पनवेल : प्रतिनिधी
जगातील सर्वांत मोठे दान म्हणजे शिक्षणदान आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अशा या शिक्षणाचा उपयोग स्वत:पर्यंत मर्यादित न ठेवता तो समाजालाही व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले. ते मंगळवारी (दि. 13) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रौप्य महोत्सव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
आपल्या भाषणात डॉ. सुहास पेडणेकर पुढे म्हणाले की, समाज घडविण्यासाठी चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षण हक्कापेक्षा आता क्वालिटी शिक्षणाची गरज असून, केवळ पदवी देऊन चालणार नाही, तर चांगले नेतृत्व कसे देता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. महाविद्यालयाचे मोठेपण आणि उंची ठरवताना विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापनाचा सक्रिय दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. शिक्षणामुळे तुम्ही कोण आहात याची जाणीव होते. शिक्षणाचा उपयोग आजूबाजूच्या समाजाला व्हायला हवा ही जाणीव शिक्षणामुळेच होते. स्वायत्त विद्यापीठ म्हणून काम करताना आहे तेच कार्यक्रम चालवणे हे न करता नवनवीन व भविष्यात गरजेचे असलेले कार्यक्रम हाती घ्यावेत. त्यासाठी मदत करण्यास आपण तयार असल्याचेही डॉ. पेडणेकर यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या निर्मिती व प्रगतीची माहिती दिली, तर संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या गौरवशाली परंपरांचा आढावा घेतला.
या सोहळ्यास महापौर डॉ. कविता चौतमोल, संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र पाटील, अनिल भगत, अर्चना ठाकूर, संजय भगत, नगरसेविका चारुशीला घरत, कुसुम पाटील, सीता पाटील, वसंतशेठ पाटील, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, प्रगती कला आणि वाणिज्य महाविद्यालय डोंबिवलीचे प्राचार्य डॉ. ए. पी. महाजन, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशीचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. शिवणकर, केएलई कळंबोलीचे प्राचार्य डॉ. चंद्र मौर्या, उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. राजेंद्र धामणस्कर, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी, पेझारी महाविद्यालय पेणचे प्राचार्य डॉ. भगत, भाऊसाहेब नेने महाविद्यालय पेणचे प्राचार्य डॉ. एस. बी. धारप, कर्जत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कर्जतचे प्राचार्य डॉ. रवींद्र देशमुख, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सहसचिव डॉ. नंदकुमार जाधव, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड आदी उपस्थित होते.
महाविद्यालयातील शैक्षणिक, क्रीडा, कला, संशोधन, सेवा क्षेत्रातील ज्या विद्यार्थ्यांनी विभागीय, विद्यापीठीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान यश प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा आणि महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ‘रूपेरी यशोगाथा’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नृत्य, गायन व अभिनय यांचा कलासंगम असणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेश येवले आणि डॉ. गितिका तन्वर यांनी केले.
चौकट
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांनी जनादर्र्न भगत शिक्षण प्रसारक संस्था सन 1992मध्ये थोर समाजसेवक कै. जनार्दन भगत यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्थापन केली. वंचित व प्रकल्पग्रस्तांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ही संस्था कार्यरत असते, तसेच राष्ट्रहितासाठी सुसंगत वैश्विक विचारसरणीला चालना देणारी मूल्ये, व्यावसायिकता सामाजिक संवेदनशीलता आणि गतिशील उद्योजकता यांना प्रोत्साहन देणारी ही शैक्षणिक संस्था बनली आहे. 25 वर्षांच्या कालावधीत संस्थेने शिक्षण क्षेत्रात 18 विद्याशाखा स्थापन केल्या आहेत. त्यात तीन वरिष्ठ महाविद्यालये, तीन कनिष्ठ महाविद्यालये, 10 शाळा आणि दोन कौशल्य विकास केंद्र कार्यरत आहेत. या विद्याशाखांमधून केजी ते पीएचडीपर्यंतचे 18 हजारांहून अधिक विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 26 सप्टेंबर 1997 रोजी चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची स्थापना केली. सर्व स्तरातील दर्जेदार शिक्षण देण्याचे आणि अनेक करिअर आधारित पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांसह प्रभावी शिक्षण आणि शिकण्याची सुविधा या महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे.