‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ या म्हणीचा प्रत्यय सध्या काँग्रेससह विरोधी पक्षांना येत आहे. कर्नाटकात जेडीएस, काँग्रेस, अपक्ष आमदारांनी मिळून मुख्यमंत्र्यांविरोधात बंड केले असतानाच शेजारील राज्य गोव्यात काँग्रेसच्या 10 आमदारांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला जोरदार झटका बसला आहे. सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाणार्या काँग्रेसला त्यानंतरही सातत्याने धक्के बसत असून, केवळ बघ्याची भूमिका घेण्यावाचून त्यांच्या ‘हाती’ काही उरलेले नाही. काँग्रेसच नव्हे; तर इतर पक्षांनाही गळती लागल्याचे संपूर्ण देशभरात दिसून येते. हे सर्व जण भाजपकडे आकर्षित होत असल्याने विरोधक कमकुवत आणि सत्ताधारी अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे.
देशाचे राजकारण अलीकडच्या काळात झपाट्याने बदलल्याचे प्रकर्षाने दिसून येते. 2014च्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेचे 2019मध्ये त्सुनामीत रूपांतर होऊन भाजपला पराभूत करण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकत्र आलेले पक्ष व त्यांचे नेते अक्षरश: वाहून गेले. हा काही चमत्कार नव्हता. त्यामागे होती प्रचंड मेहनत आणि सर्वसमावेशक कृती. बर्याचदा असे पाहावयास मिळते की सत्ता मिळाल्यावर त्या पक्षाचे ‘हायकमांड’ निश्चिंत होतात. पाच वर्षे निवांत राहून किंबहुना मजा मारून निवडणुका आल्यावर ते पुन्हा जनतेच्या दारी मतांचा जोगवा मागायला जात असतात. भाजपची कार्यपद्धती मात्र वेगळी आहे. स्वत: कडक शिस्तीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कामकाजातून देशाला आणि पक्षाला नवा आदर्श घालून दिला. यापूर्वीचे काँग्रेस आघाडीचे सरकार घोटाळे, गैरव्यवहारांमुळे पायउतार झाल्याचा इतिहास ताजा असताना भाजप युती सरकारने सर्वात आधी भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी पावले उचलली. स्वच्छ व पारदर्शक कारभारातून त्यांनी देशातील नागरिकांची मने जिंकली. आमचे सरकार सर्व घटकांच्या विकासासाठी काम करीत असल्याची भावना देशवासीयांमध्ये निर्माण करण्यातही त्यांना यश आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला दुसर्यांदा मिळालेले नेत्रदीपक यश सर्वांनी पाहिले आहे.
दुसरीकडे लोकसभेच्या रणधुमाळीत विरोधी पक्षांचे नेते स्वत: काय करणार हे न सांगता नकारात्मक प्रचार करून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करीत राहिले. खुद्द काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी हे सरकारवर केलेले आरोप सिद्ध करू शकले नाहीत. निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला असला, तरी पक्षरूपी बुडणारे जहाज वाचविण्याची धमक त्यांच्यात नाही, ना संकटाशी लढण्याची मानसिकता. सेनापतीलाच आत्मविश्वास नसल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे.
पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा असो वा अन्य राज्ये तेथील राजकीय परिवर्तन उद्याच्या भविष्याची नांदी आहे. काँग्रेसखेरीज प्रादेशिक पक्षांच्या नेतृत्वामध्येही दम राहिला नसल्याने स्वाभाविकच विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी सक्षम पर्याय भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळेच देश ‘भाजपयुक्त’ होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
महाराष्ट्रात तीन महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादीतील असंतुष्ट आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दमदार नेतृत्वामुळे भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हमखास विजय अशी खात्री असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. विधानसभा रणसंग्राम जसजसा जवळ येईल तसा पक्षांतराला खर्या अर्थाने वेग येईल.
-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)