Breaking News

बोलीभाषेचे जतन करण्याची गरज

मराठी भाषेचे संरक्षण व संवर्धनासाठी प्रादेशिक भाषांचे जतन होणे आवश्यक आहे. वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष लेख..

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मराठी भाषेच्या समृद्धीसाठी करण्याच्या प्रयत्नांना चांगले यश मिळत असून त्यामुळेच भाषेविषयी सजगता निर्माण होण्यास निश्चित मदत होत आहे. भाषेमुळे संस्कृतीचे जतन होत असते आणि इतिहासाकडे बघण्याची दृष्टीही मिळते. आपली लोकभाषा, बोलीभाषा यांचे दस्तऐवजीकरण व जतन करण्याची गरज असून, त्यासाठी सरकार समाजाने व युवा पिढीने पुढाकार घेण्याची गरज आहे. भाषा हे संवादाचे मुख्य साधन आहे. अर्थात ती बोलीभाषा असू शकते, लिपी असू शकते, चित्रलिपीही असू शकते. देशभरातील 21 राज्यांच्या संशोधनात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 52 भाषा बोलल्या जात असल्याचे दिसून आले असून ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असली तरी या भाषा काही मोजकेच समूह बोलत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पृष्ठभूमीवर बोलीभाषा लुप्त होतात की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. नामवंत भाषा वैज्ञानिक डॉ. गणेश देवी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अभ्यासात या 40 बोलीभाषा हळूहळू आक्रसत असल्याचे दिसले. या पृष्ठभूमीवर बोलीभाषेचे जातन व संवर्धन करण्याचीगरज आहे. मराठी भाषा ही जगातील सर्वात समृद्ध असल्याचा डांगोरा आपण नेहमी पिटतो, मात्र भाषा संवर्धनाचा विषय पुढे येतो तेव्हा फक्त प्रमाण भाषा गृहीत धरली जाते. बोलीभाषेचे संवर्धन, तिचे जतन किंवा त्यात साहित्य निर्मिती व्हावी, अशी मागणी करताना फारसे कुणी दिसत नाही. दर 20 मैलावर भाषा बदलते. जिल्हागणिक मराठीचा वेगळा लहेजा आहे. त्या त्या ठिकाणी वेगवेगळे शाब्दिक शब्द तिच्या वैभवात भर घालतात, पण इंग्रजीच्या आक्रमणामुळे बोलीभाषेचे हे शब्द नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या शब्दांची भाषा जतन कशी होणार, याचा विचार होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात विभागवार मराठीचा लहेजा बदलत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात बोलल्या जाणार्‍या मराठीत एक रांगडेपणा दिसून येतो. मराठी भाषेत एकच शब्द स्थानानुसार कसा बदलतो ते पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. ‘माझा’ हा प्रमाणभाषेतील शब्द नाशिक जिल्ह्यात ‘माहा’ असा बोलला जातो. जालना, परभणीमध्ये ‘मपला’ असा बोलला जातो. याशिवाय असे अनेक शब्द स्थानिक आहेत की ज्याची कुठेतरी नोंद होणे आवश्यक आहे. बोलीभाषेची ही समृद्धी जपण्यासाठी साहित्यिकांनी या बोलीभाषांना प्राधान्य द्यायला पाहिजे. एक काळ असा होता की भारतात 19 हजार 569 भाषा बोलल्या जात होत्या. आता ही संख्या 10 हजारांवर आली असून बोलीभाषेची संख्या 121 वर आली आहे. गेल्या 60 वर्षात भारतात दरवर्षी सरासरी एक अशा 60 बोलीभाषा संपून गेल्या. आज महाराष्ट्रात 40 बोलीभाषा लयाला जाण्याच्या स्थितीत आहेत. महाराष्ट्रात काही बोलीभाषा आज शाळांमध्ये शिकवल्या जातात, पण बहुतेक शाळांच्या अभ्यासात नाहीत आणि त्या टिकाव्यात यासाठी समाजही काही करतो आहे असे नाही. त्यातच बोलींना प्रदेशाचा संदर्भ असतो तसा जाती पोटजातींचाही असतो. अनेक बोलींची नावे तशी असतात, मात्र ही प्रदेश व जातीची कुंपणे ओलांडून महाराष्ट्रातील सार्‍या बोली जगवायच्या असतील, तर महाराष्ट्र सरकारने सर्व विद्यापीठांच्या सहकार्याने एक सर्वंकष बोलीभाषा संरक्षण प्रकल्प हाती घेण्याची गरज आहे अन्यथा आपल्या संस्कृतीच्या ऐश्वर्याची ही मोरपिसे झडून ती बोडकी होऊन जाईल. या पृष्ठभूमीवर स्थानिक भाषेतील शब्दांना विश्वकोशात स्थान दिले गेले, तर त्याचे जतन होऊ शकेल, तसेच मराठी भाषेचा उमाळा किंवा पुळका भाषा दिनापुरताच न आणता वर्षभर शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यासाठी विविध उपक्रम राबविले पाहिजे, तसेच साहित्यिक व लेखकांनी स्थानिक भाषेतून साहित्याची निर्मिती करायला प्राधान्य दिले, तर बोलीभाषा समृद्ध होण्यास मदत होईल. बोलीभाषा समृद्ध झाली, तर मराठी भाषेला चांगले दिवस येईल, असे वाटते

-प्रा डॉ सुधीर अग्रवाल,  एस के पी कॉलेज, कामठी, नागपूर

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply