सांगलीत बचावकार्यावेळी दुर्घटना
सांगली : प्रतिनिधी
पुराच्या पाण्यातून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असताना येथील ब्रह्मनाळ गावात गुरुवारी (दि. 8) 32 जणांना घेऊन येणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे, बेपत्ता झालेल्या पाच जणांचा शोध सुरू आहे. सर्व नागरिक ब्रह्मनाळचे रहिवासी आहेत.
कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पुराने थैमान घातले असून, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. हे बचावकार्य सुरू असतानाच पलूस ब्रह्मनाळ गावात ही बोट उलटली. बोटीची क्षमता 30 ते 32 जणांना वाहून नेण्याची होती, मात्र पुरातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी त्यावर क्षमतेपेक्षा जास्त लोक चढले, त्यातून तोल जाऊन बोट उलटली.