Sunday , September 24 2023

एमएमआरडीएच्या विस्ताराला रायगड तयार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने आता आपल्या कक्षा रुंदावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात एमएमआरडीए मुंबई आणि ठाणेपुरती मर्यादित न राहता रायगड आणि पालघर जिल्ह्यात आपले क्षेत्र वाढविणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. प्राधिकरणाने आपले क्षेत्र वाढविण्याआधी त्या भागात पायाभूत सुविधांचे जाळे विणण्यासाठी सुरू केलेली सुरुवात हे राज्यातील भाजप- शिवसेना यांच्या युती सरकारचे धोरण समजले जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण राज्यातील प्रमुख महानगराप्रमाणे नियोजन करण्यासाठी पुढाकार घेत आहे. मुंबई महानगरात गेली दोन दशके यशस्वी नियोजन केल्यानंतर ठाणे महानगरात आणि नंतर ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एमएमआरडीएने आपले क्षेत्र वाढवले. त्या वेळी प्राधिकरणकडून नागरिकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना आपल्या शहराने जागतिक स्पर्धेत टिकाव धरावा यासाठी नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. सुसज्ज रस्ते, त्यात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उड्डाणपूल अशा पायाभूत सुविधा करून देत असताना होणारे नागरीकरण लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी एमएमआरडीए गेली काही दशके काम करीत आहे.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात यशस्वी नियोजन करून वाढते नागरीकरण लक्षात घेता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आपला विस्तार ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर, भिवंडी या ठिकाणी करतानाच कर्जत, पनवेल आणि उरण या रायगड जिल्ह्यातील तीन तालुक्यांत मागील 10 वर्षांपूर्वी सुरू केला. त्यात प्रामुख्याने प्राधिकरणाने आपले लक्ष हे रस्ते विकासावर दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यात केवळ रस्ते वाहतुकीवर नाही तर रेल्वे वाहतूक सुधारणा करण्यासाठी देखील एमएमआरडीएचे मोठे योगदान आहे. रेल्वेचे जाळे कर्जतपर्यंत न ठेवता खोपोलीपर्यंत उपनगरीय वाहतूक सुरू करण्यात यश आल्यानंतर आता जलवाहतूक देखील एमएमआरडीए आपल्या कक्षेत आणू पाहत आहे. त्यातून काही मोठ्या नागरी वस्त्या उभारण्यासाठी प्राधिकरण त्या त्या विकासकांना पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी मदत करीत असल्याचे दिसून येत आहे. हे केवळ आपले धोरण न ठेवता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नागरीकरणास गरजेचे असलेल्या सुविधा त्यात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, स्कायवॉक, मेट्रो रेल्वेचे जाळे या सुविधा उपलब्ध कारण्यासाठी देखील प्राधिकरणाने आपले लक्ष्य कायम ठेवले आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत, पनवेल आणि उरण पाठोपाठ आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे एमएमआरडीएने आपला विस्तार करण्याचे धोरण जाहीर केले आहे. जिल्ह्यातील हे तिन्ही तालुके आज नागरी वस्तीसाठी आरक्षित असलेले तालुके आहेत. या तिन्ही तालुक्यात सर्व भागात नागरीकारण झालेले दिसून येत असून रायगड जिल्ह्यातील अन्य तालुक्यात जिल्ह्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्षात घेऊन नागरीकरण करण्यासाठी जागेला बांधकाम करण्यासाठी वाढीव चटई क्षेत्र दिल्यास नागरीकरण होत असताना रायगड जिल्हा ते आव्हान पेलू शकते यासाठी राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील अन्य भागाची शिफारस केली होती. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि सिडको महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची दूरदृष्टी ही देखील महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेशाचा विस्तार करताना रायगड जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे आता अलिबाग, पेण आणि खालापूर हे तीन तालुके एमएमआरडीएच्या कक्षेत आले आहेत.

सिडको महामंडळ देखील आपली नागरी वस्ती पनवेल, उरण पाठोपाठ खालापूर आणि पेण तालुक्यात या भागातील जमिनीवर उभारण्यासाठी प्रत्यनशील आहे. त्यात आता रायगड जिल्ह्यातील तीन तालुक्यात एमएमआरडीए येत असल्याने स्थानिक खूश झाले आहेत. शेतकर्‍यांच्या जमिनीला भाव मिळणार असताना दुसरीकडे त्याच ठिकाणी नागरीकरण होणार असल्याने व्यवसाय वाढीसाठी देखील एमएमआरडीए महत्त्वाचे ठरणार आहे. अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण, तर दुसरीकडे पेण हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती असलेले तालुका आणि तिसरा तालुका म्हणजे ज्या तालुक्याला तेथील ओद्योगिकीकरणामुळे सोन्याचा धूर सोडणारा तालुका समाजाला जात होता, त्या खालापूर तालुक्यापर्यंत एमएमआरडीएचा विस्तार होत आहे. हा विस्तार मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणावर अंकुश असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्याकडे असलेले नगरविकास विभाग यांची दूरदृष्टी समजली जात आहे. कारण मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याच्या राजधानीच्या आसपास येण्याची देशातील उद्योजकांची इच्छा आहे. त्यांना सामावून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारपूर्वक विस्तार केला असल्याचे बोलले जात आहे.

खालापूर तालुक्याचे वैशिट्य म्हणजे तेथून पुणे आणि बेंगळुरूकडे जाणारे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले गेले आहे. त्यामुळे तेथे नागरी वस्तीसाठी अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे. त्यात तेथे आलेले उपनगरीय लोकलची सेवा हीदेखील जमेची बाजू समजली जात आहे. खोपोलीपर्यंत असलेली उपनगरीय सेवा आणि आता पनवेल-कर्जत या रेल्वेमार्गामुळे मुंबई आणखी जवळ येणार आहे. ही बाबदेखील मुंबई महानगर प्रदेशाचा विस्तार करताना महत्त्वाची ठरणार आहे. प्राधिकरणाने खालापूर तालुक्याला अधिक जवळ केल्याचे दिसत आहे, कारण चौक हे रेल्वेस्थानक आणि त्या ठिकाणावरून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग याचा फायदा उचलण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे. त्यामुळे प्राधिकरणाचा विस्तार करताना राज्य सरकारने रेल्वेच्या माध्यमातून प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याच वेळी या मार्गावर लवकरच उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पेण तालुका मुंबई महानगर प्रदेशात घेण्यात आला आहे. सेझमुळे चर्चेत आलेल्या पेण तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग आणि कोकण रेल्वे जात आहे. त्यामुळे पेण तालुक्याला मोठे महत्त्व आहे. पेण हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या तालुक्यातून जिल्ह्याच्या कोणत्याही भागात जाता येत असल्याने पेण या मध्यवर्ती ठिकाणी राहण्यासाठी अनेकांची पसंती असते. हे लक्षात घेऊन पनवेल येथून प्रवासी सेवा अधिक असावी यासाठी शटल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पेणचे महत्त्व त्यातून अधिक अधोरेखित होत असून पेणमध्ये नागरीकरण करण्यासाठी असलेले  पोषक वातावरण लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेशात पेण तालुक्याचा विशेष करून सहभाग करून घेण्यात आला आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अनेक वर्षे रखडलेल्या कामाला मागील वर्षात गती देण्यात आली आहे, तर त्या ठिकाणी येण्यासाठी रेल्वे सुविधा अधिक सुखकर होण्यासाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण काम हाती घेण्यात आले आहे. पायाभूत सुविधांचे जाळे उभारण्याचे काम पेणमध्ये जोरात सुरू आहे.

अलिबाग या तालुक्यापर्यंत  एमएमआरडीएचा आता विस्तार झाला आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने रायगडच्या विकासाला गती येणार अशी सुचिन्हे दिसू लागली आहेत. कारण सागरी मार्गाने मुंबईपासून जवळ असलेले हे ठिकाण एमएमआरडीएमुळे हे शहर आपल्या कवेत घेऊ शकणार आहे, त्यासाठी सागरी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सागरी मार्गाने प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे धोरण जाहीर केले आहे. अलिबागला जाण्यासाठी असलेल्या रस्ते मार्गाची सुविधा अधिक बळकट केली जात आहे. गोवा राष्ट्रीय महामार्गापासून अलिबाग जवळ यावे यासाठी रस्ते प्रशस्त करण्याचे नियोजन आहे. सागरी आणि रस्ते मार्गाबरोबर अलिबाग हे रेल्वे मार्गाने जोडले जावे यासाठी थळ येथील राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्सकडे जात असलेल्या रेल्वे मार्गाचा उपयोग करून रेल्वे अलिबागपर्यंत नेण्याचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे स्वप्न आहे. कारण आरसीएफ हा खातनिर्मिती कारखाना केंद्र सरकारचा असून त्या खात्याचे गीते हे मंत्री आहेत. त्यामुळे त्यानिमित्ताने अलिबाग रेल्वे मार्गाने जोडले जाऊ शकते हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते असे वाटते. या सर्व बाबींचा विचार करता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा विस्तार झालेल्या रायगड जिल्ह्यातील खालापूर, पेण, अलिबाग या तिन्ही तालुक्यातचा विकास खर्‍या अर्थाने रुळावर येण्याची शक्यता आहे.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply