Breaking News

गुन्ह्यांचा शोध गतिमान करणार्या अॅम्बिस प्रणालीचा शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी  – सुमारे सहा लाख गुन्हेगारांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, डोळ्यांचे बुबुळ इत्यादींचा एकत्रित डेटाबेस ऑनलाईन उपलब्ध करून देणार्‍या अ‍ॅम्बिस प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि. 29) शुभारंभ करण्यात आला. देशात अशा प्रकारची जागतिक प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या वेळी आनंद व्यक्त केला.

गुन्हेगारांची माहिती तत्काळ देतानाच गुन्हे व अपराध सिद्धीचे प्रमाण वाढविण्यास ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. गुन्हे तपासात गुणात्मक फरक जाणवतानाच गुन्ह्यांचा शोध ते गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी अ‍ॅम्बिस प्रणाली महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात हा कार्यक्रम झाला. या वेळी पोलीस आयुक्तालयातील जे. एस. भरुचा सभागृहाचे उद्घाटन, कचरामुक्त मोहिमेचा शुभारंभ आणि मुंबई पोलिसांच्या रक्षक हैं हम या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमास गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, गृहविभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, पोलीस गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी, महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह उपस्थित होते.

महाराष्ट्र सायबरने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या अ‍ॅम्बिस प्रणालीचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या प्रणालीचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञानाचे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्याने कायदा व सुव्यवस्था उत्तमपणे राखण्यासाठी मदत होत आहे. या माध्यमातूनच गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे, हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅनिंग साठविण्यासाठी अ‍ॅम्बिस (ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम) प्रणाली गुन्ह्यांच्या तपासाची गती वाढवणारी ठरेल. त्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

पोलीस दलाने आधुनिकीकरणाची कास धरताना आरोपींचे फिंगर प्रिंट घेण्याची कालबाह्य पद्धत बदलून आता केवळ बोटांचे ठसेच नाही, तर हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करून ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यात येणार असल्याने गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे अ‍ॅम्बिस प्रणाली पोलिसांचे गुगल म्हणून नावारूपास येईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

राज्यात सीसीटीव्ही, सीसीटीएनएस आणि अ‍ॅम्बिस प्रणालीचा वापर सुरू केल्यानंतर गुन्हेगारास तत्काळ अटक होतानाच गुन्हे व अपराध सिद्धीचे प्रमाण वाढले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी या वेळी काढले.

अ‍ॅम्बिस प्रणालीची अंमलबजावणी आणि पोलीस दलास हस्तांतरण करण्याची जबाबदारी सायबर विभागाला देण्यात आली आहे. अ‍ॅम्बिस प्रणाली आयडेमिया या कंपनीला ही प्रणाली विकसित करण्यात गुन्हे अन्वेषण विभागातील तांत्रिक प्रतिनिधी, स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि आयआयटीमधील तज्ज्ञांनी योगदान दिले आहे. प्राईस वॉटर हाऊस कुपर्स या कंपनीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply