Friday , March 24 2023
Breaking News

योजनेचा लाभ शेतकर्यांपर्यंत पोहोचवावा

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन; प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा शुभारंभ

अलिबाग : जिमाका

केंद्र शासनाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबतची माहिती पात्र शेतकर्‍यांनी आपल्या परिचयातील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरुन अधिकाधिक शेतकर्‍यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी (दि. 24) येथे केले.

देशभरातील शेतकर्‍यांना प्रतिकुटूंब सहा हजार रुपये वार्षिक सन्माननिधी देण्याच्या  प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा रविवारी देशभरात शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त रायगड जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे व मुख्य सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले आले होते.  यावेळी उपस्थित शेतकर्‍यांशी जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी संवाद साधला.

आपल्या भाषणात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की,  रायगड जिल्ह्यात 88 ते 90 टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. शिवाय बहुतेक शेतकरी हे एक पिकपद्धतीचाच वापर करतात. अशा सर्व शेतकर्‍यांना ऐनवेळेचा आर्थिक आधार म्हणून ही योजना अधिक लाभदायक आहे.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी प्रास्ताविकात प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेची माहिती  दिली. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 4 हजार 542 कुटूंब या योजनेसाठी पात्र ठरले असून त्यांची माहिती ऑनलाईन अपलोड करण्यात आली आहे. पात्र शेतकर्‍यांची माहिती संकलित करुनअपलोड करण्याचे काम अद्याप सुरु असून येत्या 31 मार्च पर्यंत शेतकर्‍यांना या योजनेच्या लाभाचा पहिला हप्ता थेट बँक खात्यात अदा होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना आधार क्रमांक, बँक खाते पासबुक व मोबाईल क्रमांक या तीन बाबींची माहिती देणे आवश्यक आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, तहसिलदार (महसूल) विशाल दौंडकर, कृषी उपसंचालक तानाजी पावडे, तालुका कृषी अधिकारी श्याम धर्माधिकारी, तंत्र अधिकारी दीपाली अडसूळ, गणेश बांभळे, एनआयसीचे निलेश लांडगे यांच्यासह  जिल्ह्यातून प्रातिनिधीक स्वरुपात 50 शेतकरी बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते. या शेतकर्‍यांचे जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या हस्ते रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रधामंत्र्यांच्या मन की बात कार्यक्रमाचे तसेच उत्तरप्रदेशात गोरखपूर येथे झालेल्या मुख्य सोहळ्याचे थेट प्रसारण सर्व उपस्थीतांनी कार्यक्रम स्थळी पाहिले. त्यानंतर लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय शुभारंभ सोहळ्यात सहभागी झालेले शेतकरी मदन दामोदर म्हात्रे (रा. झीराडपाडा, ता. अलिबाग) यांच्या मोबाईलवर दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आणि त्यांचा चेहरा आनंदाने उजळला.

आर्थिक सहाय्य तीन टप्प्यांत देणार

शेतकर्‍यांना उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मानिधी योजना सुरु केलेली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना या योजनेअंतर्गत प्रती शेतकरी कुटूंबाला प्रतीवर्षी रुपये 6000 इतके आर्थिक सहाय्य तीन टप्प्यांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

   उद्देश : अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना निश्चीत  उत्त्पन्न मिळण्याकरीता मदत म्हणून शेतकर्‍यांच्या कृषी निष्ठा (खते बीयाणे कीटकनाशके) खरेदी करण्याकरीता लागणारी आर्थीक गरज भागविण्याकरीता आणी पिकांची योग्यनिगा राखून फायदेशीर ऊत्पन्न  मिळावे याकरीता ही योजना आहे.  अल्पभूधारक शेतकरी म्हणजे यांची जमीन दोन हेक्टर (पाच एकर) पर्यंत आहे त्यांना या योजनेचा लाभ आहे.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply