Breaking News

पनवेल मनपा प्रभाग 19मधील विकासकामासंदर्भात आढावा बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून पनवेल विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे झाली आहेत. त्याच अनुषंगाने सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून महापालिका प्रभाग 19मध्ये विकासकामे झाली असून, या प्रभागातील आणखी विकासकामांसंदर्भात नुकतीच ऑनलाईन आढावा बैठक झाली.
या बैठकीला महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, शहर अभियंता संजय कटेकर आदी उपस्थित होते.
या वेळी झालेल्या चर्चेनुसार विकासकामे करण्याच्या दृष्टिकोनातून पाहणी करून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन शहर अभियंता संजय कटेकर यांनी दिले. त्यामध्ये प्रामुख्याने कोळीवाडा, मिरची गल्ली येथील सर्व गटारांची कामे, स्वस्तिक प्लायवूडजवळील नाला बंदिस्त करणे, कर्नाळा सर्कल ते झवेरी बाजार ते कर्मवीर भाऊराव पाटील पुतळापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, कोळीवाडा येथे बांधण्यात येणार्‍या समाजमंदिराच्या कामासंदर्भात संकल्पचित्र सादर करून भव्य समाजमंदिर उभारणे, तसेच कोळीवाडा मच्छी मार्केट येथे कोल्ड स्टोरेज बनविणे ही पाच कामे प्रामुख्याने लवकरात लवकर करण्याचे या बैठकीत कटेकर यांनी आश्वासित केले.
याचबरोबर या प्रभागातील अन्य विकासकामासंदर्भातही चर्चा झाली. यामध्ये कोळीवाडा रस्ता पुनर्पुष्टीकरण करणे, सरस्वती हायस्कूल जीर्ण इमारत जमीनदोस्त करणे, महापालिका कार्यालय, नाट्यगृह व इतर येथील काच सफाई करणे, कोळीवाड्यातील सर्व गल्ल्यांमध्ये नवीन पेव्हर ब्लॉक बसविणे, कल्पतरू ते भारत गॅस नालेकाम करणे, वैश्य समाज हॉलसमोरील रस्ता, घोडके हॉस्पिटल ते म्हात्रे हॉस्पिटल रस्ता, मिरची गल्ली रस्ता आणि बागवान मोहल्ला ते ढोबी आळी रस्ता यांचे पुनर्पुष्टीकरण करणे, विश्राळी नाका ते तक्का भुयारी रस्त्याचे काम करणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पंचरत्न सर्कल मोटरसायकल पार्किंग वाहनतळ विकसित करणे, कोळीवाडा येथे 30 सीटचे शौचालय बांधणे, रोहिदासवाडा येथे नाले बांधकाम करणे, वडघर कोळीवाडा पुलास समांतर बंधारा बांधणे आदी कामांचा समावेश असून ही कामे मार्गस्थ लावण्यासंदर्भातही या आढावा बैठकीत विचारविनिमय झाला.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply