Breaking News

वादळी वारा, पावसामुळे माथ्यावरील रान संकटात

माथ्यावरील रान म्हणजे माथेरान, अशी बिरुदावली असलेल्या या शहराला पावसाने आणि वादळी वार्‍याने झोडपल्यामुळे वादळी वार्‍यामुळे येथे झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. माथेरानला अतिवृष्टीमुळे जास्त प्रमाणात जमिनीची धूप झाल्याने माथेरानमध्ये अनेक ठिकाणी मुळासकट मोठमोठे वृक्ष उन्मळून पडत आहेत.

माथेरानमध्ये ठिकठिकाणी मोठमोठी झाडे मुळासकट उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. माथेरानचा मेरिटाईम हाऊस रोड, माधवजी गार्डन, नगर परिषद दवाखाना तसेच येथील एम. जी. रोडवरील शैलेश स्टोअर्स तसेच सलीम शेख यांच्या दुकानावर झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. भास्कर घाग यांच्या दुकानावर भलीमोठी जांभळीची दोन झाडे पडल्याने दुकान जमीनदोस्त झाले आहे. पुढे चार-पाच दुकाने सोडून सलीम शेख यांच्या दुकानावर दुपारी एकच्या दरम्यान जांभळाचे झाड पडल्याने दुकानाची खूप मोठी हानी झाली आहे, तर वाल्मिकनगर येथील पडलेल्या झाडामुळे अशोक वाघेला या रहिवाशाचे घर थोडक्यात बचावले असले तरी शेजारी राहत असलेल्या जिजा देसाई या मोलमजुरी करणार्‍या विधवा महिलेच्या घराचे फाऊंडेशन झाडाच्या मुळ्यांनी उखडल्याने घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने बेसहारा महिलेचा निवारा हिरावला आहे. यासाठी दाभेकर, शेख व देसाई या आपत्तीग्रस्तांना शासनाने तातडीने मदत पुरवावी, अशी येथील पीडित नागरिक व लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे याचना करीत आहेत. या वेळी या घटनांची माहिती मिळताच नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रसाद सावंत, वरिष्ठ लिपिक रत्नदीप प्रधान, विकास पार्टे यांच्यासह नगर परिषदेचा आपत्ती व्यवस्थापनाचा ताफा घटनास्थळी मदतकार्यासाठी दाखल झाला होता. या वेळी सावंत यांनी माथेरानची गंभीर समस्या म्हणजे जमिनीची धूप थांबविण्याकरिता शासनाने

उपाययोजना करण्याकरिता यासंदर्भात अनेक प्रस्ताव माथेरानच्या नगराध्यक्षांनी केंद्राच्या सनियंत्रण समितीकडे तसेच राज्यातील व केंद्रातील मंत्रिमहोदयांना सादर केले आहेत. तसेच जमिनीची धूप थांबवली नाही तर हळूहळू माथेरानवरील रान गायब होऊन फक्त माथाच दिसेल, अशी भीती व्यक्त होत आहे.          

मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान पाठोपाठ आता अमन लॉज-माथेरान ही शटल सेवा पावसामुळे विविध ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळा संपल्यानंतर रेल्वे ट्रॅकची पाहणी करून पुढील निर्णय होणार आहे, पण अमन लॉज माथेरान शटल सेवा या मार्गावर कोणतेही दरडीचे प्रकार घडले नाहीत. माथेरानमध्ये येण्यासाठी मिनीट्रेन  किंवा घोड्यावरून पर्यटकांना माथेरानमध्ये आणले जाते. घोड्यांपेक्षा रेल्वेचे दर कमी आणि मिनीट्रेनमध्ये बच्चेकंपनीसह आलेली सहल, तसेच  येथे आलेले पर्यटक मिनीट्रेनमध्ये आवर्जून बसतात. त्यामुळे मिनीट्रेन ही माथेरानची अस्मिता समजली जाते. या मिनीट्रेनचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक माथेरानमध्ये येतात, पण यापुढे पर्यटकांच्या आनंदावर विरजन पडणार आहे. या पावसाळ्यात जोरदार अतिवृष्टी झाली. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तर काही भागात भूस्खलन झाल्याने अमन लॉज-माथेरान ही शटल सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून शुक्रवारपासून (दि. 9) ही सेवा बंद करण्यात आली आहे.

