Breaking News

कठोर कायद्याला पर्याय नाही

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या नोव्हेंबर महिन्यात अन्नभेसळीसंदर्भातील धोरण कठोर करण्याची घोषणा केली होती. भेसळीचा गुन्हा अजामीनपात्र करून संबंधित आरोपींना जन्मठेप ठोठावण्याकरिता कायद्यात सुधारणा करण्याची भूमिका सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. लवकरच यादृष्टीने कायद्यातील बदल प्रत्यक्षात येऊ शकतात.

राज्य अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) आणि पोलिसांनी गेल्या चार दिवसांत मुंबईत निरनिराळ्या ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध ताब्यात घेतले आहे. गुरूवारी घाटकोपर येथून भेसळयुक्त दुधाचे नमुने चाचणीकरिता प्रयोगशाळेत पाठवून त्यानंतर सुमारे 500 लीटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. तत्पूर्वी मंगळवारी अंधेरी येथेही दूधभेसळीच्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला होता. दोन्ही ठिकाणी अमूल, गोकुळ, महानंदा आदि नामांकित बँ्रडच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये पाणी मिसळले जात असल्याचे आढळून आले. अंधेरी येथे सुमारे 348 लीटर दूध नष्ट करण्यात आले. दोन्ही ठिकाणी दुधाच्या पिशव्यांमध्ये पाणी मिसळून त्या पुन्हा सीलबंद केल्या जात होत्या. देशभरात सगळीकडेच अशातर्‍हेची भेसळ होते. अलीकडच्या काळात कित्येक राज्यांनी त्याविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून अन्नभेसळ करणार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जावी याकरिता संबंधित कायद्यात बदलही केले आहेत. अधूनमधून एफडीएच्या कारवाईत अशातर्‍हेने भेसळयुक्त दूध हाताशी लागत असल्याने कायदा कठोर करण्याची नितांत गरज असल्याचेच सिद्ध होते आहे. एफडीएकडून वरचेवर कारवाई केली जात असूनही हे भेसळमाफिया आपला गैरव्यवहार थांबवत नसल्याचेच गेली अनेक वर्षे दिसत आले आहे. काही वर्षांपूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या एका सर्वेक्षणातून राज्यातील तब्बल 20 टक्के दूध हे भेसळयुक्त असल्याचे समोर आले होते. त्या सर्वेक्षणानंतर कठोर कारवाई करून 21 दूधडेअरींचे परवाने रद्द देखील करण्यात आले होते. परंतु सततच्या कारवाईतून देखील या क्षेत्रातील गैरव्यवहार थांबताना दिसत नाही. अन्य एका पाहणीत दुधाचे 37 टक्के नमुनेे निकृष्ट दर्जाचे वा मानवीसेवनास योग्य नसल्याचे स्पष्ट झाले होते. ग्राहक संघटनेकडून काही वर्षांपूर्वी ही पाहणी करण्यात आली होती. दूधभेसळ टोळ्यांकडून दुधामध्ये अनेक प्रकारच्या पदार्थांची भेसळ केली जाते. यात पाण्याबरोबरच युरिया, स्टार्च, कॉस्टिक सोडा आदी पदार्थांचाही समावेश होतो. अन्य राज्यांमध्येही अशाच तर्‍हेची भेसळ आढळून येते. काही राज्यांत स्थानिक बँ्रडमध्ये सूक्ष्म जंतूही आढळले आहेत. शेतकर्‍यांकडून दूध जमा करून ते शहरी भागांपर्यंत पोहोचवेपर्यंत ठिकठिकाणी ते टिकावे म्हणून त्यात काही पदार्थ मिसळले जातात. वाहतुकीदरम्यान या दुधाचा दर्जा खालावतो व अखेर ग्राहकांपर्यंत जे दूध पोहोचते ते निकृष्ट दर्जाचे वा भेसळयुक्त आढळून येते. मुंबई शहर व आसपासच्या परिसरात या भेसळीमुळे अनेक सुखवस्तू वस्त्यांमध्ये उत्तम दर्जाचे दूध पुरवणारे छोटेखानी दूध व्यावसायिक आता दिसू लागले आहेत. हे दूध सर्वसाधारण नामांकित ब्रँडपेक्षा महागडे वा दुप्पट किंमतीचे असल्याचेही आढळते. अर्थातच सर्वसामान्यांना हे दूध परवडू शकणार नाही. गरीब वस्त्यांमध्ये सुट्या स्वरुपात विकल्या जाणार्‍या दुधात तर भेसळीचे प्रमाण खूपच अधिक आढळते. एकंदर परिस्थिती पाहता, कायदा कठोर केल्याखेरीज या भेसळीला अटकाव होणे शक्य दिसत नाही.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply