पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन; वढाव ग्रामपंचायत निवडणूक
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/02/pen-1-1024x520.jpg)
पेण : प्रतिनिधी
वढाव ग्रुपग्रामपंचायतीच्या निवडणूकीत भाजप पुरस्कृत परिवर्तन विकास आघाडीच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार पूजा अशोक पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वढाव येथे केले.
वढाव ग्रुपग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील भाजप पुरस्कृत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री रविंद्र चव्हाण ग्रामस्थांना संबोधित होते. या भागातील विकास अधिक गतीमान होण्यासाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यत भाजपला विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
‘सबका साथ, सबका विकास‘ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा झंझावात सामान्यातल्यासामन्य माणसापर्यंत पोहचला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजना जनसामान्यपर्यंत पोहचल्या आहेत. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन गेल्या साडेचार वर्षांत देशाने व राज्याने अनुभवले आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये केंद्रात व राज्यात पुन्हा भाजपचेच कमळ फुलणार असल्यामुळे वढाव ग्रुप ग्रामपंचायतीवर भाजपचा कमळ फुलवा, असे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पेण तालुक्यामधील वाशी खारेपाटातील ज्वलंत असलेला पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 30 कोटी रूपये देऊन सोडविला आहे. या कामाची सुरूवात देखील झाली आहे. खारेपाटातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम भाजप सरकारने केले. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत वढाव ते भाल या रस्त्यासाठी 1.75 कोटी रूपये निधीची तरतुद करून हा रस्ता पूर्णत्वास नेला आहे. जिल्हा नियोजन फंडातून या ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकास कामे केली आहेत, अशी माहिती देत पालकमंत्र्यांनी यावेळी भाजपने पेण तालुक्यात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला.
यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, पेण तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, अशोक पाटील, जितेंद्र पाटील, अशोक म्हात्रे, वंदना म्हात्रे, विनोद म्हात्रे यांच्यासह भाजप पुरस्कृत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.