शटल सेवा सुरू असल्यामुळे माथेरानमध्ये पर्यटकांची वर्दळ सुरू होती. तिलासुद्धा ब्रेक लागणार असून ही मिनीट्रेन पूर्ववत सुरू राहण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेचे बांधकाम सभापती प्रसाद सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, भाजप अध्यक्ष विलास पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजय सावंत, काँग्रेस शहराध्यक्ष मनोज खेडकर व माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी यांनी मध्य रेल्वेचे सीनियर डीसीएम अशोक पवार यांची भेट घेऊन ही मिनीट्रेन शटल सेवा सुरू ठेवण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. ही शटल सेवा बंद झाल्यामुळे माथेरानच्या पर्यटनावर विपरीत परिणाम होणार आहे. यामुळे येथील व्यापारी व दुकानदार धास्तावले आहेत.

अतिवृष्टीने माथेरानकरांची पुरती दाणादाण उडवून टाकली. 24 तासांत 440 मिलिमीटर पावसाची देशामध्ये सर्वाधिक नोंद झाल्याचा दावा स्कायमेट या संस्थेने केला आहे. पावसाच्या अतिवृष्टीमुळे माथ्यावरचे रान असलेले माथेरानदेखील संपूर्ण पाण्याने ओसंडून वाहत होते, तर सकल भागांना तळ्याचे स्वरूप आलेले पाहायला मिळाले. पावसाने काही तासांतच आपले रौद्ररूप दाखवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. सतत पडणार्‍या पावसामुळे येथील जनजीवन ठप्प झाले होते. वीज नसल्यामुळे दोन दिवस पिण्यास पाणी नाही. मोबाइल व वायफाय नेटवर्क नाही. त्यामुळे माथेरानकरांचा जगाशी संपर्क तुटला होता.

श्रावण महिन्याचा पहिला शनिवार व रविवार माथेरानकरांसाठी स्मरणात राहील असा ठरला. शनिवार व रविवारपासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे माथेरानकरांमध्ये भीतीचे वातवरण होते. अतिवृष्टी त्यात सोसाट्याचा वारा सतत वाहत होता. वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. जिकडे तिकडे पाणीच पाणी. वीज गायब त्यामुळे रात्रीच्यावेळी जोरदार कोसळत असलेल्या पावसामुळे येथील नागरिक भयभीत झाले होते. क्षणभरही उसंत घेतली नसल्याने काय वाईट घटना घडते की काय, अशी भीती येथील नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. दोन दिवसांत नेरळ-माथेरान घाटात दोन वेळा दरड कोसळली. नेरळ-माथेरान मिनीट्रेन मार्गात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या, पण मिनीट्रेन सेवा बंद असल्याने काही अनुचित प्रकार घडला नाही. गटारातील पाणी रस्त्यावर येऊन वाहत होते. पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की निचरा होण्यासाठी गटारही कमी पडत होते. त्यामुळे रस्त्यावरून आलेला पाण्याचा प्रवाह काही व्यापार्‍यांच्या दुकानात शिरला. काही घरांतही पाणी शिरले होते. माथेरानचा भाग उताराचा असल्याने पाण्याचा निचरा लवकर होत असला तरीही प्रवाहाचा वेग इतका जास्त होता की रस्त्यावरून चालताना गुडघ्यापर्यंत पाणी लागत होते. 5 ऑगस्टपर्यंत 4673 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

माथेरानच्या पाण्याच्या प्रवाहाचा फटका माथेरानबाहेरील परिसरातील मोरबे धरणाला बसला. माथेरानच्या पश्चिम भागातील पाणी डोंगरावरून थेट मोरबे धरणात जात होते. रविवारी संध्याकाळी मोरबे धरण 100 टक्के भरले व काही तासांतच त्याचे दरवाजे उघडण्यात आले. माथेरानच्या 54 किमी व्यासातील रस्त्यांची पूर्ण

चाळण झाली. सततच्या अतिवृष्टीमुळे पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

-संतोष पेरणे

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply