Breaking News

वन्यप्राण्यांची शिकार आणि तस्करी थांबणार कधी?

‘जीव जीवस्य जीवनम’हा मूलमंत्र देणारी आपली भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे. हे आम्ही सातत्याने ठणकावून आणि बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असतो, मात्र खरंच आपण तसं वागतो का? निसर्गाचा आदर आणि उपासना करणारी आमची संस्कृती. आज ह्याच संस्कृतीच्या अतिरेकामुळे भारतातील वनसंपदा आणि पर्यावरण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जगा आणि जगू द्या या विरोधात केवळ आपणच जगू या दुसर्‍यांना जगण्याचा अधिकार नाही या आमच्या स्वार्थी वृत्तीने वन्य प्राण्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

कोकणच्या पश्चिमघाट परिसरात एकेकाळी पट्टेदार वाघ, बिबटे, रानमांजर, खवलेमांजर, रानटी ससा, कोल्हा, तरस, मोर, गिधाड, भेकर, रानगवे यांसारखे जंगली प्राणी आणि पक्ष्यांचा सर्रास वावर असे. गावकुसाबाहेर कोल्हेकुई ऐकू यायची, तर हेच कोल्हे

अधूनमधून दर्शनही द्यायचे. टिटवीची टीवटीव, एखादं जनावर मेलं तर हजारो गिधाडांचे थवेच्या थवे जमा होत असत. ससे, कासव, खवलेमांजर, साळिंदर, कोल्हे, भेकर, रानगाय, गवे हे जंगली प्राणी सर्रास पाहायला मिळत होते, मात्र ही परस्थिती राहिलेली नाही. आपली वनसंपदा आपणच नष्ट करत चाललो आहोत. याला जसे आपण जबाबदार आहोत तसे प्रशासनदेखील तेवढेच जबाबदार आहे. या वन्य प्राण्यांच्या बाबतीत प्रशासन भावनाशून्य आहे. वनविभाग केवळ नावापुरते राहिले आहे. प्रभावशाली काम करण्याची संधी असतानाही या विभागाचे कर्मचारी वृक्षतोड आणि वनजमिनीवरील अतिक्रमणचा फायदा घेत केवळ पिशव्या भरण्याचे काम करीत आहेत. निर्दयपणे सह्याद्री आणि त्याच्या पर्वत रांगांमधील जंगले बेमालूमपणे तोडली जात आहेत, तर विकासाच्या आणि शहरांच्या विस्तारीकरणाच्या नावाखाली उरली-सुरलेली जंगलेदेखील नष्ट होत आहेत. महाबळेश्वर, माथेरान ही थंड हवेची पहाडी ठिकाणे सोडली, तर पश्चिम घाटातील डोंगर वृक्षतोडीमुळे बोडके होऊ लागले आहेत. भयावह वणव्यांनी तर कोकणाला जाळूनच टाकले आहे. या वणव्यांमुळे सरपटणारे आणि इतर लहानसहान वन्यप्राणी जीवाला मुकत आहेत. या वणव्यांवर नियंत्रण यावे यासाठी काही सामाजिक संस्था कार्यरत आहेत, मात्र जनजागृती होत नसल्याने वणव्यांचे प्रमाण काही कमी होत नाही, तसेच होळी आणि इतर सणांच्या नावाखाली वृक्षतोड कधी थांबणार आहे? हादेखील एक भेडसावणारा प्रश्न आहे.

आजकाल बंदुका बाळगण्याचे फॅड खूपच वाढले आहे. बंदुका घेऊन स्टाईलमध्ये फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात तरुणपिढी धन्यता मानत आहे. शेती आणि स्वसंरक्षणासाठी पोलीस खात्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रांचे परवाने दिले जात आहेत. या शस्त्रांचा अर्थात बंदुकांचा वापर मोठ्या प्रमाणात शिकारीसाठी केला जातो. हौस म्हणून आणि मांस तस्करीसाठी डुक्कर, ससे, भेकर, साळींदर यांची मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याने या प्राण्यांची संख्या संपुष्टात आली आहे. त्यामुळे या प्राण्यांवर अवलंबून असलेले प्राणीदेखील नष्ट होत चालले आहेत. अंधश्रद्धा आणि

जादूटोण्यासाठीदेखील मांडगुळ, खवलेमांजर यांसारख्या प्राण्यांची तस्करी होत आहे, तर चामडी अर्थात

खालीसाठीदेखील वाघ, बिबटे आणि रानमांजरीची शिकार केली जाते. ह्या सर्व शिकार आणि तस्करीमध्ये स्थानिकांचाच सहभाग मोठा असतो. तर या अवैध तस्करी आणि शिकारीला वनखाते आणि पोलीस प्रशासन यांचेदेखील काही प्रमाणात अभय असल्याचे दिसून येते. पश्चिम घाट जंगलातील ही अवैध शिकार आणि तस्करी रोखणे हे मोठे आव्हान समाजापुढे उभे आहे. कारण आपलीच वनसंपदा आपणच नष्ट करताना आपणच उघड्या डोळ्यांनी पाहत राहिलो, तर भविष्यातील तरुण पिढी आपल्याला केव्हाच माफ करणार नाही.

खरंच जर प्रशासनाची तळमळ आणि इच्छा असेल, तर ही अवैध शिकार आणि तस्करी शंभर टक्के बंद होऊ शकते. केवळ प्रबळ मानसिकता हवी. सर्वात प्रथम भरमसाठ दिले जाणारे शस्त्र परवाने रद्द करावेत. यासाठी घेतलेल्या बंदुका पोलिसांनी ताब्यात घ्याव्यात. यापुढे शेती व स्वसंरक्षणाच्या नावाखाली कोणालाही शस्त्र परवाने देण्यात येऊ नयेत, तसेच शस्त्र व बंदुकीच्या बुलेट विक्री करणारी दुकाने बंद करण्यात यावीत. बेकायदा शस्त्र बाळगणार्‍यास कडक शिक्षेची तरतूद करावी, तर वन्यप्राण्यांची शिकार आणि तस्करी करणार्‍यांना देहदंडाची शिक्षा देण्यात यावी. एवढे जरी सरकारने काटेकोरपणे राबविले, तरी शंभर टक्के या मुक्या वन्यप्राण्यांची शिकार आणि तस्करी बंद होईल. आरक्षित वने व व्याघ्र प्रकल्प निर्माण करून या प्रकल्पात असलेल्या गावांचे दुसरीकडे पुनर्वसन करावे. जंगलातील नागरिकांचा वावर बंद करून परवाने देण्यात यावेत. कायदे कडक करून काटेकोर अंमलबजावणी केली जावी. वन्यप्राण्यांना अभय देण्याची जबाबदारी ही बुद्धी असलेल्या मानवाचीच आहे. त्यामुळे आपल्या बुद्धीचा वापर करून आपण वनसंपदा वाचविण्यासाठी प्रयत्न करू या. कारण नष्ट करणे खूप सोपे आहे, पण निर्माण करणे खूप कठीण आहे. परमेश्वराने निर्माण केलेली ही सृष्टी आणि या सृष्टीतील वन्यप्राणी नष्ट करण्याचा कोणताच अधिकार आम्हाला नाही. त्यामुळे अखेरीस एवढंच म्हणावंस वाटतं की, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे निसर्ग व प्राणी यांच्यात प्रेमाचे नाते निर्माण करू व ‘जीव जीवस्य जीवनम’ या आपल्या संस्कृतीचा वारसा आपल्यालाच पुढे चालवायचा आहे.

– महेश शिंदे

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply