रायगड जिल्ह्यात यंदा अतिपावसामुळे प्रचंड नुकसान झाले. पूर आला. रस्ते खचले. घरांचे नुकसान झाले. दरडी कोसळल्या. यापूर्वी दक्षिण रायगडात दरडी कोसळत होत्या. यंदा उत्तर रायगडातदेखील दरडी कोसळल्या आहेत. दरवर्षी दरडग्रस्त गावांची संख्या वाढतेय ही चिंतेची बाब आहे. जुलै 2005च्या अतिवृष्टीनंतर झालेल्या पाहणीत रायगड जिल्ह्यातील 84 गावांचा दरडग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात ही संख्या 103वर गेली होती. यंदाच्या पावसाळ्यात दरडग्रस्त गावांच्या यादीत नसणार्या गावांमध्येच दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे दरडग्रस्त गावांची संख्या 125पेक्षा जास्त होणार आहे. सुदैवाने यंदा दरडी कोसळल्यामळे जीवितहानी झालेली नाही, परंतु या गावांवर दरडींची टांगती तलवार राहणारच आहे.
जुलै 2005मध्ये दरड कोसळून झालेल्या आपत्तीच्या अनुभवावरून भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने या गावांचे सर्वेक्षण केलेे. त्याचा अहवाल त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. या सर्वेक्षणात रायगडमधील 103 गावे दरडग्रस्त अल्याचे स्पष्ट झाले. त्यातील 9 गावे (वर्ग 1) अतिधोकादायक, 11 गावे (वर्ग 2) मध्यम धोकादायक , 83 गावे (वर्ग 3) सौम्य धोकादायक आहेत. महाड तालुक्यात 49, पोलादपूर 15, रोहा 13, म्हसळा 6, माणगाव 5, सुधागड 3, खालापूर 3, कर्जत 3, पनवेल 3, श्रीवर्धन 2, तर तळा तालुक्यात एक गाव दरडग्रस्त आहे. या 103 दरडग्रस्त गावांत अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तरी या गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका कमी झालेला नाही. यंदा वेलेटवाडी -अलिबाग, सागवाडी-अलिबाग, साळाव- मुरूड, भालगाव-रोहा येथे दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे दरडग्रस्त गावांच्या संख्येत वाढ झाली आहे.
कमी वेळेत 500 मिमीपेक्षा जास्त पाऊस, पाण्याचा निचरा होणार्या मार्गात अडथळे, जमिनीस भेगा पडणे ही दरडी कोसळण्याची मुख्य कारणे आहेत. कमी कालावधीत जास्त पाऊस पडणे हे दरडी कोसळण्याचे मुख्य कारण आहे. ही आपत्ती नैसर्गिक आहे. पाऊस किती पडावा कोठे पडावा हे आपल्या हाती नाही. तरीही इतर कारणे आहेत जी टाळता येण्यासारखी आहेत. डोंगर माथ्यावर पडणारे पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक मार्ग असतात. तेच बुजवले जातात. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. पाणी वाहून न जाता ते झिरपते. अतिप्रमाणावर झालेली वृक्षतोड
हेदेखील दरडी कोसळण्याचे कारण आहे. वृक्षतोड केल्यामुळे जमिनीची झीज होते. आपल्या जिल्ह्यातील डोंगर हे बेसाल्ट खडकांचे आहेे आणि माती मुरूम आहे. त्यामुळे माती खडकाला चिटकून राहत नाही. वृक्षतोड झाल्यामुळे जमिनीची झीज होते. काही ठिकाणी जमिनीला भेगा पडतात. या भेगांमधून पाणी झिरपते आणि माती सैल होऊन ती सटकते. त्यामुळे दरडी कोसळतात.
2005 साली झालेल्या अतिवृष्टीत दरड कोसळनूत 250पेक्षा जास्त जणांचे बळी गेले होते. त्यानंतर दरडीचे धोके कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. यासाठी दरड कोसळण्याची शक्यता असणार्या भागात वृक्षारोपण, कमकुवत भागाचे मजबुतीकरण केले जात आहे. साईलनगर, जुई, लोअर तुडील, दासगाव येथे धोके प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या जात आहेत. काही दरडग्रस्त गावांमध्ये संरक्षक भिंती बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला आहे. जेथे दरड कोसळण्याची शक्यता आहे त्या गावांमध्ये दरडीपासून घरांचे संरक्षण होण्यासाठी संरक्षक भिंती उभारण्यात येणार आहेत. शासनाने या उपाययोजना केल्या तरी त्या तात्पुरत्या असणार आहेत. संरक्षक भिंती बांधल्या तरी या गावांवर दरडींची टांगती तलवार राहणारच आहे. दरडी कोसळण्याचा धोका कमी होणार नाही. त्यामुळे या गावांमध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात. ज्या गावांचा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने सर्व्हे केला आहे त्या गावांचे सुरक्षित ठिकाणी विस्थापन करायला हवे. ही बाब खर्चिक आहे. तसेच आस्था व भावनेचा प्रश्न आल्यामुळे ग्रामस्थ दुसर्या गावांमध्ये विस्थापित होण्यास सहज तयार होणार नाहीत. त्यासाठी ग्रामस्थांची मानसिकता बदलावी लागणार आहे. त्यात बराच कालावधी जाईल, परंतु यावर गांभीर्याने विचार करावा लागेल. ज्या गावांना दरडींचा धोका आहे असे सर्वेक्षणात सिध्द झाले आहे, तेथील सर्व ग्रामस्थांना किमान पावसाळ्याच्या कालावधीत तरी सुरक्षित स्थळी हलवायला हवे. त्यामुळे त्या भागातील किमान जीवितहानी तरी नक्कीच टाळता येऊ शकते. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड केली जात आहे. वणवे लावून गवत जाळले जाते. त्यामुळे गवत नाहीसे होत आहे. यामुळे जमिनीला भेगा पडतात. हे थांबवण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली पाहिजे. दरडग्रस्त गावांमधील डोंगरावर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व गवताची लागवड केली पाहिजे. कुर्हाडबंदी व चाराबंदीसारखी उपाययोजना करावी लागेल. त्यासाठी तेथील ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे लागेल, परंतु हे करावेच लागेल. पाऊस किती पडावा हे आपण ठरवू शकत नाही, परंतु नुकसान कमी व्हावे म्हणून आपण नक्कीच काहीतरी करू शकतो.
-प्रकाश सोनवडेकर, खबरबात