नवी मुंबई : बातमीदार
खारघर प्रभाग 4 मध्ये स्वच्छता राखण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असलेल्या स्वच्छतादूतांना डॉ. रामकृष्ण क्षार यांच्या सुमनकांता चाईल्ड व अॅडल्ट क्लिनिक यांच्या वतीने मोफत धनुर्वात (टीटी) इंजेक्शन देण्यात आले. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका नेत्रा पाटील यांनी हा उपक्रम राबवला. या वेळी जवळपास 80 स्वच्छतादूतांना ही लस देण्यात आली. स्वच्छतादूत विभागात स्वच्छता, साफसफाई करत असताना नकळतपणे कुठेतरी खिळे अथवा इतर काही टोकदार वस्तुमुळे इजा होत असते व त्याकडे दुर्लक्ष केल्यास एखाद्या मोठ्या आजाराला सामोरे जावे लागते. त्यासाठीच स्वच्छतादूतांनी वेळोवेळी टीटी लसीकरण करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत नगरसेविका पाटील यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी पनवेल महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक अतुल मोहोकर, पर्यवेक्षक जितेंद्र जाधव व साई गणेश एंटरप्राइजेसचे सुपरवायझर विश्वास पाटील व गणेश भोईर उपस्थित होते. स्वच्छता मित्र आपल्या स्वतःची काळजी न करता शहरातील राहिवाशांच्या आरोग्याची काळजी घेत स्वच्छता करत असतात. अशा वेळी कुठेतरी त्यांच्यादेखील शरीर स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तीच बाब लक्षात घेता एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माझीदेखील ती जबाबदारी आहे. प्रभागातील सर्व स्वच्छतादूतांना धनुर्वातचे इंजेक्शन मोफत देण्यात आले. यापुढेदेखील असा उपक्रम सुरू राहील, असे नगरसेविका नेत्रा पाटील यांनी सांगितले.