्न तर तहान लागलेल्याला पाणी दिले म्हणजे त्यात देव आहे. परिसर स्वच्छ ठेवावा, आरोग्याची काळजी घ्यावी, असा संदेश  कीर्तनात  देत असत. जनसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे त्यांचे वचन होते. देव देवळात न पाहता समाजातील दीनदुबळ्या, रंजल्या गांजल्या असाह्य अनाथ लोकांच्या सेवेत वेळ दवडावा, त्यात देव आहे, अशी शिकवण संतांनी दिली.                                                                           

  याच समाजमनाचा वसा घेत  खोपोलीतील 6 ते 7 तरुण आपला प्रपंच सांभाळून मोकळा काही वेळ समाजसेवेसाठी देत आहेत.

समाजसेवा मग ती कोणत्याही स्वरूपात असो, कोणी देशाच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर तैनात असतो, कोणी बलिदान देतो, कोणी निस्वार्थीपणे समाजसेवा करीत असतो, तर कोणी समाजातील अनिष्ट चालीरीती रिवाजांच्या विरोधात आवाज उठवतो, हेही समाजसेवेचेच  व्रत आहे.  खालापूर-खोपोलीतील समाजसेवेची फळी सध्या त्यांच्या वेगळ्याच सेवेने चर्चित आहे. त्याला कारणही तसेच आहे. खोपोलीतील प्रसिध्द व्यापारी व समाजसेवेच्या प्रत्येक कार्यात हिरिरीने सहभाग घेणारे मात्र प्रसिद्धीपासून चार हात दूर असणारे जगदीशशेठ जाखोटिया. चार महिन्यांपूर्वी पनवेल-खोपोली असा प्रवास करीत असता महिला जातीची मनोरुग्ण फाटके तुटके कपडे, वेडेवाकडे चाळे करीत किंचाळत मार्गावरून जात होती. हळव्या मनाच्या जगदीश जाखोटिया यांच्या मनात करुणाभाव दाटून आला. आपण या मनोरुग्णांची सेवा करायची अशी मनोमन संकल्पना बनवत याकामी  खोपोलीतील सहज सेवा संस्थेची मदत घेण्याचे ठरविले. त्यासाठी लागणारा आर्थिक भार, तसेच भासणारी उणीव आपण स्वतः उचलू असा  संकल्प केला. हीच कल्पना तीन वर्षांपूर्वी एका नामांकित  सामाजिक संस्थेला  जाखोटिया यांनी दिली होती, मात्र काहीच उत्तर आले नव्हते, मात्र या वेळी ही संकल्पना संपूर्ण खालापुरात मोठ्या हिमतीवर राबवली जात आहे. याचे श्रेय जगदीश जाखोटिया, शेखर जांभळे व टीमला जाते. खोपोली, खालापुरात एखादा मनोरुग्ण आढळल्यास सहज सेवेची टीम त्या मनोरुग्णाला रिक्षामध्ये बसवून गगनगिरी आश्रमाजवळील पाताळगंगा नदीच्या किनारी नेत साबण लावून दोन ते तीन वेळा मनोरुग्णाच्या स्थितीवरून न्हावू घालतात. त्याच्या डोक्यावरील केस काढून त्याला तेल लावून स्वच्छ केले जाते, तर नवीन कपड्यांचा पेहराव करून खाणे पिणे दिले जाते आणि कायदेशीर सोपस्कार करून कर्जत येथील श्रद्धा फाऊंडेशन येथे दाखल केले जाते. या सेवेतून खोपोली, खालापुरात मनोरुग्णांच्या

भटकंतीने निर्माण झालेली घाण, दुर्गंधी व अस्वच्छता नष्ट होऊ लागली आहे, तर मनोरुग्णांची  किंचाळी, आरडाओरडा, अपशब्द, चित्रविचित्र हावभाव  यातून परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण, दहशत पसरत होती. लहानगे मोकळेपणाने खेळू शकत नव्हते.ते आता कमी होत आहे.

खोपोली मुंबई-पुणे या दोन महानगरांच्या  मध्यवर्ती आहे. मुंबईपासून रेल्वेची थेट सेवा असल्याने कामानिमित्त व  इतर कारणांकरिता येणार्‍या-जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. याच शहरात रेल्वे व अन्य माध्यमातून मानसिक संतुलन बिघडलेली आणि वेडसर व्यक्तीही येत असतात. अशा व्यक्तींची अस्वच्छता व राहणीमान सर्वांनाच त्रस्त करून जाते. यातूनच रोगराई पसरण्याची आणि लोकांना मानसिक त्रास होण्याचे प्रमाण अधिक असते. सहजसेवा फाऊंडेशनने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच खोपोली शहर व आसपासच्या परिसरात भ्रमंती करीत असणार्‍या मनोरुग्ण  व्यक्तींना स्वच्छ करण्याचा आणि खोपोलीकरांचा मानसिक त्रास कमी करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यास समाजातील धनिक, सामाजिक, सेवाभावी व्यक्तींची मदत होत आहे. मनोरुग्णांची सेवा करण्याचा श्रीगणेशा माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने करण्यात आला. खोपोलीतील पाटणकर चौकात आढळलेल्या मनोरुग्ण व्यक्तीला दिनांक 08/02/2019 रोजी सहजसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून गगनगिरी आश्रमाजवळील नदीकिनारी स्वच्छ आंघोळ घालण्यात आली. खोपोलीतील

केशकर्तन करणारे व्यावसायिक दुर्गेश देवकर यांनी सदर व्यक्तीचे केस व दाढी कर्तन करून दिली व ही सेवा कायम पुरविण्याचे आश्वासन दिले. आंघोळ, केस व दाढी झाल्यानंतर त्यास नवीन स्वच्छ कपडे पुरविण्यात आले. त्यानंतर त्या मनोरुग्णास पोटभर जेवण देऊन खोपोली पोलीस स्टेशनात अधिक चौकशीसाठी सुपूर्द करण्यात आले. दिनांक 12 फेब्रुवारी 2019 रोजी धाकटी पंढरी साजगाव येथे असणार्‍या मनोरुग्णाला  आंघोळ व स्वच्छता करून त्यास त्याचे नाव पुसण्यात आले.

मनोरुग्णाने आपले नाव प्रतीक असल्याचे सांगितले, तसेच मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेत टीमबरोबर फोटो काढला. तो दिवस सहजसेवेच्या टीमने र्हीस वरू साजरा केला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी सेवा व स्वच्छतेचा ध्यास घेतलेल्या सहजसेवेच्या पथकाने भारत जाधव नामक मनोरुग्णास स्नान व नखे, केस कापून नवीन कपडे दिले, तर गुलाबपुष्प देत व्हॅलेंटाइन डे साजरा केला. उपस्थित युवक-युवतींनीही त्याच्याबरोबर सहज सेल्फीचा आनंद घेतला. 15

फेब्रुवारीला मनोरुग्णावर सर्व सोपस्कार करून नवीन कपडे देत नवीन लूक देण्यात आला. अशीच मनोरुग्णांची सेवा दिनांक 16 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आली. 18 फेब्रुवारी 2019 खोपोली परिसरातील मनोरुग्णाला नवीन जीवन दिले. 20 फेब्रुवारी 2019 रोजी निनावी रुग्णावरही उपचार करण्यात आले. आतापर्यंत किमान 14 मनोरुग्णांना नवा लूक देत नवीन जीवन देण्याचे काम सहजसेवेच्या माध्यमातून टीमने केले आहे. या उपक्रमासाठी खोपोलीतील उद्योजक जगदीशशेठ जाखोटिया, झरकर तसेच ज्ञात अज्ञात दानशूरांनी मदत करण्याचे ठरविले आहे. उपक्रमासाठी बंटी कांबळे, राकेश दळवी, धनराज जंबगी, संदीप हंचलीकर, रवी गौडा, दुर्गेश देवकर, राजकुमार आयवाले यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

खोपोली शहरात आजूबाजूला असे व्यक्ती आढळल्यास संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन सहजसेवा फाऊंडेशनचे हितचिंतक जगदीश जाखोटिया, अध्यक्ष शेखर जांभळे यांनी केले असून असा उपक्रम  इतर ठिकाणीही राबविला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. एका महिला मनोरुग्णावर उपचार करण्यासाठी पथक गेले असता त्या महिलेने माझ्या मागे मागे का फिरतोस, असा सवाल केला, तर मनोरुग्णाची साफसफाई करताना डोक्यामध्ये जीवजंतू व शर्ट तसेच मानवी विष्ठाही धुवावी लागत असल्याचा अनुभव सहजसेवा पथक सांगत आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply