ग्रंथालयशास्त्राचे पितामह डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा 9 ऑगस्ट 1892 हा जन्मदिवस. ग्रंथालयांच्या विकासात डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन यांची रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस ’ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा केला जातो. वाचनसंस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यानिमित्ताने त्यांच्या महान कार्याचा घेतलेला आढावा.
सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते याचे महत्त्व डॉ. रंगनाथन यांनी सर्वप्रथम पटवून दिले. त्याकरिता ग्रंथालयांचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करून द्यायला हवी, यासोबत वाचन संस्कृती रुजवण्यासाठी जनतेला प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार डॉ. रंगनाथन यांनीच सर्वप्रथम देशात रुजवला.
डॉ. रंगनाथन यांचा जन्म मद्रास प्रांतातील (सध्याचे चेन्नई) तंजावर जिल्ह्यातील शियाली या छोट्याशा गावात 9 ऑगस्ट 1892 साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शियाली येथील हिंदू हायस्कूलमध्ये झाले. विद्यार्थीदशेपासून त्यांनी संस्कृत वाङ्मयाचे अध्ययन सुरू केले होते. नंतर मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंग्रजी विषयात बीएची पदवी प्राप्त केली.
शिक्षण मिळविणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे हे लक्षात आल्यानंतर त्या शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवून अध्यापन शास्त्राची ‘एल. टी.’ परीक्षा उत्तीर्ण केली आणि गणिताचे प्राध्यापक झाले. नंतर एक गणिततज्ज्ञ आपली प्राध्यापकाची नोकरी सोडून ग्रंथपाल झाला. मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहिले. ग्रंथालय शास्त्राच्या शिक्षणाकरिता मद्रास विद्यापीठाने आपल्या स्वखर्चाने त्यांना ‘स्कूल ऑफ लायब्ररीयनशिप’साठी लंडनला पाठविले होते. लंडन विद्यापीठाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते पुन्हा मायदेशी परतले. सार्वजनिक ग्रंथालयाची गरज ओळखून 30 जानेवारी 1928 रोजी त्यांनी मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना केली. नंतर ग्रंथालयांची झपाट्याने प्रगती झाली.
प्राचीन काळात साखळदंडात बांधलेल्या ग्रंथसंपदेवर समाजातील काही ठरावीक लोकांचीच मक्तेदारी होती. त्या काळात माहिती साठवण्यासाठी हस्तलिखिते, शिलालेख, जनावरांची कातडी, भुर्जपत्रे, ताम्रपत्रांचा वापर केला जात होता. 1854मध्ये गुटनबर्गच्या छपाई यंत्राच्या शोधाने ग्रंथनिर्मितीत आमूलाग्र क्रांती घडवून आली. छपाई यंत्राच्या मदतीने मोठ्या प्रमाणात
ग्रंथ-साहित्याची निर्मिती झाली. नंतर या ग्रंथांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यासाठी ’ग्रंथालय’ ही संकल्पना समोर आली.
भारतीय ग्रंथालयात साधारणत: 1965नंतर संगणकाने प्रवेश केला. नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी जागेच्या प्रश्नाला पर्याय दिला खरा, पण यामुळे ग्रंथालये नष्ट तर होणार नाहीत ना अशी भीतीही व्यक्त होऊ लागली, मात्र जुने सोडायचे नाही, पण नवेही स्वीकारायचे, या धोरणावर ग्रंथपाल संगणकाचे ज्ञान अवगत करू लागला.
ई-रिसोर्सेसमध्ये ई-बुक, ई-जर्नल्स, सीडी, डीव्हीडी, मायक्रोचिप, मायक्रोफॉर्म, कार्ड रीडर आदींचा समावेश होतो, तर पारंपरिक साधनांमध्ये लिखिते, हस्तलिखिते, ग्रंथ, नियतकालिके, नकाशे, गॅजेट्स आदींचा समावेश होतो. या दोन्हींचा समन्वय राखण्यासाठी ग्रंथपालाला नेहमी प्रयत्नशील राहावे लागते.
सध्या बाजारात विविध प्रकारचे लायब्ररी सॉफ्टवेअर्स उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे वाचकांसाठी ग्रंथालयात विविध प्रकारची
ग्रंथसंपदा उपलब्ध झाली आहे. अलीकडे ग्रंथालयांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. यासोबत या क्षेत्रात अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत, परंतु आजही बहुतेक खासगी संस्थांमध्ये कार्यरत असलेले ग्रंथपाल उपेक्षितच आहेत. अल्प मानधन, अपुर्या सुविधांमुळे ग्रंथपालांमध्ये घोर निराशा पसरली आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रंथालयशास्त्राकडे वळणार्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात ग्रंथालयशास्त्र हा अभ्यासक्रमच लुप्त होऊन जाईल.
ज्याप्रमाणे शेतीची मशागत करायला शेतकरी लागतो, अगदी त्याचप्रमाणे बुद्धीरूपी शेतीची मशागत करण्यासाठी योग्य ग्रंथपाल आवश्यक असतो. वाचन संस्कृतीचा र्हास होत असताना ग्रंथपालाच्या समस्येकडे दुर्लक्ष करणे म्हणजे राष्ट्राच्या मोठ्या हानीला स्वत:हून आमंत्रित करण्यासारखेच आहे.
-योगेश बांडागळे