म्हसळा पोलीस स्थानकातील संतापजनक प्रकार
म्हसळा ः प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित व आनंदी जीवन जागता यावे, यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र शनिवारी (दि. 13) म्हसळा पोलीसांत चोरीची तक्रार देण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ महिलेला तब्बल दोन तास तक्रार न घेताच वेठीस धरून ठेवले. म्हसळा तालुक्यातील देवघर येथील साईनाथ सेवा ट्रस्टच्या संस्थापक आशा शिवाजी चाळके (वय 67) यांच्या घरातील व साई मंदिरातील चोरीच्या घटनेची तक्रार द्यायला त्या म्हसळा पोलीस ठाण्यात गेल्या असताना म्हसळा पोलिसांकडून त्यांना संतापजनक अनुभव आला. चाळके आजींच्या घरात शुक्रवारी (दि. 12) रात्री साडेअकरा ते पहाटे 4च्या दरम्यान चोरी झाली. चोरट्यांनी आजीच्या घरातील दोन चांदीच्या देवाच्या मूर्ती व साई मंदीरातील चावी चोरली. नंतर मंदिरात काही सापडते का, हे बघायला कपाट फोडले. त्यातून त्याने केवळ अत्तर बाटली घेतली व तेथेच एक सफेद रंगाची टॉर्च व जॅकेट सोडून गेल्याचे आजींनी पालिसांना सांगितले. आशा शिवाजी चाळके व साईभक्त अनिल महामुनकर सकाळी साडेदहाच्या दरम्यान म्हसळा पोलिसांत चोरीची तक्रार देण्यासाठी पोहोचले. ठाणे अंमलदार महिला कॉन्स्टेबल सी. आर. कोपनकर यांनी चोरीची खबर तत्काळ घेणे जरुरी असताना तब्बल दोन तास टाळाटाळ केली. दोन तासांनी खबर घेतली. घटनास्थळी जाण्यासाठी पोलीस जीप असताना रिक्षा आणण्याबाबत सांगितले. चाळके अजींना याला नकार दिला, मी घरी जाते तुम्ही सवडीनी या, असे सांगितले. पोलिसांनी तब्बल दोन तास उशीरा खबर घेतली, सायंकाळी पाच वाजेपर्यंत खबरीची प्रत आजींना देण्यात आली नाही, कार्यालयात वरिष्ठ नसल्याने घटनेची नोंद केली नसल्याचे अंमलदार कॉन्स्टेबल कोपनर यांनी सांगितले.