Breaking News

आजपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची मोठी घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासह जगभरात कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसर्‍यांदा देशाला संबोधित करताना बुधवारी (दि. 24) संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याची मोठी घोषणा केली आहे. मोदी म्हणाले की, जनता कर्फ्यूने दाखवून दिले की देशावर ज्या वेळी कोणतेही संकट येते तेव्हा संपूर्ण देश एकजूट होतो. कोरोनासारख्या महारोगाने जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवले आहे. त्या राष्ट्रांकडे साधने नाहीत असे नाही, पण हा आजार इतक्या वेगाने पसरत आहे की तयारीच करता येत नाही. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये जात आहे, अशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
देशात कोरोना आजाराचा उद्रेक झाला आहे. देशातील अनेक राज्य लॉकडाऊनमध्ये गेली आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह काही राज्यांत संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे ट्विट करून सांगितले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी कोरोनाला आळा घालण्यासाठी कोणती मोठी घोषणा करणार यावरून चर्चा सुरू होती. अखरे पंतप्रधान मोदी यांनी याबाबत आपली भूमिका मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोनामुळे देशासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्याने होत आहे की त्याची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. आगीसारखा हा आजार पसरत चालला आहे. त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे एकमेकांपासून दूर राहणे आणि घरातच राहणे. बुधवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून 21 दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये जात आहे. हा लॉकडाऊन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीने लागू केला जाईल, याचीही आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी करून दिली.

Check Also

आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …

Leave a Reply