महाड : प्रतिनिधी
तालुक्यात सोमवारपासून कोसळणार्या पावसाने लाडवली बौध्दवाडी येथील एका निराधार विधवा महिलेच्या घरकुल योजनेतील घराचे छप्पर कोसळून घराचे मोठे नुकसान झाले. ग्रामपंचायतीकडून वारंवार मागणी होऊनही घरकुल योजनेतील घरांची दुरुस्ती होत नसल्याने ही घरे आता कोसळू लागली आहेत.
मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सुदर्शना धोत्रे (45, रा. लाडवली बौध्दवाडी) यांचे घर पावसाच्या मार्याने कोसळले. संपूर्ण छप्पर कोसळून घराचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घर इंदिरा आवास घरकुल योजनेतून बांधण्यात आले होते. लाभार्थी सुदर्शनाच्या पतीचे 15 वर्षांपूर्वी निधन झाले होते. सुदर्शना या दोन मुलांसह या घरात राहत होत्या. घराची दुरुस्ती व्हावी यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार विनंती केली होती, मात्र दुरुस्ती न झाल्यामुळे अखेर हे घर कोसळले आहे. कोसळलेल्या घराच्या नुकसानीचा तलाठ्यांकडून पंचनामा करण्यात आला आहे. सुदर्शना धोत्रे या मोलमजुरी करून आपली उपजीविका करीत आहेत. राहते घर कोसळल्यामुळे ऐन पावसात त्यांच्यासमोर निवार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाडवलीचे ग्रामसेवक मांडवकर सध्या कोल्हापूर येथे प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यांच्याशी संपर्क सधला असता घरकुल योजनेतील घरांच्या दुरुस्तीची मागणी आम्ही महाड पंचायत समितीकडे केली होती, मात्र पंचायत समिती प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याचे मांडवकर यांनी सांगितले.