Breaking News

पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास मुरूडचा विकास

रायगडातील मुरूड तालुका हा नवाबकालीन तालुका आहे. श्रीवर्धन म्हसळा व मुरूड हे तीन तालुके जंजिरा नवाबाच्या अधिपत्याखाली असणारे तालुके होते. विशेष करून नावबांचे वास्तव्य मुरूड येथील राजवाड्यात असल्याने मुरूड तालुक्याला त्या काळात मोठ्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या होत्या. सन 1888 साली मुरूड नगरपरिषदेची रचना त्या काळात झाल्याने मुरूड शहरवासीयांना याचा मोठा फायदा झाला आहे. गारंबी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी पाहिले धरण नवाब सरकारने बांधून दिले होते, त्याचप्रमाणे शहराची रचना सुंदर पद्धतीने आखण्यात आली होती.

मुरूड तालुक्यात नवाब कालपासून काही पर्यटकांना आकर्षित करणारी स्थळे आहेत. फक्त या स्थळांच्या विकासासाठी निधी मिळाल्यास येथे भविष्यात पर्यटकांचा मोठा लोंढा येऊन रोजगाराला चालना मिळू शकते व मुरूडचा अधिक विकास होऊ शकतो.

यापैकी गारंबी हे धरण पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. या धरणातून फार पूर्वीपासून  मुरूड शहराला पाणी पुरवठा होत आहे व या ठिकाणी एकेकाळी नवाब शिकारीसाठी येत असत. शिघरे ग्रामपंचायतच्या हद्दीपासून थोडे पुढे गेल्यास घनदाट जंगलात हे प्रेक्षणीय स्थळ आहे. येथे काळ्या दगडातून सतत पाणी वाहत असते. निरव शांतता व आजुबाजूला महाकाय वृक्ष यामुळे सूर्यकिरणे येथे पोहचत नाहीत. पावसाळ्यात असंख्य पर्यटक येथे पोहण्यास येतात व खूप मज्जा करताना दिसतात. अतिशय प्रेक्षणीय व वाहत्या पाण्याचे झरे हे मे अखेरपर्यंत असतात. या ठिकाणी पर्यटकांची संख्या अधिक वाढवण्यासाठी शासनाचा निधी प्राप्त झाल्यास बुशी धरणाप्रमाणे रचना केल्यास बाराही महिने येथे पर्यटक राहू शकतात. याच स्थळाप्रमाणे सवतकडा हे सुद्धा प्रेक्षणीय स्थळ असून येथे चारशे फुटवरून सतत पाणी खाली पडत असते. हे ठिकाण वावडूनगी ग्रामपंचायत हद्दीत असून येथे जाण्याचा रस्ता नसल्याने येथे पर्यटकांना पोहचता येत नाही. जंगल भागातून किमान तीन किलोमीटर चालावे लागते. तेव्हा या ठिकाणी पोहचता येते. कोणतेही वाहन या ठिकाणी जात नसल्याने पर्यटकांना हे ठिकाण पहाता येत नाही. स्थानिक नागरिक येथे जातात व उंचाहून पडणार्‍या धबधब्याखाली आनंद लुटना दिसतात. याबाबत आमच्या प्रतिनिधीने वावडूनगी ग्रामपंचायत सरपंच हरिश्चंद्र भेकरे याना विचारणा केली असता ते म्हणाले की आमच्या ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती गरीब असल्याने आम्हाला विकासकामांना निधी उपलब्ध होत नाही, तरी सुद्धा आम्ही आमदार, खासदार यांच्या संपर्कात असून विकासनिधी आणीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

मुरूड शहर नगर परिषद हद्दीत समुद्रकिनारी दगडी बंधारा आवश्यक असून गेल्या दोन वर्षांपासून मुरूड नगरपरिषदेकडे प्रयत्न करून सुद्धा यश न मिळाल्याने हा दगडी बंधारा होऊ शकलेला नाही. त्यामुळे समुद्रकिनारी बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. यासाठी येथे दगडी बंधारा अलिबाग समुद्रकिनार्‍याप्रमाणे झाल्यास पर्यटक वृद्धी होणार आहे. मुरूड नगर परिषदेचा शासनाकडे पाठपुरावा सुरू असून त्यांना नक्कीच यश प्राप्त होणार आहे. हा बंधारा झाल्यास मुरूड समुद्र किनार्‍याची शोभा वाढून पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे दत्तमंदिर, जंजिरा किल्ला व फणसाड अभयारण्य अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे भविष्यात पर्यटक प्रचंड प्रमाणात येथे येणार आहेत. मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्य हे सुद्धा वन्यजीव यांच्यासाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी परदेशी पर्यटकांचे वास्तव्य मोठे आहे. परंतु या ठिकाणी पर्यटकांना फिरण्यासाठी गाडी नसल्याने सर्व भाग फिरताना येत नाही. 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात फणसाड अभयारण्य क्षेत्र पसरले असून येथे कोणतेही वाहन नेता येत नसल्याने पर्यटक नाराज होतात. याबाबत फणसाड अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांना विचारणा केली असता ते म्हणाले की आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे बॅटरीवर चालणार्‍या गाड्यांची मागणी केली आहे. आमचा प्रस्ताव मंजूर होताच पर्यटकांना ही सुविधा मिळणार आहे. बॅटरीवर चालणार्‍या गाड्यांचा कोणताही आवाज होत नाही, त्यामुळे वन्यजीवन यांना कोणताही धोका पोहचणार नाही. ही सुविधा प्राप्त होताच येथे सुद्धा पर्यटक वाढणार आहेत. मुरूड तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे असून गरज आहे त्यांचा विकास करण्याची. विकास झाला तर पर्यटकांची संख्या वाढेल.

-संजय करडे, खबरबात

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply