Breaking News

मतभेदांना द्या मूठमाती, निश्चित जिंकणार भाजप-शिवसेना मित्रपक्षांची महायुती!

मुंबईचे माजी महापौर डॉ. रमेश प्रभू यांच्या विलेपार्ले विधानसभेतील पोटनिवडणुकीत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा निवडणुकीचा मुद्दा हिंदुत्वाचा घेतला आणि 1989 नंतर खर्‍या अर्थाने मराठी माणसाच्या, त्याच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेना हिंदुत्ववादी बनली. आपण हिंदुत्व का घेतले याबद्दल दस्तुरखुद्द बाळासाहेबांनी मला 20 जानेवारी 2010 रोजी ‘मातोश्री’ येथे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.

बाळासाहेब म्हणाले की, मराठी मराठी म्हणून आपण पाकिस्तानशी दोन हात करू शकणार नाही. हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतली तर हिंदुस्थानातला तमाम हिंदू एकवटून, एक होऊन पाकिस्तानच नामोहरम करू शकेल. आमचे मित्र जयंत करंजवकर यांनी बाळासाहेबांवर एक पोवाडा लिहिला होता आणि त्या पोवाड्याची शाहीर विठ्ठल उमप यांच्या पहाडी आवाजात ध्वनिचित्रमुद्रिका तयार केली होती. या ध्वनिचित्रमुद्रिकेचे प्रकाशन 20 जानेवारी 2010 रोजी बाळासाहेबांच्या हस्ते ‘मातोश्री’ येथे झाले. त्यावेळचा हा किस्सा. तत्पूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर न्यायालयात मी बाळासाहेबांची हिंदुत्वाची व्याख्या विविध खटल्यात साक्षीदार म्हणून गेलो तेव्हा डॉ. मनोहर जोशी यांच्या 1940च्या भाऊराव पाटील विरुद्ध मनोहर जोशी या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयात न्या. सॅम वीरपावा यांच्या न्यायालयात नमूद केली होती.

भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रवादी, राष्ट्रप्रेमी विचारांची आणि हिंदुत्व हाही भारतीय जनता पार्टीचा विचार असल्याने 1990च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे वरिष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करून शिवसेना-भाजप युतीला मूर्त स्वरूप दिले. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन हे शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार बनले. लोकसभेत बाळासाहेबांनी भाजपला झुकते माप दिले आणि विधानसभेत शिवसेना 171 आणि भाजप 117 असा एकूण 288 जागांचा आराखडा (फॉर्म्युला) तयार झाला. 1990, 1995, 1999, 2004, 2009 अशा विधानसभेच्या निवडणुका शिवसेना-भाजप युती म्हणूनच लढल्या गेल्या. 1990 साली शिवसेनेला 52 आणि भाजपला 42 जागा अशा एकूण युतीच्या 94 जागा जिंकताना सत्ता थोडक्यात हुकली, पण त्यावेळचे विधानसभेचे वातावरण एकदम ‘भगवे’ झाले होते. युतीचे सर्व आमदार भगवे फेटे परिधान करून आले होते. महिला आमदार भगव्या साड्या परिधान करून आल्या होत्या आणि ‘गर्व से कहो हम हिंदू है।’च्या निनादात विधानसभा दणाणून सोडली होती.

1995 साली शिवसेना-भाजप युती 45 अपक्षांच्या सहकार्याने सत्तेवर आली. डॉ. मनोहर गजानन जोशी आणि गोपीनाथराव पांडुरंग मुंडे यांनी अरबी सागराला लाजवेल अशा शिवतीर्थावरील जनसागराच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची 14 मार्च 1995 रोजी शपथ घेतली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि तमाम दिग्गज नेते या देवदुर्लभ शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. राज्यपालांनी शिवशाही सरकारच्या मंत्र्यांना शपथ दिल्यानंतर त्यांचे प्रस्थान होताच जाहीर विराट सभेत रूपांतर झाले. न भूतो असा हा नेत्रदीपक शपथविधी सोहळा महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात नोंद होईल असा झाला होता.

शिवसेना-भाजप युती मग 171-117 फॉर्म्युला व 169-119 अशी पुढे झाली. 2014 साली नरेंद्र मोदी यांची लाट आली आणि लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 42 जागा महायुतीच्या निवडून आल्या. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. भारताच्या इतिहासात संपूर्ण बहुमत मिळालेले बिगर काँग्रेसी सरकार अधिकारारुढ झाले. दुर्दैवाने 3 जून 2014 रोजी गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर आणि पर्यायाने युतीवर परिणाम झाला. प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा राज्यशकट हाकण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले, पण मोदी करिष्मा आणि फडणवीसांची राजनीती यामुळे 15 वर्षे सत्ता भोगलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला पायउतार व्हावे लागले. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नसल्याने देवेंद्र फडणवीस यांनी चाणक्य नीतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून स्थिर सरकारसाठी तडजोड घडवून आणली आणि भाजपचे 123 आणि शिवसेनेचे 63 अशा 186 आमदारांच्या भरभक्कम पाठिंब्यावर 288च्या सभागृहात स्थिर सरकार घडवून आणले. खरे पाहता आसुरी महत्त्वाकांक्षा आणि फाजिल आत्मविश्वास नसता तर 1999 साली शिवसेना-भाजपच्या हातून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हातात सत्ता गेलीच नसती. पाडापाडीच्या राजकारणात 69 जागा गमवाव्या लागल्या आणि दोन्ही काँग्रेस सत्तेवर आल्या. अर्थात 2014 साली शिवसेनेबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी सौहार्दाची व्यापक भूमिका घेतली आणि चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, डॉ. मनोहर जोशी, सुभाष देसाई, दिवाकर रावते, अनिल देसाई, एकनाथ शिंदे आदींनी त्यांना चांगली साथ देत हे सरकार आपली कारकीर्द पूर्ण करेपर्यंत मजल मारली.

अर्थात दोन्ही पक्षांची युती होणे ही काळाची गरज होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. व्यापक जनहितासाठी देशहितासाठी हिंदुत्वाच्या विचारधारेच्या पक्क्या धाग्याने भाजप-शिवसेना युती पक्की करण्याचा निर्णय घेतला आणि सोमवार 18 फेब्रुवारी 2019 रोजी मातोश्रीमार्गे वरळीच्या ब्ल्यू सी हॉटेलात भाजप-शिवसेना युतीचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घोषित करून या हिंदुत्ववादी युतीचे पुनरूज्जीवन केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप-शिवसेना युती म्हणूनच लढणार असल्याचे जाहीर झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ही युती महाराष्ट्र आणि देशाचा विकास निश्चितपणे घडवून आणेल, असा विश्वास व्यक्त केला. गेले चार वर्षे काय होणार? युती होणार का नाही? काँग्रेसवाले तर युती व्हावी म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. कारण युती झाली नाही तर भाजप-शिवसेना समोरासमोर लढतील आणि आमचे अस्तित्वच राहणार नाही, असे काँग्रेस नेते बोलून (खासगीत) दाखवत होते, पण महाराष्ट्र आणि हिंदुस्थानच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिवसेना-भाजप युती होणे आवश्यक होते. ही काळाचीच गरज आहे.

युतीची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे मुद्दे-भूमिका मान्य करण्यात आल्याचे मोकळेपणाने सांगून त्याची सविस्तर माहिती दिली. त्यात मग अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर, शेतकरी कर्जमुक्ती, त्यांना चांगले भवितव्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न, नाणारचा प्रकल्प, मुंबई, ठाणे परिसरात 500 चौरस फूट सदनिका मालमत्ता करातून मुक्त अशा महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.

युती तर झाली पण ती टिकवून चांगला राज्यकारभार करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय युतीच्या शिल्पकारांना घ्यावे लागतील. युती ही दोन पक्षांची आहे. दोन्ही पक्षांची मते, दोन्ही पक्षांच्या भूमिका वेगवेगळ्या असणारच, नाहीतर मग तो एकच पक्ष नसता का झाला? पण किमान समान कार्यक्रम तयार करणे, समन्वय समिती नेमणे, केंद्रात मोदी-शहा हे समर्थ आहेत, पण महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी ही युती चिरकाल टिकावी म्हणून दोन्ही पक्षांची समन्वय समिती नियुक्त करावी. भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांना त्या छोट्या मोठ्या कुरबुरी या समन्वय समितीने सोडवाव्यात. मोठा प्रश्न निर्माण झाला तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनी बसून चर्चा करून तो सोडवावा. दोन्ही पक्षांतील ‘वाचाळवीर’ नेत्यांना पायबंद घालावा. एक आदर्श आचारसंहिता दोन्ही पक्षांसाठी बनवावी. मतभेद, वाद, विवाद विकोपाला नेण्यात येऊ नयेत, ते समन्वय समितीने सोडवावेत.

जनता पार्टीचे सरकार आले तेव्हा ती जनता पार्टी टिकावी म्हणून वसंतराव त्रिवेदी यांनी एक सूचना समोर ठेवली होती. समाजवादी, जनसंघ, भारतीय लोकदल आणि संघटना काँग्रेस अशा चार पक्षांचा मिळून जनता पक्ष झाला होता. त्यामुळे हा पक्ष एकजिनसी व्हावा, एकरूप व्हावा म्हणून या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही पक्षातल्या श्रद्धास्थानांची जयंती, पुण्यतिथी एकत्र साजरी करावी. दोघांनी एकमेकांच्या श्रद्धास्थानांचा आदर राखावा. पराकोटीची टीका टाळावी. किंबहुना आपापसात टीका करूच नये. ज्येष्ठ पत्रकार, नाट्य समीक्षक संजय डहाळे यांच्याशी चर्चा करताना एक मुद्दा समोर आला. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला मानणार्‍या विचारवंतांचे एक ‘थिंक टँक’ बनवावे. जेणेकरून हे थिंक टँक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी सल्ला देऊ शकेल, मार्गदर्शन करू शकेल. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, विनय सहस्रबुद्धे, डॉ. मनोहर जोशी, डॉ. अशोक मोडक आदी विचारवंतांचा भाजप-शिवसेना युतीला निश्चित यासाठी उपयोग होऊ शकेल. पक्षीय पातळीवर एक समन्वय समिती आणि सरकार पातळीवर एक समन्वय समिती अशा रचना करण्यात आल्या तर दोन्ही पक्षांची युती भरभक्कम होण्यास आणि दोन्ही पक्षांच्या युतीचे सरकार सक्षमपणे, समर्थपणे चालविण्यास सोयीचे होऊ शकेल. युतीला समर्थन देणार्‍या मित्रपक्षांचा सन्मानाने विचार करून या युतीचे 2014च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी जशी महायुती बनवली होती तशी भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसंग्राम, सदाभाऊ खोतांची संघटना आणि महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष यांची महायुती भक्कम करावी. त्यांनाही सत्तेत सन्मानपूर्वक हिस्सा द्यावा. महायुतीच्या नेमणुका सत्वर मार्गी लावाव्यात. या गोष्टींकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे लक्ष निश्चित असेल हे नि:संशय! म्हणूनच मतभेदांना द्या मूठमाती, निश्चित जिंकणार भाजप-शिवसेना मित्रपक्षांची महायुती!

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply