पनवेल ः वार्ताहर
सातत्यपूर्ण मुसळधार पावसामुळे व त्याच वेळी भरती असल्यामुळे पनवेल परिसरातील अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले होते. या विस्कळीत झालेल्या जनजीवनाचा पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रत्यक्ष ठिकठिकाणी जाऊन आढावा घेतला. शहरातील पाडा मोहल्ला, पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला, वीट सेंटर, कोळीवाडा अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. नागरिकांच्या घरात पाणी गेल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. खाडीलगतच्या नागरिकांना त्वरित शाळा, मसजिद या ठिकाणी सुखरूप हलविण्यात आले आहे. भरतीची वेळ असल्याने व त्याच वेळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पाणी बाहेर न जाता साठून राहत होते. या सर्व बाबींचा उपमहापौर विक्रांत पाटील यांनी आढावा घेतला, तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आवश्यक त्या सूचना महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांना देऊन परिस्थिती नियंत्रणात कशी राहील, याची माहिती घेतली.