आयुक्तांनी घेतली आढावा बैठक; नागरिकांना हलविले सुरक्षित ठिकाणी
कळंबोली ः प्रतिनिधी
पनवेल परिसरात तीन दिवस सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला, बंदर रोड, कोळीवाडा अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. कित्येकांच्या घरात पाणी गेल्याने आपत्ती सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे खाडीलगतच्या रहिवाशांना संरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचा आपत्कालीन विभाग सज्ज झाला. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शनिवारी सकाळी तातडीचे आढावा बैठक घेतली. या वेळी संबंधितांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या, तसेच ज्या ठिकाणी पाणी साचले आहे त्याचा निचरा करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहा. आयुक्त, सर्व प्रभाग अधिकारी, सर्व आरोग्य निरिक्षक, सर्व अभियंता व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. या वेळी बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला, तसेच प्रभाग कार्यालयांमध्ये आपत्कालीन नियोजनासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देणेत आले. दरम्यान, 26 जुलै 2005ला आलेल्या महाप्रलयाच्या कटू आठवणीच्या स्मृतीने रहिवासी घाबरून गेले होते. कळंबोली वसाहतीतही अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन चार दिवस विस्कळीत झाले होते. पनवेल-सायन-मुंब्रा महामार्गावरही पाणीच पाणी झाले होते. अतिवृष्टीमुळे शहराच्या ज्या सखल भागात पाणी साठले आहे, घरात पाणी घुसले आहे अशा ठिकाणांची दुपारपर्यंत यादी सादर करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाचे नियोजन करण्यात आले असून प्रभाग अधिकार्यांंनी अशा सर्व ठिकाणांना आज भेटी देऊन त्याचा अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिक्रमण विभागाची वाहन यंत्रणा आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी वाहन विभागाची वाहने चारही प्रभाग कार्यालयामध्ये रात्रीसाठी उपलब्ध करणेत आली आहेत.
महानगरपालिकेच्या सर्व अधिकार्यांना समन्वयासाठी पदाधिकारी, तसेच माध्यमांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी यास्थितीत कोणत्याही अफवांना बळी पडू नये. आपत्कालीन स्थितीत घाबरून न जाता महापालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
पनवेल ः वार्ताहर
नवीन पनवेलमध्ये दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. पिल्लई कॉलेजजवळील बिल्डिंगवर झाड पडल्याने संरक्षण भिंत कोसळली सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे आणि नगरसेविका वृषाली वाघमारे या वेळी आपल्या नागरिकांना मदत करीत होते.
शुक्रवारपासून पडत असलेल्या पावसामुळे नवीन पनवेलमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारपासून बांठिया स्कूल समोरील रस्त्यावर पाणी साचले आहे. सेक्टर 15 मधील मयूर सोसायटीत पिण्यासाठी पाणी नाही आणि बाहेर जाण्याचा रस्ताच पाण्यामुळे बंद झाला आहे. तेथील रहिवाशांना दीड ते दोन फूट गटार मिश्रित पाण्यातून बाहेर यावे लागत आहे. त्या ठिकाणी सिडकोने लावलेला पंप रात्रभर सुरू असूनही पाणी निघालेले नाही. शनिवारी सकाळी प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे यांनी भेट देऊन सिडकोच्या अधिकार्यांना बोलावून त्या ठिकाणी आणखी पंप लावण्याबाबत सूचना केल्या. नगरसेविका वृषाली वाघमारे आणि अॅड. जितेंद्र वाघमारे बांठिया स्कूल परिसरात फिरून तेथील पाणी काढण्याचा आणि इतर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. शनिवारी पिल्लई कॉलेजजवळील सेक्टर 16 मधील ब्लॅक स्मिथ पार्क येथील सुरक्षा भिंतीवर झाड पडल्याने भिंत कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक जवानांनी येऊन ते झाड बाजूला केले. धोकादायक झालेली झाडे पडण्याबाबत किंवा छाटणी करण्याबाबत पनवेल महापालिकेच्या नियमाप्रमाणे एका वृक्षाची छाटणी करण्यासाठी महापालिकची परवानगी घेऊन चार हजार रुपये महापालिकेला भरायचे मग महापालिका कर्मचारी येऊन त्याची छाटणी करतील. एका झाडाच्या फांद्या तोडायला काही शेकडा रुपये खर्च असताना चार हजार रुपये आकारले जात असल्याने सोसायटीच्या आवारातील धोकादायक झाडे छाटण्याचा हजारो रुपये खर्च परवडत नसल्याने धोकादायक झाडे पडली जात नाहीत किवा त्यांची छाटणी केली जात नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी झाडे पडण्याचा धोका निर्माण झाला असल्याची तक्रार अनेक सोसायटीचे पदाधिकारी करीत आहेत.
पनवेल महापालिकेने एका वृक्षाची छाटणी करण्यासाठी चार हजार रुपये आकारलेली फी ही निश्चितच जास्त आहे. त्याबाबत मी स्वत: आयुक्तांना पत्र दिले आहे. लवकरच त्याबाबत फेरनिर्णय होईल.
-तेजस कांडपिळे, अध्यक्ष, प्रभाग समिती पनवेल महापालिका